टॅटूथ

समृद्धी धायगुडे 
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

ट्रेंड्‌स
टॅटूची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. आपले व्यक्तिमत्त्व एखाद्या चित्रातून दाखवण्याबरोबरच स्टाइल स्टेटमेंट म्हणून टॅटू मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. या टॅटूच्या प्रकारांमध्ये ‘टीथ टॅटू’ची फॅशन सध्या एकदम ट्रेंडमध्ये आहे.
 

 • ‘टॅटूथ’ हा शब्द तुम्ही यापूर्वी नक्कीच ऐकला नसेल, हो ना? 
 • खरंतर हा शब्द इंग्रजीतील कॉइन वर्ड आहे. ’टॅटू’ आणि ’टीथ’ असे मिळून झालेला. या ट्रेंडची सुरवात जपान, अमेरिका या देशात झाली. 
 • दातांवर तात्पुरत्या स्वरूपात चित्र रेखाटण्यापासून याची सुरवात जपानमध्ये झाली. त्यानंतर अमेरिकेत या टॅटूचे पुढचे पाऊल पडले. तात्पुरत्या टॅटूऐवजी कायमस्वरूपी टिकणाऱ्या टॅटू रेखाटला जाऊ लागला. 
 • अमेरिकेत तर टॅटूचे व्यसन लागलेल्या कलाकारांचे खास समूहच आहेत. यातील बऱ्याच जणांनी आपल्या दातांवर टॅटू काढले आहेत. 
 • सध्या भारतातही ‘टॅटूथ’ चा ट्रेन्ड रुजताना दिसत आहे. शरीराच्या विविध भागांवर टॅटू काढण्याबरोबरच दातांवर टॅटू काढण्याचा हा ट्रेंड मोठ्या शहरात दिसतो. 
 • ‘टॅटूथ’ काढणाऱ्यांमध्ये टीन एज मुलांपासून तरुणांपर्यंत समावेश आहे. 
 • हे टॅटू कसे रेखाटले जात असतील याबाबत  तुम्हाला शंका येणे स्वाभाविक आहे. हे टॅटू तुमच्या खऱ्या-खुऱ्या दातांवर येत नाही. तर तो टॅटू फक्त ब्रिज किंवा कॅपवरच काढता येतो. ही कलाकुसर खूप छोट्याशा जागेवर करावी लागत असल्याने सुईच्या टोकांनी सूक्ष्मदर्शिकेखाली बघून करावे लागते. या प्रक्रियेत खूप गरम सिरॅमिक रंगाचा वापर केला जातो. यानंतर ते चित्र ओव्हनमध्ये भाजल्याने सिरॅमिकचे चित्र चिकटून राहते. ही कॅप तुम्हाला हव्या असलेल्या दातांवर लावली की, तुमचा ‘टॅटूथ’ तयार.
 • या टॅटूमध्ये आणि त्वचेवर काढल्या जाणाऱ्या टॅटूमध्ये थोडा फरक आहे. त्वचेवरील टॅटू जितका मोठा तशी त्याची किंमत वाढत जाते, मात्र या टॅटू मुळातच अतिशय छोट्या जागेवर काढायचा असल्याने त्यातही खूप क्‍लिष्ट किंवा बारीक डिझाईन्स असल्यास त्यानुसार जास्त पैसे आकारले जातात. 
 • या टॅटूचा शोध तसा वीस वर्षांपूर्वीच लागला होता. सध्या हा प्रकार मोठ्या प्रमाणात फॅशन किंवा स्टाइलमध्ये मोडला जात असल्याने या प्रकारास आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.
 • या टॅटूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला दातांशी निगडित काही उपचार घ्यायचे असतील जसे, दात सरळ येण्यासाठी, संवेदनशील दातांच्या संरक्षणासाठी, रिप्लेस फिलिंग, दात आणखी सुरेख करण्यासाठी टॅटूथ काढू शकता. 
 • या टॅटूथ म्हणून काही मोजके शब्द, जिभेचे चित्र, ओठांचे चित्र, आपल्या आवडत्या व्यक्तीचे चेहरा, लोगो, कार्टून्स, प्राण्यांचे चित्र हे कलरफुल शाईने अथवा नुसते काळ्या शाईने देखील काढले जाते. 
 • सध्या सेल्फी टॅटू प्रेमींची संख्या वाढत असल्याने त्यांना हा प्रकार निश्‍चितच आवडेल. मात्र हा रेखाटण्यापूर्वी आपल्या दातांचे आरोग्य नीट तपासून मगच तो रेखाटावा.
   

फोटो फीचर

संबंधित बातम्या