रेंटल ॲक्‍सेसरीज

समृद्धी धायगुडे
शनिवार, 13 जानेवारी 2018

ट्रेंड्‌स
सध्या मोठ्या शहरांमध्ये पर्यटनासाठीच्या विविध गोष्टी भाड्याने उपलब्ध आहेत.

नव्या वर्षात पर्वतारोहण, कॅम्पिंग, वर्ल्ड टूर करायचा संकल्प केला असेल तर या लेख नक्की तुम्हाला मदत करेल. कोणत्याही स्वरूपाच्या पर्यटनाला जाण्याची तयारी सुरू होते ती म्हणजे बॅगेपासून. दरवेळी नवीन बॅगची खरेदी करायचा कंटाळा येतो किंवा एका ट्रिपसाठी एवढी मोठी बॅग कशाला असाही विचार आपण करतो ? अशा वेळी भाड्याने किंवा तात्पुरत्या स्वरूपात बॅग मिळाली तर बरे पडेल असा विचार करणारेदेखील पुष्कळजण आहेत. सध्या मोठ्या शहरांमध्ये पर्यटनासाठीच्या विविध गोष्टी भाड्याने उपलब्ध आहेत.

 • कौटुंबिक सहलीपासून ते डेस्टीनेशन वेडिंगपर्यंत कोणत्याही कारणानिमित्त तुम्हाला पर्यटनाला लागणारी साधने भाड्याने उपलब्ध आहेत. 
 • जंगल पर्यटनासाठी लागणाऱ्या तंबूपासून एसएलआर कॅमेरापर्यंत प्रत्येक वस्तू ऑनलाइन बाजारात भाडे तत्त्वावर मिळते. 
 • परदेशी पर्यटनाला जाताना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्रथमच जायचे असेल तर ते गडबडून जातात.  अशा व्यक्तींसाठी हा उत्तम पर्याय आहे. येथे तुमच्या गरजेनुसार तितकेच दिवस सामानासाठी एक मोठी बॅग जी तुम्ही ज्या देशात जाणार आहात तिथल्या नियमामध्ये अगदी बसेल अशी, त्याच वजन मर्यादेची मिळते. 
 • ॲक्‍सेसरीज भाडे तत्त्वावर घेण्याचे दोन प्रमुख फायदे म्हणजे नव्या किमतीतील वस्तूंपेक्षा हा मार्ग कधीही स्वस्त पडतो, दुसरे म्हणजे कोणतीही वस्तू अंगावर पडून राहात नाही. 
 • या वस्तू भाडे तत्त्वावर घेताना संबंधित कंपनीकडे किंवा त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन सर्व माहिती भरावी लागते. यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पर्यटनासाठी वस्तू हव्या आहेत, कोणत्या ब्रॅण्डच्या,किती दिवस,संबंधित देश,शहराचे नाव, किती सदस्यांसाठी,ओळखपत्र इत्यादी. 
 • वस्तू घेताना भाडेकरूंनी त्या कंपनीची सर्व नियमावली काळजीपूर्वक वाचावी. यामध्ये त्यांची डिपॉझिटची रक्कम, त्याची प्रक्रिया, वस्तू वापराविषयीचे नियम इत्यादी सर्व गोष्टी वाचून मगच त्या घेण्याचा निर्णय घ्यावा. 
 • या वस्तूंमध्ये बॅगचे सॉफ्टबॅग,हार्ड बॅग,डफल बॅग्ज,लॅपटॉप बॅग, सॅक,किड्‌स बॅग, ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी तंबू, जॅकेट्‌स,शूज, दुर्बीण, इतर किरकोळ ॲक्‍सेसरीजमध्ये नेक पिलो, बॅग बेल्ट्‌स, कुलपे इत्यादी वस्तूदेखील पुरविल्या जातात. सध्या काही नामांकित कंपन्यांनी पुस्तके, तान्ही बाळे कॅरी करण्यासाठीचे स्ट्रोलर अशाही वस्तू देण्यास सुरवात केली आहे. 
 • या वस्तू कमीत कमी म्हणजे एक तंबू साधारण अडीचशे रुपयांपासून दर्जेदार कंपनीचा एसएलआर कॅमेरा दर दिवशी अडीच हजार ते तीन हजार या प्रमाणे मिळतो. कॅमेरामध्ये निकॉन, कॅनन अशा नामांकित ब्रॅण्डचे कॅमेरा उपलब्ध होतात. 
 • एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्या वस्तूंच्या डिपॉझिटमधून ते कापले जातात. त्यामुळे वस्तूंची उपलब्धता जितकी सोपी तितक्‍याच त्या जबाबदारीने वापरणेदेखील आवश्‍यक असते. 
 • विविध भाडेतत्त्वावर वस्तू देण्याऱ्या कंपन्या अगदी एक दिवसापासून वर्ष-दोन वर्षांसाठी सुद्धा भाड्याने देतात. या वस्तूंचे भाडे संबंधित वस्तू, तिचा वापरायचा कालावधी यानुसार निश्‍चित केले जाते. काही कंपन्या स्वतःहून भाडेकरूला ज्या देशात जाणार आहेत त्या नियमात बसतील अशा वस्तूंविषयी मार्गदर्शन करतात. 
 • पर्यटन क्षेत्राशी निगडित या अनोख्या सेवेमध्ये मुंबईतील एक उद्योजक मनन शहा म्हणतात,‘‘कामानिमित्त मी विविध देश-विदेशात फिरलो तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, परदेशी पर्यटकांच्या तुलनेत आपण खूप सामान वागवतो.त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे विभाग करून बॅकपॅकमध्ये केली असे. बऱ्याच वर्षातील प्रवासाच्या अनुभवामुळे मी पूर्वीची नोकरी सोडून अशा प्रकारचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि २०१५ मध्ये ’ब्रॅगपॅकर्स’ ही कंपनी सुरू केली.’’

या कंपनीमार्फत ते विविध पर्यटनाची साधने म्हणजे डीएसएलआरपासून अगदी लहान मुलांच्या उत्पादकापर्यंत सर्व काही भाडेतत्त्वावर देतात. अर्थात यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रोज चार-पाच तास इंटरनेटवर दर्जेदार वस्तूंची खरेदी करण्यासाठी शोध घ्यावा लागतो. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या