‘स्वरसाधक’ 

सतीश पाकणीकर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

उपक्रम
 

भारतीय शास्त्रीय संगीताला फार मोठी परंपरा लाभली आहे. अगदी वैदिक काळापर्यंत ती मागे नेता येईल. असे असले तरीही भारतीय शास्त्रीय संगीत काळाबरोबर सतत बदलते व प्रवाही राहिलेले आहे. संगीताची ही गंगा आपल्या प्रतिभाशाली कर्तृत्वाने वाहती ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य अनेकानेक महान कलावंतांनी करून ठेवले आहे. त्यांचे हे कार्य त्याच तडफेने पुढे नेण्यासाठी आजच्या पिढीतील अनेक कलाकार फक्त उत्सुकच आहेत असे नाही तर समर्थही आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होत, पण तरीही परंपरेची नाळ न सोडता आजच्या जमान्यातील हे कलावंत आपल्यापरीने ही संगीतविद्या समृद्ध करीत आहेत. अशा काही गुणवान स्वरसाधक कलावंतांची ही मैफल म्हणजेच या वर्षासाठीचे थीम कॅलेंडर `स्वरसाधक' गळ्यात कॅमेरा घेऊन `सवाई गंधर्व महोत्सवा'त सतीश पाकणीकर यांनी प्रवेश केल्याला यावर्षी पस्तीस वर्षे पूर्ण होतील. या काळात जवळजवळ पाचशे गायकवादकांच्या हजारो भावमुद्रा त्यांना कॅमेराबद्ध करता आल्या. कलेच्या सादरीकरणात हरवून गेलेली ही कलावंत मंडळी जेव्हा आपल्या सादरीकरणात परमोच्च क्षण गाठतात, तो `निर्णायक' क्षण टिपण्याची त्यांची सदैव धडपड राहिली. त्या सर्व कलाकारांच्या गायन-वादनाबरोबरच त्यांना या निर्णायक क्षणांनीही अपरिमित आनंद दिला. त्यांचा हा आनंद सर्व संगीतप्रेमींत वाटून घेता यावा यासाठीच ही `थीम कॅलेंडर'ची निर्मिती करण्यात आली आहे. 

`स्वरसाधक' या कॅलेंडरमधील जवळजवळ सर्वच कलावंतांची कारकीर्द साकारताना पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले. या कलावंतांची सर्जनशीलता, बुद्धिमत्ता व संगीताप्रती निष्ठा यांचे आपण सर्व जण साक्षीदार आहोत. त्यांची नवोन्मेषशाली प्रतिभा जशी बहरत गेली, तशी त्यांच्या सादरीकरणात आलेली सहजता त्यांच्या भावमुद्रातून प्रकट होत गेली. या भावमुद्रा पाहताना रसिकांना क्षणभर का होईना त्या मैफिलीचा अनुभव आला तर ते या प्रकाशचित्रांचे यश असेल. 

या भावमुद्रांच्या बरोबरीनेच `मी व माझे संगीत' या विषयावर त्या कलावंतांनी व्यक्त केलेले विचार हे `स्वरसाधक' चे खास वैशिष्ट्य आहे. 

यंदाच्या `सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'च्या पहिल्याच दिवशी सवाईच्या प्रतिष्ठित स्वरमंचावरून रघुनंदन पणशीकर, उदय भवाळकर, श्रीनिवास जोशी, शौनक अभिषेकी, आनंद भाटे व प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या उपस्थितीत या कॅलेंडरचे प्रकाशन झाले. चला तर, आपण येणारं नवीन वर्ष या `स्वरसाधकां'च्या या भावमुद्रांसह त्यांच्या स्वरांनी साजरं करू या!  

संबंधित बातम्या