उपयुक्त रोटी मेकर्स

ज्योती बागल
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

व्हॉट्‌स न्यू
 

हल्ली प्रत्येक स्वयंपाकघरात अद्ययावत होम अप्लायन्सेस असल्याने काम करणे सुखकर झाले आहे. स्वयंपाक करणे ही प्रत्येकाची आवड असेलच असे नाही, मात्र ही गरज नक्कीच असू शकते. बऱ्याचदा शिक्षणासाठी, नोकरीसाठी मुलामुलींना, तरुणांना घरापासून लांब राहावे लागते. तेव्हा रोजरोज बाहेरचे खाणे परवडत नाही. त्यामुळे कमी वेळात घरातील काम, किंबहुना स्वयंपाकाचे काम सोपे आणि लवकर कसे होईल यावर सर्वांचा भर असतो. अशावेळी ‘रोटी मेकर’सारखी उपकरणे फायदेशीर ठरतात. 

सध्या बाजारात ‘बजाज व्हॅक्को 900W गो इझी’, ‘मोलो 900W रोटी मेकर’, ‘सनफ्लेम आरएम 900W रोटी मेकर’, ‘बाल्ट्रा बीटीआर २०१ मॅजिकूक रोटी मेकर’, ‘हिल्टन रोटी मेकर’ अशा अनेक कंपन्यांचे रोटी मेकर आहेत. रोटी मेकरच्या साहाय्याने कोणीही व्यक्ती कमी वेळात छान, मऊ, गोल अशी पोळी तयार करू शकते.

बजाज व्हॅक्को 900W गो इझी हा नॉनस्टिक रोटी मेकर आहे. यामध्ये फक्त रोटीच नाही तर पराठा, खाकरा, पापड आणि कुलचा अशा वेगवेगळ्या प्रकारचे रोटी प्रकारात मोडणारे पदार्थ करता येऊ शकतात. या रोटी मेकरची शॉकप्रूफ बॉडी असून हा वजनाने हलका आहे. तसेच यामध्ये एलईडी पॉवर इंडिकेटर असून यामध्ये बंद-सुरू करण्यासाठी ऑटोमॅटिक फीचर आहेत. याच्या तव्यावर केलेले नॉनस्टिक कोटिंग आणि यासाठी वापरलेल्या स्टेनलेस स्टीलमुळे हा बरेच वर्षे टिकू शकतो. तसेच हा काँपॅक्ट आणि पोर्टेबल आहे.

हिल्टन रोटी मेकर हा मल्टी युटीलिटी रोटी मेकर आहे. यामध्ये रोटीसह डोसा, ऑम्लेट, खाकरा आणि पापडही करता येतात. स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेला असल्याने बराच काळ टिकतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचा तवा मध्यभागी जरासा खोलगट आहे. ज्यामुळे ऑम्लेट किंवा डोशासारखे पदार्थ करताना त्याचे पातळ पीठ तव्याबाहेर येत नाही. यामध्ये पॉवर आणि ग्रीन असे दोन इंडिकेटर आहेत. यावरून रोटी मेकर वापरण्यासाठी तयार आहे हे समजते. नॉनस्टिक कोटिंगमुळे टिकाऊ तर आहेच, शिवाय सहज साफही करता येते.    

सनफ्लेम आरएम 1- 900-W रोटी मेकर हा जास्त मागणी असणारा रोटी मेकर आहे. याची शॉकप्रूफ बॉडी असून एलईडी पॉवर इंडिकेटरदेखील उपलब्ध आहे. या रोटी मेकरला नॉनस्टिक कोटिंग असल्यामुळे पीठ तव्याला चिकटण्याची काळजी नाही. हा सहजपणे स्वच्छ करता येतो. फक्त या रोटी मेकरमध्ये रोटी करताना पोळ्यांची तयार कणीक जरा मऊ आणि ओलसर असावी लागते, म्हणजे पोळ्या मऊ आणि छान होतात. 

 ईगल इलेक्ट्रिक रोटी मेकरचा तवा हा इतर रोटी मेकरपेक्षा थोडा लहान आहे. हा रोटी मेकर स्टेनलेस स्टील वापरून तयार केला असून याची बॉडीदेखील शॉकप्रूफ आहे. शिवाय याचे हॅंडलही मजबूत आहे. मात्र हा वजनाने तसा फार जड नाही. यामध्ये वापरलेल्या इंडिकेटरमुळे आपल्याला रोटी शिजल्याचे कळू शकते. शिवाय या रोटी मेकरमध्ये ड्युअल हिटींग फीचर वापरले आहे. पण यामध्ये खाकरा, पापड असे रोटीसारखे इतर पदार्थ करता येत नाहीत.

आणखी एक चांगला रोटी मेकर आहे, बाल्ट्रा बीटीआर २०१ मॅजिकूक रोटी मेकर. यामध्ये ड्युअल हिटींग फीचर वापरले असल्याने दोन्ही बाजूंनी रोटी व्यवस्थित, पूर्णपणे आणि पटकन शेकली जाते. यात वापरलेल्या ऑटोमॅटिक इंडिकेटर लाइटमुळे आपल्याला रोटी शेकल्याचे कळते. रोटी मेकरला असलेल्या नॉनस्टिक कोटिंगमुळे ही वस्तू टिकणारी आहे. मात्र बाजारात हा मेकर खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

हे सर्व रोटी मेकर्स अलीकडेच बाजारात आले असून खरेदीसाठी ऑनलाइन उपलब्ध आहेत. यांच्या सर्वसाधारण किमती दोन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.  

संबंधित बातम्या