स्मार्ट सिलिंग फॅन्स!

ज्योती बागल
सोमवार, 18 मे 2020

व्हॉट्‌स न्यू
 

फॅन हा आजच्या घडीला घरातील आवश्यक वस्तूंपैकी एक झाला आहे. सध्याचे सतत वाढणारे तापमान बघता फॅनची मागणी वाढू लागली आहे. यामध्ये सिलिंग फॅन असो की टेबल फॅन, तो सुरू-बंद करण्यासाठी सारखी ऊठ-बस करावी लागते. शिवाय आज घरात सगळ्या वस्तू स्मार्ट असताना, त्याला सिलिंग फॅन तरी अपवाद कसा असेल. अलीकडेच ‘हॅवेल्स’ आणि ‘लक्झर’ या कंपन्यांचे स्मार्ट सिलिंग फॅन्स बाजारात दाखल झाले आहेत, त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती.

हॅवेल्स इंडियाने स्मार्ट होम प्रॉडक्ट्सची सीरिज लाँच केली आहे. याच सीरिजमध्ये कंपनीने एक स्मार्ट सिलिंग फॅनही लाँच केला आहे. या स्मार्ट सिलिंग फॅनचे नाव कार्नेशिया-१ (Carnesia-I) असे आहे. या फॅनला अनेक स्मार्ट मोड दिले आहेत, त्यामुळे फॅन सुरू-बंद करण्यासाठी बटण दाबण्याची गरज नाही. हा फॅन केवळ आवाज दिल्याने सुरू-बंद होणार आहे. कारण या फॅनमध्ये ॲमेझॉन ॲलेक्सा आणि गुगल होमचा सपोर्ट देण्यात आला आहे. शिवाय यामध्ये टेंपरेचर आणि नमी यांसारखे मोडदेखील असल्याने हवामानाचा अंदाज बघून फॅनचा वेग आपोआप कमीजास्त होणार आहे. तसेच या फॅनमध्ये स्लीप आणि ब्रीज नाइट असेही मोड दिले आहेत. हॅवेल्सच्या या फॅनमध्ये स्पीडसाठी पाच लेव्हल्स दिल्या असून फॅनमध्ये टायमरदेखील दिला आहे. त्यामुळे फॅन कधी बंद करायचा हेदेखील ठरवता येते. या फॅनची किंमत ४,५०० रुपये आहे.

लक्झरी आणि स्मार्ट होम प्रॉडक्ट्सची निर्मिती करणारी लक्झर (Luxaire) प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीने भारतात आपला नवीन फॅन ‘लक्स १०२०’ लाँच केला आहे. हा फॅन हॉलिवूडच्या चित्रपटांत हमखास दिसतो. या फॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे या फॅनला केवळ एकच ब्लेड आहे. एबीएस ब्लेडमध्ये खास डिझाइन करण्यात आलेल्या एअरोफ्वॉइल प्रोफाइल आहे. त्यामुळे फॅन कमी आरपीएमवर चालू शकतो. इतर साध्या फॅनच्या तुलनेत हा फॅन निम्म्या विजेचा वापर करतो आणि जास्त हवा देतो. म्हणजेच, छोट्या खोलीत कमीतकमी आवाजात कुलिंग देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या फॅनच्या मोटरची वॉरंटी १५ वर्षांची दिली आहे. या फॅनची किंमत ९२ हजार रुपये एवढी जास्त आहे. याआधी लक्झरने भारतात आयओटी इनबिल्ट ‘लक्स ५१३०’ हा स्मार्ट फॅन लाँच केला होता. या फॅनमध्ये ब्रशलेस डीसी मोटर बसवलेली असून या मोटरमध्ये एलइडी लाइटही दिले आहे. फॅनला नेहमी तीन ब्लेड्स असतात, मात्र लक्झरच्या स्मार्ट फॅनमध्ये चार ब्लेड्स आहेत. यामध्ये मॅट व्हाइट आणि वॉलनट ब्लॅक हे दोन कलर उपलब्ध आहेत. या फॅनला मोबाइल आणि रिमोटने कंट्रोल करता येते. या फॅनमध्ये वाय-फायचा सपोर्ट देण्यात आला आहे. याचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात रेग्युलेटर लावण्याची गरज नाही. या फॅनला ॲमेझॉन ॲलेक्साचा सपोर्ट आहे. त्यामुळे व्हॉइस कमांडवर हा फॅन सुरू बंद करता येतो. या फॅनची किंमत एक लाख २५ हजार रुपये आहे.

संबंधित बातम्या