इको फ्रेंडली पाण्याच्या बॉटल्स

ज्योती बागल
सोमवार, 16 मार्च 2020

व्हॉट्‌स न्यू
 

सकाळ असो वा संध्याकाळ, घराबाहेर पडताना आपण आपल्याबरोबर एक पाण्याची बाटली नक्कीच ठेवतो. पण फक्त पाण्याची बाटली बरोबर असावी म्हणून कोणतीही प्लॅस्टिकची बाटली न वापरता इको फ्रेंडली बाटली वापरणे केव्हाही चांगले. त्यामुळे प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापरही कमी होईल आणि आपले आरोग्यही उत्तम राहील. सध्या बाजारात अनेक प्रकारच्या इको फ्रेंडली पाण्याच्या बाटल्या उपलब्ध आहेत. उदा. तांब्याच्या बाटल्या, सिरॅमिकपासून तयार केलेल्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, मातीच्या बाटल्या आणि स्टीलच्या बाटल्या... यामध्ये सर्वांत उत्तम पर्याय आहे तो स्टीलच्या बाटल्यांचा. या बाटल्या सुरक्षित असतात. त्यात ठेवलेल्या पाण्याला किंवा पदार्थाला मेटलचा वासही येत नाही आणि पाणी खूप वेळ थंड, पिण्यायोग्य राहते. 

कॉन्टिगो : कॉन्टिगो ऑटोस्पाऊट शेफिल्ड व्हॅक्युम-इन्सुलेटेड स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी योग्य आहे. कारण थर्मलॉक व्हॅक्युम इन्सुलेशनमुळे यामध्ये किमान अठरा तास तरी पाणी थंड राहते. लीक प्रूफ झाकण असल्यामुळे पाणी गळण्याची भीती नाही. यामध्ये वापरलेल्या प्रोटेक्टिव्ह बॅकिंग कव्हरमुळे जंतूंना अटकाव होतो. या बाटलीला ऑटोस्पाऊट झाकण असून त्यावर पॉप-अप स्ट्रॉ दिला आहे, त्यामुळे वापरणे सोपे जाते.

सेलो स्विफ्ट स्टील फ्लास्क : ही बाटली १.५ लिटरची असून सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे. या बाटलीचा उपयोग गरम आणि थंड दोन्ही पेय पदार्थांसाठी होतो. यामध्ये किमान २४ तास तरी पेय पदार्थाचे तापमान राखले जाते. शिवाय डबल वॉल स्टेनलेस स्टील इन्सुलेटेड फ्लास्क बाटलीमधून पाणी गळत नाही. ही बाटली चांगल्या प्रतीचे स्टेनलेस स्टील आणि थर्मो सील हे तंत्रज्ञान वापरून तयार केली आहे.

झॅफोस स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल : या बाटलीची क्षमता ७५० मिली असून ती वजनाने हलकी आहे; शिवाय टिकाऊदेखील आहे. बाटलीच्या आतील आणि बाहेरील अशा दोन्ही बाजू टिकाऊ आहेत. बाटलीला असलेल्या स्पिल प्रूफ झाकणामुळे पाणी गळत नाही. याचे खास डिझाइन केलेले व्हॅक्युम सील गळती होऊ देत नाही. ही स्टेनलेस स्टीलपासून तयार केली असून सिल्व्हर रंगात मिळते.

सेलो स्वीफ्ट स्टेनलेस स्टील फ्लास्क बॉटल : ही बाटली एक लिटरची असून चांगल्या प्रतीच्या स्टेनलेस स्टील आणि थर्मो सील तंत्रज्ञानापासून तयार केली आहे. डबल वॉल स्टेनलेस स्टील इन्सुलेटेड फ्लास्कमुळे बाटलीमधून पाणी गळत नाही. या बाटलीचा उपयोग गरम आणि थंड असे दोन्ही पेय पदार्थ ठेवण्यासाठी होतो. यात ठेवलेले पेय २४ तासांपर्यंत आहे तसे राहते. याचे ट्रेंडी डिझाईन तरुणांना आवडेल असे आहे. शिवाय रॉयल ब्ल्यू रंगामुळे बाटली जास्त आकर्षक दिसते. 

थर्मास स्टेनलेस किंग : या बाटलीमध्ये पेय पदार्थ जास्तीत जास्त वेळ आहेत तसे राहण्यासाठी थर्मास व्हॅक्युम इन्सुलेशन तंत्रज्ञान वापरले आहे. ही गरम आणि थंड अशा दोन्ही पेय पदार्थांसाठी वापरता येते. यामध्ये गरम पेय किमान १८ तास गरम राहते, तर थंड पेय २४ तास थंड राहते. ही बाटली मॅट ब्लॅक रंगात उपलब्ध असून तिचे डिझाईनही छान आहे. स्टेनलेस स्टीलपासून तयार केली असल्याने टिकाऊ आहे.

यांपैकी काही बॉटल्स थर्मास म्हणूनही वापरता येतात. यांच्या सर्वसाधारण किमती पाचशे ते दोन हजार रुपये दरम्यान आहेत. 

संबंधित बातम्या