शाओमीचे मुलांसाठी स्मार्टवॉच!

ज्योती बागल
गुरुवार, 23 जानेवारी 2020

व्हॉट्‌स न्यू
 

आजचा जमाना स्मार्ट गॅजेट्सचा आहे. त्यामुळे आपली लाइफस्टाइल स्मार्ट, इझी करण्याकडे सर्वांचा कल असतो. पालक स्मार्ट होत असताना मुलांनी मागे राहून कसे चालेल... हल्ली अनेक प्रकारचे स्मार्टवॉच बघायला मिळतात. ज्यांचा वापर फक्त वेळ बघण्यापुरता नसतो, तर या स्मार्टवॉचचे कॉलिंग, मेसेजिंग, GPS ट्रॅकिंग असे अनेक फायदे आहेत. काही स्मार्टवॉच हे वजनाने हलके असतात, तर काही अगदी पातळ असतात, तसेच काही अगदी मोठ्या आकाराचे असतात. तर काही काँपॅक्ट स्वरूपातही उपलब्ध आहेत. 

मोटोरोला, एलजी, सॅमसंग, सोनी अशा अनेक बड्या कंपन्यांनी असे स्मार्टवॉच बाजारात आणले आहेत. परंतु, खास मुलांसाठी शाओमी (Xiaomi)ने नुकतेच एक स्मार्टवॉच लाँच केले आहे. या स्मार्टवॉचचे नाव ‘Mitu Children Learning Watch 4Pro’ असे आहे. हे स्मार्टवॉच मुलांना विचारात घेऊन तयार केले असून यामध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यांचा मुलांना खूप फायदा होऊ शकतो. 

याआधीदेखील शाओमीने लहान मुलांसाठी Mi ‘बनी’ या नावाने स्मार्टवॉच बाजारात आणले होते. यामध्येही GPS कनेक्टिव्हीटी उपलब्ध होती. या स्मार्टवॉचप्रमाणेच ‘Mitu Children Learning Watch 4Pro’ हे वॉच असून यामध्ये आणखी फीचर्स अॅड केली आहेत. 

‘Mitu Children Learning Watch 4Pro’ हे लर्निंग प्रोसेससाठी जास्त उपयुक्त ठरणार आहे. कारण  बऱ्याचदा पालक कामात गुंतलेले असतात. अशावेळी मुलांकडे पाहिजे तेवढे लक्ष देता येत नाही. तसेच त्यांचा अभ्यासही घेता येत नाही. अशावेळी अशा स्मार्टवॉचचा वापर करून मुले स्वतः शिकू शकतात. तसेच लर्निंग प्रोसेस इंटरेस्टिंग झाल्यामुळे त्यांना शिकण्याचा कंटाळा येत नाही.  

 महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टवॉचच्या माध्यमातून पालक आपल्या मुलांवर चोवीस तास लक्ष ठेवू शकणार आहेत. कारण या स्मार्टवॉचला दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. एक वाइड अॅंगल असलेला कॅमेरा असून तो ५ मेगापिक्सेलचा आहे, तर दुसरा ८ मेगापिक्सेलचा झूम कॅमेरा दिला आहे. हे कॅमेरे पालकांना मुलांच्या हालचाली आणि आजूबाजूची परिस्थिती दाखवणार आहे. या दोन कॅमेऱ्यांपैकी एका कॅमेऱ्याचा वापर करून पालक मुले करत असलेल्या गोष्टींवर लक्ष ठेवू शकतात. 

 हे स्मार्टवॉच १० पटींनी अधिक AI पोझिशनिंगचा वापर करते. यामध्ये L1+L5 ड्युअल फ्रीक्वेन्सी GPS कॉर्डिनेटेड पोझिशनिंग सिस्टिम देण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच Qualcomm Snapdragon Wear 2500 प्रोसेसरने युक्त आहे. 

यामध्ये 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या वॉचला आपल्याला हवे तसे कस्टमाइज करता येते. Android 8.1 OS वर आधारीत या स्मार्टवॉचचा मुले सहजपणे वापर करू शकणार आहेत. या वॉचमध्ये कॉलिंगचादेखील पर्याय उपलब्ध असून व्हॉइस असिस्टंट हे फीचरही इनबिल्ट आहे.

 शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे विषय, जसे की इंग्रजी, गणित, सोशल सायन्स, फन, लॉजिकल थिंकिंग यांसारख्या अनेक अॅप्सचा इथे अॅक्सेस दिला आहे. तसेच हे वॉच इन्टरॅक्टिव्ह लर्निंग टुललाही सपोर्ट करते. शिवाय युजर हाय क्वालिटी लर्निंग अॅपही वापरू शकतात. 

 ‘Mitu Children Learning Watch 4Pro’मधले खास फीचर म्हणजे या स्मार्टवॉचला 2.5D कर्व्ह ग्लासबरोबर १.७८ इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच स्क्रॅचेससारख्या गोष्टींपासून घड्याळ खराब होऊ नये म्हणून त्याला 9H hardness चे कोटिंग केलेले आहे. यामध्ये HD Dual कॅमेरा आणि Dual GPS कनेक्टिव्हिटीची सुविधादेखील उपलब्ध आहे. शिवाय 4G LTE आणि NFC सपोर्टही आहे.

सध्या हे स्मार्टवॉच फक्त चीनमध्ये लाँच करण्यात आले असून याची किंमत १३,४५० रुपये एवढी आहे.

संबंधित बातम्या