स्मार्ट स्पीकर्स का है जमाना

ज्योती बागल
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

व्हॉट्‌स न्यू
 

स्मार्ट गॅजेट्सची सध्या चलती असून सर्वच गॅजेट्स स्मार्ट स्वरूपात उपलब्ध होत आहेत... आणि गाणी ऐकायचा छंद लहान थोर अशा सर्वांनाच असतो. बाजारात अनेक कंपन्यांचे स्पीकर्स, इअरबर्ड्स, हेडफोन्स उपलब्ध होत आहेत. यामध्ये स्पीकरचेही अनेक डिझाइन्स आणि नवीन मॉडेल्स बघायला मिळत आहेत. गेल्या दीड-दोन महिन्यांत अनेक प्रकारचे स्मार्ट स्पीकर्स लाँच झाले आहेत. ‘ॲमेझॉन एको इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकर’ आणि ‘गुगल नेस्ट मिनी स्मार्ट स्पीकर’चा सध्या बोलबाला आहे. 

ॲमेझॉन एको (Amazon Echo) इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकर हा अलीकडेच भारतात लाँच झाला आहे. स्मार्ट स्पीकर निर्माता आणि ई-कॉमर्स ॲमेझॉन कंपनीने एको सीरिजमधील हा दुसरा स्पीकर लाँच केला आहे. या स्पीकरची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. ग्राहकांनी डिसेंबरमध्येच या स्पीकरची प्री-ऑर्डर द्यायला सुरुवात केली होती. याआधी २०१८ मध्ये या सीरिजमधला पहिला स्पीकर लाँच झाला होता. 

ॲमेझॉन एको इनपुट पोर्टेबल स्मार्ट स्पीकरचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स उत्तम आहेत. हा स्पीकर कुठेही नेणे अतिशय सोयीस्कर असल्याने ग्राहकांची या स्पीकरला पसंती आहे. शिवाय त्याचे डिझाइन आणि साइझ लहान असल्याने तो सहज आपल्याबरोबर बाळगता येतो आणि संभाळणेही सोपे जाते. महत्त्वाचे म्हणजे स्पीकरला वायरलेस फीचरदेखील दिले आहेत. या पोर्टेबल स्मार्ट स्पीकरला ४ हजार ८०० एमएचची बॅटरी दिली आहे. त्यामुळे युजर्सना १० तास बॅटरी बॅकअपची सुविधा मिळत असून सलग दहा तास हा स्पीकर वापरता येऊ शकतो. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा स्प्लॅश रेझिस्टन्ट आहे. या स्पीकरच्या वरच्या बाजूस चार मायक्रोफोन्स दिले आहेत. यामुळे हे उपकरण यूजर्सच्या व्हॉइस कमांड्स सहजपणे ऐकू शकते. या उपकरणात असलेले स्पीकर १.३ व्हॅट पॉवर असणारे आहेत. तर ऑडिओ आउटपूटसाठी ३६० डिग्री सिलिंड्रिकलचे फीचर्स दिले आहेत. याचे वजन फक्त ५१८ ग्रॅम असल्याने हा सहजपणे हाताळता येतो. 

अलीकडेच गुगलनेदेखील भारतात स्मार्ट ‘नेस्ट मिनी’ स्पीकर लाँच केला आहे. पिक्सेल ४ सीरिजसह हा स्पीकर जगभरात लाँच झाला आहे. भारतात याची किंमत ४ हजार ४९९ रुपये आहे. हा स्पीकर यू-ट्यूब म्युझिक आणि जिओ-सावनसारख्या अनेक म्युझिक स्ट्रीमला सपोर्ट करू शकतो. असे म्हटले जाते की गेल्या वर्षी लाँच झालेल्या गुगल होम मिनीचे हे अपग्रेड व्हर्जन आहे. या स्मार्ट स्पीकरची खरेदी ग्राहक फ्लिपकार्टवरून करू शकतात. याचे डिझाइन ‘होम मिनी’सारखे असून याला कनेक्टर पोर्ट आणि केबल जोडली असून खालच्या बाजूला मायक्रोफोन स्लाइडर स्विच आणि फॅब्रिक टॉप कव्हरच्याखाली लाइट्स दिल्या आहेत. याला अनेक म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिसेस सपोर्ट करत असून याच्या आवाजाची गुणवत्ता उत्तम असल्याचा दावा गुगलने केला आहे. त्यासाठी डिव्हाइसमध्ये डेडिकेटेड मशीन लर्निंग चीप बसवली आहे. हा स्पीकर चॉक आणि चारकोल दोन रंगांत उपलब्ध आहे. याचा उपयोग ईमेल वाचण्यासह अनेक कामांसाठी हा स्पीकर उपयुक्त आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स असून ब्लू-टूथ आणि वाय-फायची सुविधादेखील देण्यात आली आहे. हा स्पीकर होम मिनी अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींना सपोर्ट करतो. ब्लू-टूथबरोबरच क्रोमकास्ट आणि क्रोमेकास्ट ऑडिओ बिल्ट-इन फीचर्स देण्यात आले आहे. सध्या भारतीय बाजारात ‘गुगल नेस्ट मिनी स्पीकर’ आणि ‘ॲमेझॉन डॉट’ यांच्यात स्पर्धा पाहायला मिळते आहे.

संबंधित बातम्या