रियलमीचे मोबाइल फोन्स

ज्योती बागल
सोमवार, 9 मार्च 2020

व्हॉट्‌स न्यू
 

रियलमी ही स्मार्टफोन निर्मितीतली चीनची एक मोठी कंपनी आहे. भारतात या कंपनीचे स्मार्टफोन्स वापरणारा एक मोठा वर्ग असून या मोबाइल फोन्सना सध्या बाजारात चांगली मागणी आहे. आपले वाढते ग्राहक आणि त्यांची मागणी लक्षात घेऊन कंपनीने ‘रियलमी 6 सीरिज’ स्मार्टफोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात लाँच करण्याचे ठरवले आहे. याआधी ‘रियलमी  X2 Pro’ लाँच झाला होता. या स्मार्टफोनला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर कंपनीने ‘सीरिज 6’ स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. ही कंपनीची बजेटमधील स्मार्टफोन सीरिज आहे. या सीरिजमध्ये ‘रियलमी 6’ आणि ‘रियलमी 6 Pro’ स्मार्टफोन लाँच होणार आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत १० ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. 

याआधी कंपनीने ‘रियलमी X2’ लाँच केला होता. या फोनमध्ये रॅम आणि स्टोरेजचे तीन व्हर्जन लाँच केले होते. याची किंमत १६ हजार ९९९ रुपयांपासून १९ हजार ९९९ रुपयांपर्यंत आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा असून प्रायमरी सेन्सर म्हणून ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ‘X2’ शिवाय रियलमीने ‘X2 Pro’ भारतीय बाजारात उपलब्ध केला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे, तर दुसऱ्या फोनची किंमत ३५ हजार रुपये आहे.

रियलमीने भारतीय बाजारपेठेत आत्तापर्यंत प्रो सीरिजच्या एकूण ९० लाख स्मार्टफोन्सची विक्री केल्याची माहिती आहे. या स्मार्टफोन्सबरोबरच रियलमी लवकरच भारतात सर्वांत स्वस्त असे ‘5G’ स्मार्टफोनही घेऊन येत असल्याची माहिती कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी दिली असून रियलमी कंपनी २०२० पर्यंत भारतातील उत्पन्न दुप्पट करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. याशिवाय कंपनी स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बॅंड्स, स्मार्ट वॉच आणि अनेक प्रॉडक्ट्स लाँच करण्याची योजना कंपनीने आखल्याची माहितीही त्यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना दिली आहे.             

याआधी कंपनीने ३० हजारांपेक्षा महाग असलेला स्मार्टफोन लाँच केला होता. पण आता मात्र ही कंपनी वेगवेगळ्या किमतीतील टेक्नॉलॉजीतील सपोर्ट करणारे अनेक डिव्हाइसेस लाँच करणार असून त्यानंतर स्वस्तातील ‘5G’ स्मार्टफोन लाँच करणार आहे. ‘5G’साठी त्यांच्याकडे अनेक चिपसेट असून ते आधी त्यांच्या फ्लॅगशिप चिपसेटबरोबर सुरुवात करणार आहेत. मागच्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये रियलमी इंडियाने १४ हजार ७०० कोटी रुपयांची विक्री केली होती. त्यामध्ये जवळपास १५० लाख स्मार्टफोनची विक्री झाल्याची माहिती आहे. २०२० मध्ये मात्र यात वाढ करून तीन कोटी युनिटपर्यंत विक्री करण्याचे लक्ष्य या कंपनीने ठेवले आहे. रियलमीचा ग्राहकवर्ग मोठा असल्याने सध्या रियलमीच्या वेगवेगळ्या ३ फोन्सवर दोन हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर मिळत आहे. यामध्ये ‘Realme 5 Pro’, ‘Realme X’ आणि ‘Realme XT’ या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा डिस्काउंट रियलमीच्या अधिकृत वेबसाइटसह अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरदेखील सुरू आहे. यासंबंधीची माहिती माधव सेठ यांनी ट्विटरवरून दिली आहे. 

रियलमीशिवाय शाओमीचा ‘रेडमी नोट 8 Pro’ हा स्मार्टफोनदेखील बाजारात उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला असून याची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.

संबंधित बातम्या