फिटनेस ट्रॅकर ‘चार्ज 4’ची एंट्री

ज्योती बागल
सोमवार, 20 एप्रिल 2020

व्हॉट्‌स न्यू
 

आजच्या घडीला सर्वांना फिटनेसचे महत्त्व लक्षात आले आहे. त्यासाठी सर्वच वयोगातील व्यक्ती नियमित व्यायाम करताना दिसतात. मात्र बऱ्याचदा ठरलेल्या वेळेपेक्षा रनिंग, स्विमिंग, वॉकिंग हे कमी-जास्त होते. त्यामुळे व्यायामात सातत्य राहत नाही. अशा वेळी कोणत्याही गोष्टीसाठी ठराविक वेळ ठरवून, तेवढा वेळ तो व्यायाम करणे जास्त उपयुक्त ठरते. या गोष्टी विचारात घेऊन अनेक नामांकित कंपन्या फिटनेस ट्रॅकर, स्मार्ट वॉच, स्मार्ट बँड्स बाजारात आणत आहेत. वेअरेबल्समधील अशीच एक जगप्रसिद्ध टेक कंपनी म्हणजे ‘फिटबीट’! या कंपनीने नुकताच ‘फिटबीट चार्ज 4’ हा ट्रॅकर लाँच केला आहे.        

फिटबीट चार्ज 4 आणि याचबरोबर आणखी एक स्पेशल ट्रॅकर असे दोन प्रकारचे ट्रॅकर कंपनीने आणले आहेत. या दोन्हीही ट्रॅकरमध्ये युजर्ससाठी काही खास फीचर्स देण्यात आली आहेत. या ट्रॅकरमध्ये इन-बिल्ट जीपीएस, स्पॉटिफाय आणि स्लीप ट्रॅकिंग अशी फीचर्स दिली आहेत. हे ट्रॅकर ब्लॅक, रोजवूड, स्टॉर्म ब्ल्यू या रंगांमध्ये उपलब्ध आहे.        

फिटबीट चार्ज 4ची किंमत १४,९९९ रुपये आहे, तर याच्या स्पेशल एडिशनची किंमत १६,९९९ रुपये आहे. या फिटबीट चार्ज 4 ची बॅटरी सात दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. या ट्रॅकरमध्ये रनिंग, स्विमिंग आणि वॉकिंगसारख्या गरजेच्या ॲक्टिव्हिटीजही ट्रॅक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच यामध्ये स्मार्ट वेक फीचरचीही सोय आहे. याच्या मदतीने सहजरीत्या युजर्स त्यांची झोप ट्रॅक करू शकणार आहेत. त्याशिवाय यांच्यामध्ये झोपेच्या योग्य पद्धतीची माहितीही दिली आहे.
 याआधी फिटबीटने ‘चार्ज 3’ आणि ‘चार्ज 2’ हे फिटनेस ट्रॅकर भारतीय बाजारात आणले आहेत. ‘चार्ज 3’ हे ‘चार्ज 2’चे अद्ययावत मॉडेल असल्याचे बोलले जाते. मागच्या वर्षी लाँच केलेला ‘फिटबीट वर्सा 2’ ट्रॅकर बघितला, तर त्यामध्ये रनिंग, सायकलिंग, योगा आणि स्लीप ट्रॅकिंग मोड दिले होते. त्याचबरोबर या डिव्हाईसमध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले दिला होता, त्यामुळे वेळ काय झाली आहे ते सहज समजायचे. याची बॅटरी मात्र पाच दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. फिटबीटने दोन वर्षांपूर्वी ‘फिटबीट आयोनिक’ या नावाने आपले पहिले स्मार्ट वॉच बाजारात आणून आरोग्यविषयक बाबींना त्यामध्ये प्राधान्य दिले होते. त्यामध्ये हार्ट रेट मॉनिटर आणि जीपीएस ट्रॅकिंग या दोन महत्त्वाच्या सुविधा देण्यात आल्या होत्या. शिवाय ते स्मार्टवॉच वॉटरप्रूफही होते.            

फिटबीट ही कंपनी आघाडीवर असली, तरी मागच्या दोन वर्षांत ॲपल, सॅमसंग आणि शाओमीसारख्या कंपन्या किफायतशीर दरात फिटनेस ट्रॅकर, स्मार्ट ब्रँड, स्मार्ट वॉचेस आणून या कंपनीला चांगलीच टक्कर देत आहेत. 

संबंधित बातम्या