अमेजफिटचे फेस मास्क! 

ज्योती बागल
शुक्रवार, 29 मे 2020

व्हॉट्‌स न्यू
जगभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव  बघता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रोज काही ना काही नवीन अत्यावश्यक साधने बाजारात दाखल होत आहेत. यामध्ये सानिटायझर, फेस मास्क, ग्लोव्ह्ज अशा वस्तुंचा समावेश होतो. अशाच बाजारात दाखल होण्याच्या तयारीत असलेल्या मास्कची थोडक्यात माहिती...

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व प्रकारच्या मास्कची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या लोक एन-95 हे मास्क वापरण्याला प्राधान्य देत आहेत, मात्र हे मास्क सर्वांना परवडतील असे नाही; शिवाय एन-95 सारखे महागडे मास्कही जास्तीत जास्त चोवीस तास टिकतात, त्यानंतर तेही खराब होतात. बरेच लोक तर घरी तयार केलेलेच मास्क वापरत आहेत. सरकारनेही घरी तयार केलेले मास्क वापरायला सांगितले आहे. हे मास्क वापरानंतर स्वच्छ करून पुन्हा वापरताही येतात आणि परवडतातही. मात्र कोरोना हा विषाणू भयंकर आहे. त्यासाठी औषधांबरोबरच उत्तम प्रतीचे मास्क असणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून हुआमी कंपनी त्यांच्या अमेजफिट (Amazfit) या ब्रॅंडअंतर्गत अशाच प्रकारचा मास्क लाँच करण्याच्या तयारीत आहे.

या मास्कची खासियत म्हणजे हा  स्वतः  डिसइनफेक्ट (व्हायरस मुक्त) होऊ शकतो. सेल्फ डिसइनफेक्टिंगसाठी या मास्कमध्ये अल्ट्रा व्हॉयलेट (UV) लाइटचा सपोर्ट दिला आहे. अमेजफिटच्या या मास्कला ‘एअरी’ (Aeri) असे नाव देण्यात आले आहे. या मास्कचे डिझाइन तयार असून हा मास्क पूर्णपणे ट्रान्सपरंट असणार आहे. त्यामुळे लॉक, अनलॉक करणे सहज जमू शकते. हा मास्क अँटी फॉग मटेरिअल वापरून तयार केला जात आहे.  या मास्कला एक प्लगही दिला आहे, ज्यातून विजेशी कनेक्ट करता येते. याला वीज कनेक्ट करताच फक्त दहा मिनिटांमध्ये मास्क स्वत: साफ होणार आहे. परंतु, अल्ट्रा व्हॉयलेटच्या मदतीने फक्त मास्कच्या आतील भागच साफ होऊ शकतो. त्यामुळे मास्कला बाहेरून तुम्हालाच साफ करावे लागणार आहे.    सध्या तरी एअरी मास्कचा फक्त नमुना समोर आला आहे. या मास्कमध्येदेखील एन-95 मास्कसारखेच उच्च दर्जाचे फिल्टर दिल्याचे बोलले जात आहे. हुआमीच्या औद्योगिक डिझाइनचे उपाध्यक्ष पेंगताओ यू के यांच्या म्हणण्यानुसार हे मास्क बाजारात दाखल होण्यासाठी आणखी सहा ते बारा महिने लागू शकतात.

हुआमी ही शाओमीच्या मालकीचीच कंपनी आहे. मागच्याच महिन्यात शाओमीच्या फेस मास्कच्या पेटंटला मंजुरी मिळाल्याचे वृत्त होते. त्यामुळे आता शाओमी उत्तम प्रतीचे फेस मास्क बाजारात आणण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. हे येणारे फेस मास्क जास्त फ्लेक्सिबल असून त्यांची फिटिंग आरामदायी असू शकेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत शाओमीबरोबरच इतर अनेक कंपन्या त्यांच्या ब्रँडचे मास्क बाजारात आणतील हे नक्की. 

संबंधित बातम्या