‘झूक’चा ‘इंफ्रा टेंप’ थर्मामीटर

ज्योती बागल
सोमवार, 1 जून 2020

व्हॉट्‌स न्यू
स्वत:ला, आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांना आजारापासून लांब ठेवण्यासाठी त्यांच्या शारीरिक तापमानाची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. रोज-रोज प्रत्येकाला दवाखान्यात घेऊन जाणे शक्य नसते; शिवाय कामावर, कार्यालयात येणारे लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असतात. अशावेळी संसर्ग वाढण्याची भीती असते. त्यामुळे घर असो की कामाचे ठिकाण, सर्वांचे शारीरिक तापमान नियमित तपासले पाहिजे, त्यासाठी इंफ्रारेड डिजिटल थर्मामीटरची नक्कीच मदत होईल.

फ्रेंच ब्रॅंड ‘झूक’(ZOOOK)ने कोविड-१९ चा वाढता प्रभाव आणि सर्वसामान्यांना भासणारी थर्मामीटरची गरज लक्षात घेऊन नुकतेच एक इंफ्रारेड थर्मामीटर लाँच केले आहे. हे थर्मामीटर अत्याधुनिक कॉन्टॅक्टलेस मेडिकल ग्रेड थर्मामीटरने विकसित केले आहे. ‘इंफ्रा टेंप’ नावाचे  इंफ्रारेड डिजिटल ड्युअल मोड थर्मामीटर शरीराच्या तापमानाचे अचूक रीडिंग करते. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हे थर्मामीटर शरीराला कसलाही स्पर्श न करता, एका सेकंदात शरीराचे अचूक तापमान दाखवते.

इंफ्रा टेंप थर्मामीटरवर एक वर्षाची गॅरंटी असून हा खरेदीसाठी ऑनलाइन उपलब्ध आहे. या थर्मामीटरमध्ये इनबिल्ट अलार्म सिस्टीम दिलेली आहे. या अलार्म सिस्टीममुळे शरीराचे तापमान प्रमाणापेक्षा जास्त वाढले, की हा अलार्म वाजू लागतो. ही सिस्टीम लाइटवर आधारित असून यामध्ये सामान्य तापमान, उच्च तापमान अशा तापमानानुसार पांढरा, नारंगी आणि लाल या तीन रंगांच्या लाइट्स दिल्या आहेत. इंफ्रारेड थर्मामीटरमध्ये साधारण ३० ग्रुप्सचे रीडिंग्ज व्यक्तीनुसार सेव्ह करून ठेवण्याची क्षमता आहे. एवढी जास्त क्षमता असल्याने कंपनी, सरकारी कार्यालये अशा ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या नियमित तपासणीसाठी याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. शिवाय गरज पडल्यास आपल्याला त्या रीडिंग्ज तात्काळ उपलब्धही होऊ शकतात. हे थर्मामीटर सेल्सिअस आणि फॅरेनहाईट अशा दोन्ही प्रकारात तापमान दाखवते. त्यासाठी मशीनवर एक ऑन-स्क्रीन मेन्यूचा पर्याय दिला आहे, ज्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करता येतो. या थर्मामीटरची किंमत ३,९९९ रुपये आहे.

इंफ्रा टेंप थर्मामीटरच्या डिझाइनवरही विशेष लक्ष दिल्याचे दिसते. इंफ्रा टेंपला कार्यरत ठेवण्यासाठी आपल्याला फक्त दोन ‘AAA’ बॅटरीज आवश्यक असतात. अल्ट्रा-लो पॉवर, पॉवर डिस्प्ले आणि लो-पॉवर रिमाइंडरसारख्या गोष्टींमुळे हे थर्मामीटर जास्त आकर्षक वाटते. शिवाय,  द्रवपदार्थापासून संरक्षण करण्यासाठी यामध्ये ‘IPXD’ प्रोटेक्शनही देण्यात आले आहे. हा थर्मामीटर तीन रंगांच्या बॅकलिट एलसीडी स्क्रीनमध्ये येतो. यामध्ये असणाऱ्या व्हाइट बॅकलाइटच्या मोठ्या स्क्रीन डिस्प्लेच्या मदतीने रात्रीच्यावेळीदेखील या थर्मामीटरने सहज रीडिंग्ज पाहता येऊ शकतात. आणखी एक खास बाब म्हणजे हे थर्मामीटर ॲटोमॅटिकली शटडाऊन होते, म्हणजे गरज नसताना सुरू राहिल्यास थोड्या वेळात  ते  आपोआप बंद होते.

झूकच्या या थर्मामीटरबद्दल बोलताना कंट्री प्रमुख अचिन गुप्ता म्हणाले, ‘बाजारात अशा प्रकारचे अनेक थर्मामीटर उपलब्ध आहेत, मात्र इंफ्रा टेंपची अचूकता आणि त्याचा सहज वापर या उत्पादनाला सध्याच्या परिस्थितीत खास ठरवते. शिवाय जापानी मेडिकल ग्रेड हाय ॲक्युरेसी सेंसर असलेले आमचे हे उत्पादन युरोपियन सीई प्रमाणपत्रासह येते.’

काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रॉनिक कंपनी डीटेलनेदेखील इंफ्रारेड थर्मामीटर ‘डीटेल प्रो’ (Detel Pro) लाँच केले आहे. या थर्मामीटरची किंमत २,९९९ रुपये असून हे  कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. हे थर्मामीटरदेखील डिजिटल सेंसरसह येते; शिवाय यामध्ये एलसीडी डिस्प्ले दिला असल्याने रात्रीच्यावेळीसुद्धा याचा वापर सहज करता येतो. यावरही एक वर्षाची वॉरंटी आहे.

संबंधित बातम्या