इलेक्ट्रिक टूथब्रशचा बोलबाला 

ज्योती बागल
बुधवार, 24 जून 2020

दिवसभरात सर्व प्रकारचे पदार्थ आपण खात असतो. त्यामुळे अन्नाचे काही कण दातात अडकून राहिलेले असतात. हे दातात अडकलेले कण वेळीच काढले नाहीत, तर दात किडण्याची भीती असते. त्यामुळे योग्य टूथब्रशने दात साफ केल्यास नक्कीच फायदा होईल. यासाठीच शाओमीने इलेक्ट्रिक टूथब्रश लाँच केला आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती...

शाओमी या प्रसिद्ध चिनी कंपनीने नुकताच ‘एमआय टूथब्रश टी १००’ (Mi Electric Toothbrush T100) हा इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच केला आहे. शाओमीने याआधी तीन महिन्यांपूर्वी ‘एमआय टूथब्रश टी ३००’ (Mi Electric Toothbrush T300) टूथब्रश भारतात लाँच केला होता. लेटेस्ट लाँच केलेला एमआय टूथब्रश टी १०० हा आधीच्या टूथब्रशपेक्षा जास्त पॉकेट फ्रेंडली आहे. या टूथब्रशच्या बाबतीत कंपनीने केलेल्या दाव्यांपैकी सर्वात महत्त्वाचा दावा म्हणजे हा टूथब्रश डेंटिस्टच्या सल्ल्याने तयार केला आहे.

 ‘एमआय टूथब्रश टी १००’ या टूथब्रशची वैशिष्ट्ये म्हणजे या टूथब्रशमध्ये ड्युअल-प्रो ब्रश मोड देण्यात आले आहेत. हा इक्विक्लीन ऑटो टायमरबरोबर येतो. या सर्व मोड्सच्या मदतीने युजर्स आपले दात व्यवस्थित साफ करू शकतात. हा युजरला ३० सेकंदांनंतर एकाचवेळी किती वेळ खर्च करायचा याची माहिती देते. ‘एमआय टूथब्रश टी १००’ या टूथब्रशची डिझाइन अल्ट्रा सॉफ्ट आहे. या टूथब्रशमध्ये साधे नायलॉन ब्रिस्टल न वापरता नेहमीपेक्षा ९३ टक्के पातळ ब्रिस्टल दिले आहेत. शिवाय लो-नॉइज डिझाइन, स्टॅंडर्ड व जेंटल असे मोड आणि जवळजवळ ३० दिवसांची दमदार बॅटरी दिली आहे. हा टूथब्रश फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात बॅटरी स्टेटस सांगण्यासाठी एक एलईडी इंडिकेटर दिले आहे. हा इलेक्ट्रिक टूथब्रश IPX7 रेटिंगबरोबर येतो. हा ब्रश पाण्यात असूनही खराब होत नाही. या टूथब्रशमध्ये व्हाइट हा एकच कलर उपलब्ध आहे. या ब्रशचे वजन ४६ ग्रॅम आहे.

 हा इलेक्ट्रिक टूथब्रश एमआयच्या क्राउडफंडिंगअंतर्गत मी डॉट कॉमवर उपलब्ध आहे. याची किंमत ५४९ रुपये एवढी आहे. या टूथब्रशची विक्री १५ जुलैपासून सुरू होणार आहे. शाओमीने या ब्रशसंदर्भात इतर माहिती दिली असली, तरी ब्रश हेड्सच्या उपलब्धतेबद्दल काहीही माहिती दिली नाही. असेही बोलले जात आहे, की ओरल-बी आणि कोलगेटच्या इलेक्ट्रिक टूथब्रशला शाओमीचा हा टूथब्रश टक्कर देऊ शकतो. ओरल-बी क्रॉसॲक्शन बॅटरी टूथब्रशची किंमत ३५९ रुपये आहे, तर कोलगेट ३६० चारकोल बॅटरी टूथब्रशची किंमत ५९९ रुपये आहे. हे दोन्ही ब्रश मात्र बऱ्याच आधीपासून बाजारात उपलब्ध आहेत. कोलगेट ३६० चारकोल ब्रश ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असून त्याचे डिझाइनही छान आहे. 

 मॅन्युअल टूथब्रश आणि इलेक्ट्रिक टूथब्रश यांच्या वापरण्याच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत. म्हणजे ब्रशिंग टायमिंग, फ्रिक्वेन्सी आणि टेक्निक. शिवाय ओरल-बी इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये अनेक डिझाइन्स उपलब्ध आहेत. हे इलेक्ट्रिक टूथब्रश वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

संबंधित बातम्या