भारतीय कंपन्यांची वापसी?
मागील आठवड्यात भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढला होता. याचा परिणाम म्हणून #vocalforlocal या चळवळीअंतर्गत चिनी वस्तूंना सर्वच स्तरांतून प्रचंड विरोध होऊ लागला आहे. त्यामागे नक्कीच भावनिक कारण आहे. त्यामुळे लोक चिनी स्मार्टफोन्ससह इतरही वस्तू घेणे टाळत आहेत. अशावेळी मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्स अशा कंपन्यांना पुन्हा मार्केटमध्ये आपले स्थान निर्माण करण्याची संधी चालून आली आहे असे म्हणता येईल...
चीनचे अनेक स्मार्टफोन्स कमी किमतीत सहज मिळत होते. त्यामुळे चीनच्या या स्मार्टफोन्सना पर्याय उपलब्ध करून द्यायचा असेल, तर मायक्रोमॅक्ससारख्या इतरही कंपन्यांना आपले नवीन स्मार्टफोन्स बाजारात आणताना किमतीचा आणि फीचर्सचा बारकाईने विचार करावा लागणार आहे. मायक्रोमॅक्स (Micromax), मोबाइल बाजारात आपले स्थान निर्माण करणारी भारतीय कंपनी. २०१७-१८ पर्यंत कंपनी बाजारात आपले पाय रोवून होती, मात्र नंतर चिनी मोबाइल्सची मागणी वाढली आणि इतर कंपन्यांचे उत्पन्न घटले. पण सध्याची मार्केटची गरज ओळखून मायक्रोमॅक्स कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे, की लवकरच आपले तीन नवे स्मार्टफोन्स बाजारात आणण्याची योजना आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे तीनही स्मार्टफोन्स दहा हजारांच्या आतील किमतीचे असतील. तसेच यामध्ये प्रीमिअम फीचर्स आणि मॉर्डन लुकचा बजेट फोनही असेल. कंपनीने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरून दिलेल्या माहितीनुसार प्रीमिअम फीचर्ससह नवीन डिव्हाईस डेव्हलप करण्याचे काम सुरू आहे. याचा मॉडर्न लुक असेल आणि हे बजेट फ्रेंडलीही असेल, असेही म्हटले आहे. याबरोबरच या ट्विटमध्ये कंपनीने #MadeByIndian आणि #MadeForIndian असे हॅशटॅगही वापरले आहेत. याशिवाय कंपनीच्या वरिष्ठांनी सध्याच्या काळात वापसी करणे कठीण असल्याचेही म्हटले आहे. मात्र आलेल्या संधीचा फायदा मायक्रोमॅक्ससह इतर कंपन्याही घेण्याच्या तयारीत आहेत. यामुळे या वापसी करणाऱ्या कंपन्यांमध्येही स्पर्धा निर्माण होऊ शकते. लावा (Lava) ही २००९ मध्ये सुरू झालेली भारतीय कंपनीही वापसी करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. लावाच्या स्मार्टफोनला भारतासह नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, थायलंड, मेक्सिको या देशांतही चांगले मार्केट आहे. लावाचा येणारा स्मार्टफोन जेड ६६ या मॉडेल नंबरसह बेंचमार्क साइट गीकबेंचवर दाखवला गेला आहे. त्या ठिकाणी फोनच्या काही फीचर्सची सूचीही देण्यात आली होती, त्यानुसार या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्ले, अँड्रॉइड 10, 3GB रॅम आणि युनिसोक प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. मात्र कंपनीने या स्मार्टफोनच्या लाँचची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
इंटेक्स (Intex) ही मोबाइल कंपनी सर्वात जुनी भारतीय मोबाइल कंपनी आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ही कंपनी मार्केटमधून गायब आहे. एकेकाळी इंटेक्सचे स्मार्टफोन्स आणि फीचर फोन्स दोन्हीलाही चांगले मार्केट होते. मात्र चिनी स्मार्टफोन्सचा फटका या कंपनीलाही बसला. त्यामुळे आता मिळालेल्या संधीचा फायदा करून घेत इंटेक्सही आपले स्मार्टफोन्स पुन्हा बाजारात आणू शकते, मात्र कंपनीकडून असे ऑफिशिअल स्टेटमेंट आलेले नाही. याशिवाय कार्बन मोबाइल्स कंपनीही आपले स्मार्टफोन्स आणणार असल्याचे बोलले जात आहे. या कंपनीचे स्मार्टफोन्सही दहा हजार रुपये किमतीच्या आतील असतील. स्मार्टफोनपेक्षा फीचर फोनमध्ये या कंपनीची चांगली पकड आहे.
मागच्या वर्षी जेव्हा अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध झाले होते, तेव्हादेखील मायक्रोमॅक्स आणि लावा या कंपन्यांना असाच फायदा झाला होता. कारण अमेरिकेच्या काही कंपन्यांकडून या दोन कंपन्यांना डिव्हाइसेस तयार करण्याच्या मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या.