संसर्ग रोखणारा नेकलेस व मास्क 

ज्योती बागल
सोमवार, 13 जुलै 2020

कोरोनाने सध्या सर्वत्र कहर केला आहे. अजूनही लस उपलब्ध नाही आणि संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या या संसर्गापासून वाचण्यासाठी करता येतील असे अनेक नवे नवे उपाय पुढे येत आहेत. याशिवाय संसर्ग रोखण्यासाठी काही नवीन गॅजेट्सही तयार होत आहेत. असाच एक प्रिंटेड नेकलेस आणि मास्क नुकतेच लाँच झाले आहेत, त्यांच्याविषयी थोडक्यात...

कोरोनाच्या या काळात अनेक लहान-मोठ्या कंपन्या वेगवेगळी गॅजेट्स बाजारात आणत आहेत. यात नासा (NASA-National Aeronautics and Space Administration)नेही आता पुढाकार घेतला आहे. नासाने नुकताच एक थ्री-डी प्रिंटेड नेकलेस (3D Printed Necklace) तयार केला आहे. या खास नेकलेसला पल्स (PULSE) असे नाव दिले आहे. जर एखादी व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आली, तर हा नेकलेस लगेच अलर्ट करतो. 

 हा थ्री-डी प्रिंटेड नेकलेस नासाच्या प्रॉपल्शन लॅबोरेटरीने तयार केला आहे. यामध्ये १२ इंच रेंजचा प्रॉक्सिमिटी सेंसर वापरला गेला आहे. या सेंसरच्या माध्यमातून नेकलेस हाताच्या पल्सना ट्रॅक करतो. शिवाय हा नेकलेस घातलेला असताना तोंडाला हातही लावू देत नाही. म्हणजेच हा नेकलेस गळ्यात असेल आणि तुम्ही जर हात तोंडाजवळ नेला, तर या नेकलेसमधील व्हायब्रेशन अलार्म वाजतो. जसा जसा हात तोंडाच्या जवळ जाईल, तेवढ्या वेगाने व्हायब्रेशन होईल. त्यामुळे तुमच्या सतत लक्षात राहील, की तोंडाला हात लावायचा नाही. अशाप्रकारे विषाणूची बाधा होण्यापासून स्वतःचा बचाव करता येईल. व्हायब्रेशनसाठी यामध्ये एक मोटर दिली आहे. शिवाय 3V ची बॅटरीही दिलेली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, या नेकलेसचा योग्य फायदा होण्यासाठी हा नेकलेस गळ्यात घालताना तो गळ्यापासून सहा इंच खाली ठेवावा. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी डोनट रोबोटिक्स (Donut Robotics) या जपानच्या एका स्टार्टअप कंपनीने एक इनोव्हेटिव्ह स्मार्ट फेस मास्क तयार केला आहे. हा मास्क इंटरनेट कनेक्टेड असतो. हा मास्क जपानी भाषेतून जवळजवळ इतर आठ भाषांमध्ये मेसेज ट्रान्सलेट करू शकतो, शिवाय कॉल करण्याचे कामही करतो. या फेस मास्कला सी-मास्क (c-mask) असे नाव दिले आहे. हा मास्क प्लॅस्टिकपासून तयार केला असून यामध्ये ब्ल्यूटूथ डिव्हाइसही आहे, जे स्मार्टफोन आणि टॅब्लेटला कनेक्ट करता येते. 

 हा सी-मास्क एखादे स्पीच, टेक्स्टमध्येही भाषांतरित करू शकतो. उपलब्ध माहितीनुसार डोनट रोबोटिक्सच्या इंजिनिअर्सना कोरोनाच्या संकटांचा सामना करत असताना सी-मास्क तयार करण्याची कल्पना सुचली. युजर हा मास्क नेहमीच्या मास्कवर घालू शकतो. या स्मार्ट फेस मास्कची किंमत ४० डॉलर एवढी असून कंपनी येत्या सप्टेंबर महिन्यात पाच हजार मास्क बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.      

संबंधित बातम्या