यूव्ही-सी डिसइन्फेक्शन सिस्टीम

ज्योती बागल
मंगळवार, 21 जुलै 2020

व्हॉट्‌स न्यू

कोरोना विषाणू आणखी किती काळ राहणार कल्पना नाही. त्यामुळे नागरिकांना सर्व ठिकाणी सर्व प्रकारची काळजी घेऊन कोरोना विषाणूचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे बाजारातून आणलेल्या सर्व गोष्टी विषाणूमुक्त करूनच घरात घेणे सोयीचे ठरणार आहे. फळे, भाजीपाला या जीवनावश्यक गोष्टी आहेत, यांना पर्याय नाही. पण हा भाजीपाला जिथून येतो, तिथे वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या माणसांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका तर वाढतोच; शिवाय भाजीपाला, फळे यांच्यावर कोरोनाविषाणू असण्याचाही धोका असतो. हाच धोका लक्षात घेऊन फिलिप्स कंपनीने भाजीपाला विषाणूमुक्त करण्यासाठी ‘यूव्ही-सी डिसइन्फेक्शन सिस्टम’ (Philips UV-C Disinfection System) हे प्रॉडक्ट नुकतेच लाँच केले आहे.   

 फिलिप्सचे हे ‘यूव्ही-सी डिसइन्फेक्शन सिस्टीम’ मायक्रोवेव्हसारखे आहे. यामध्ये यूवी-सी (अल्ट्रा व्हॉयलेट) रेडिएशन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. या सिस्टीम संदर्भात माहिती देताना कंपनीने दावा केला, की या सिस्टीमध्ये चारही बाजूंनी लाइट्स दिलेले आहेत, जे कोणत्याही वस्तूला दोन ते आठ मिनिटांच्या आत डिसइन्फेक्ट करतात. 

यूव्ही-सी रेडिएशनमुळे माणसांच्या त्वचेला आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून या सिस्टीमला विशिष्ठ काचेचा दरवाजा आहे, ज्यामधून अतिनील किरणे बाहेर न पडता फक्त स्वच्छ प्रकाश बाहेर पडतो. जर चुकून याचा दरवाजा उघडा राहिला, तर यूव्ही-सी लाइट्सना ऑटो-कट ऑफचे इनबिल्ट फिचर दिले आहे. यामुळे युजर सुरक्षितपणे याचा वापर करू शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फिलिप्सचे हे प्रॉडक्ट भारतातच डिझाइन आणि तयार केले गेले आहे. 

आपल्या घरात रोज फळे-भाजीपाला आणला जातो. अशा वेळी फिलिप्स यूव्ही-सी डिसइन्फेक्शन सिस्टीम रोजच्या वापरासाठी उपयुक्त आहे. शिवाय या सिस्टीमच्या मदतीने फळे आणि भाजीपाल्याव्यतिरिक्त पदार्थांचे पॅकेट्स आणि इतर छोटे-मोठे साहित्यही डिसइन्फेक्ट करता येते. तसेच या सिस्टीमने फळे-भाजीपाला विषाणूमुक्त केल्यावर बराच काळ ताजे राहतात आणि खराबही होत नाहीत असे बोलले जाते.      

‘यूव्ही-सी डिसइन्फेक्शन सिस्टीम’ हे प्रॉडक्ट १० लिटर, १५ लिटर आणि ३० लिटर क्षमता या प्रमाणात उपलब्ध आहे. १० लिटर क्षमतेचचे डिसइन्फेक्शन सिस्टीम ७,९९० रुपये, १५ लिटर क्षमतेचे डिसइन्फेक्शन सिस्टीम ९,९९० रुपये, तर ३० लिटर क्षमतेच्या डिसइन्फेक्शन सिस्टीमची किंमत ११,९९० रुपये आहे. या प्रॉडक्टवर एका वर्षाची वॉरंटीही दिली आहे. 

फिलिप्सप्रमाणे ‘ओझोन जेनरेटर डिसइन्फेक्शन मशीन’, ‘इंटेलिजेंट फ्रुट अँड व्हेजिटेबल डिसइन्फेक्शन मशीन’, ‘केंट काउंटर टॉप व्हेजिटेबल अँड फ्रुट डिसइन्फेक्शन’, ‘आरएमएक्सएमवाय हाऊसहोल्ड प्युरिफायर डिसइन्फेक्शन’, ‘प्रेस्टिज क्लीन होम ओझोनायझर’, ‘सिक्सएल फ्रुट क्लिनर मशीन’, ‘बीबीवायटी नाईनएल इंटेलिजेंट ओझोन फ्रुट्स’ आणि ‘व्हेजिटेबल वॉशिंग मशीन’ अशा इतरही अनेक कंपन्यांचे डिसइन्फेक्शन मशिन्स ऑनलाइन उपलब्ध आहेत.    
--------------------------------

संबंधित बातम्या