स्मार्ट जिओ ग्लास

ज्योती बागल. 
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

रिलायन्स समूहाच्या जिओ या मोबाइल कंपनीने अल्पावधीतच चांगला जम बसवला असून ही कंपनी आता वेगवेगळी गॅजेट्स बाजारात आणण्याच्या तयारीत दिसत आहे. जिओने नुकताच स्मार्ट चष्मा/गॉगल लाँच केला आहे. काय आहे या चष्म्याची खासियत, याविषयी थोडक्यात घेतलेला आढावा... 

अलीकडे फक्त स्मार्ट मोबाइलनेच नव्हे तर स्मार्ट वॉच, स्मार्ट बँड अशा गॅजेट्सने व्हिडिओ कॉलिंग केल्याचे आपण ऐकले असेल, पाहिले असेल. मात्र चष्म्याने व्हिडिओ कॉलिंग केल्याचे खचितच ऐकले असेल. पण आता हेही शक्य होणार आहे. कारण जिओ या मोबाइल निर्मात्या कंपनीने नुकताच असा एक स्मार्ट चष्मा लाँच केला आहे, ज्याने तुम्ही स्मार्ट मोबाइलवरून करता तसा व्हिडिओ कॉल करता येणार आहे, तेही 3D मध्ये. रिलायन्स समूहाची नुकतीच ४३ वी एजीएम झाली. या बैठकीत रिलायन्स समूह दरवर्षी एक तरी नवीन गॅजेट, प्लॅन सादर करत असते. यावेळी रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी  जिओ 5G रोडमॅपचे अनावरण केले. हे रोडमॅप पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आले आहेत. ही सेवा ग्राहकांसाठी २०२१ मध्ये प्रीमियर स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल. दरम्यान इतर देशांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येईल. याचवेळी जिओने 5G सह एक स्मार्ट ग्लासही लाँच केला आहे. या चष्म्याची खास बाब म्हणजे या चष्म्याच्या मदतीने तुम्हाला 3D चा अनुभव देणारा व्हिडिओ कॉल करता येणार आहे.    

या स्मार्ट चष्म्याला ‘जिओ ग्लास’ (Jio Glass) असे नाव दिले आहे. या चष्म्यामध्ये स्पीकर आणि माइकचा सपोर्ट दिला आहे. स्मार्ट चष्म्याच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंगचाही अनुभव घेता येणार आहे. हे व्हिडिओ कॉलिंग 3D मध्ये असल्याने ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी अशी सेवा भारतात तरी कोणत्याच कंपनीने आणली नव्हती. अशी सेवा पुरवणारी रिलायन्स ही पहिलीच भारतीय कंपनी आहे.      

‘जिओ ग्लास’ची वैशिष्ट्ये बघितली, तर या चष्म्याचे वजन ७५ ग्रॅम एवढे आहे. हा एक व्हर्च्युअल रिॲलिटीचा अनुभव देणारा चष्मा आहे. या चष्म्याला कनेक्ट करण्यासाठी एक केबल देण्यात आली आहे. त्याद्वारे हा चष्मा स्मार्टफोनला कनेक्ट करता येतो. या स्मार्ट चष्म्यात इनबिल्ट २५ अ‍ॅप्स आहेत, जी व्हिडिओ मीटिंगसाठी उपयोगी आहेत. तसेच या चष्म्यात स्मार्टफोनमधील जिओ ग्लास, 3D मीटिंग्ज आणि व्हिडिओ कॉलसाठी वापरला जाऊ शकतो.

रिलायन्स समूहाच्या बैठकीत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, ‘भारतामध्ये पूर्णपणे विकसित करण्यात आलेल्या सुविधा जागतिक स्तरावर पोचवण्याची वेळ आता आली आहे.’ शिवाय जिओ प्लॅटफॉर्म आत्मनिर्भर भारतासाठीचे महत्त्वाचे उदाहरण ठरेल अशीही घोषणा यावेळी अंबानींनी केली.  

संबंधित बातम्या