फीचर फोन आणि अँड्रॉइड टीव्ही 

ज्योती बागल 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

भारतीय बाजारपेठेत चिनी मालाविषयीचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे इतर देशांतील आणि स्वदेशी कंपन्यांच्या येणाऱ्या नव्या गॅजेट्सकडे ग्राहक लक्ष ठेवून असतात. जिओ कंपनीने आणलेल्या सर्वच मोबाइल फोन्सना चांगली मागणी असते. त्यामुळे कंपनी कमी किमतीतील एक फीचर फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. तर, थॉमसनने भारतीय बाजारात अँड्रॉइड टीव्ही लाँच केले आहेत. त्याविषयी थोडक्यात... 

रिलायन्स जिओ ‘जिओ फोन ५’ हा सर्वात स्वस्त हँडसेट बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. 91Mobiles च्या रिपोर्टवरून ही माहिती समोर आली आहे. सध्या ‘जिओ फोन ५’ वर काम सुरू आहे. हा फोन ओरिजिनल जिओ फोनचा एक लाइट व्हर्जन असून हादेखील एक फीचर फोन असणार आहे. लीक्सच्या माहितीनुसार, जिओ फोन ५ ची लाँचिंग प्राइज ३९९ रुपये असू शकते. म्हणजेच आत्तापर्यंत बाजारात येणारा हा सर्वात स्वस्त फोन असणार आहे. या फीचर फोनमध्येदेखील एलटीई कनेक्टिव्हिटी असण्याची अपेक्षा आहे. 4G एलटीईबरोबरच या फोनमध्ये KaiOS प्लॅटफॉर्म दिला जाऊ शकतो. म्हणजेच इंटरनेट ब्राऊजरबरोबर फोनमध्ये काही ॲप्स आधीपासून इन्स्टॉल केलेली असतील. शिवाय व्हॉट्सअॅप, गुगल, फेसबुकसारखी अॅप्स प्री लोडेड असतील. मात्र फोन स्टोरेज कमी असल्याने इतर ॲप्स डाउनलोड होणार नाहीत. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या फोनमध्ये सर्व नंबर्सवर फ्री कॉलिंग असले, तरी इंटरनेटसाठी मात्र वेगळा रिचार्ज पॅक घ्यावा लागेल. त्यासाठी जिओतर्फे वेगळे प्लॅन्सही लाँच केले जाऊ शकतात. हा फोनदेखील ओरिजिनल फोनप्रमाणे असल्याने या फोनमध्ये एक छोटा एलसीडी डिस्प्ले आणि कीपॅड दिले जाईल. मात्र, जिओ फोन लाइटमध्ये वाय-फाय आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. शिवाय फोनची किंमत कमी असल्याने या फोनमध्ये कॅमेरादेखील नसेल. हा फीचर मोबाइल फोन यावर्षी किंवा पुढील वर्षी लाँच होऊ शकतो. 

थॉमसन(Thomson)ने भारतीय बाजारात मेक इन इंडिया सर्टिफिकेशनचे अँड्रॉइड टीव्ही लाँच केले आहेत. थॉमसनने 4K रिझोल्युशन आणि HDR सपोर्टसह OATH या सीरिजमध्ये अँड्रॉइड टीव्ही लाँच केले आहेत. यामध्ये ३२ इंचापासून ५५ इंचापर्यंतचे टीव्ही उपलब्ध आहेत. याबरोबरच कंपनीने OATH लाइनअपमध्ये ७५ इंचाचादेखील टीव्ही लाँच केला आहे. थॉमसनच्या PATH लाइनअपच्या टीव्हीमध्ये 9A आणि 9R या दोन रेंजमध्ये लाँच केले आहेत. 9A हे एचडी रेडी आणि फुल एचडी टीव्ही आहेत, तर 9R हे 4K टीव्ही आहेत. 9A मध्ये कंपनीने ३२ इंच एचडी PATH, ३२ इंच एचडी बेजल लेज, ४० इंच फुल एचडी आणि ४३ इंचाचा फुल एचडी हे टीव्ही आहेत. तर 9R मध्ये ४३ इंच 4K PATH, ५० इंच 4K PATH आणि ५५ इंच  4K PATH टीव्हीचा समावेश आहे. 9A आणि 9R सीरिज अँड्रॉइड 9 वर चालत असल्याने युजर्सना प्ले स्टोअरचा ॲक्सेस मिळणार आहे. या टीव्हींमध्ये क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. तसेच स्ट्रीमिंग सर्व्हिसची मजाही घेता येणार आहे. थॉमसनच्या या टीव्हींमध्ये क्वॉडकोर वन गीगाहर्ट्ज सीपीयू आणि ग्राफिक्ससाठी माली क्वॉडकोर जीपीयू दिला आहे. तसेच उपलब्ध माहितीनुसार रिमोटमध्ये सोनी लिव्ह, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि यूट्युबसारख्या अॅप्ससाठी वेगवेगळे बटण दिले आहे. नॅव्हिगेशनसाठी आवाजाचा वापर केला जाऊ शकतो. रिमोट गुगल असिस्टंटबरोबर येतो. थॉमसनच्या 9A आणि 9R या सीरिजमधील टीव्ही ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच विक्रीसाठी ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. या टीव्हींच्या किमती अनुक्रमे १० हजार ९९९ पासून ते २९ हजार ९९९ रुपये दरम्यान आहेत, तर ५० आणि ७५ इंचाच्या ओथ टीव्हीची किंमत २८ हजार ९९९ रुपयांपासून ९९ हजार ९९९ रुपयांपर्यंत आहे.

संबंधित बातम्या