यूव्ही केस आणि स्टरलायझर 

ज्योती बागल
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

कोरोनामुळे सर्वांची जीवनशैली बदलली आहे. स्वतःला या व्हायरसपासून वाचवायचे आहेच, पण त्याचबरोबर आपण वापरत असलेल्या वस्तूंमुळे संसर्ग पसरू नये, याचीही काळजी घ्यायची आहे. यासाठी नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या ‘यूव्ही केस’ आणि ‘यूव्ही स्टरलायझर’ यांचा वापर फायदेशीर ठरू शकतो...

होम सिक्युरिटी गॅजेट्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स या भारतीय कंपनीने एक ‘यूव्ही केस’ लाँच केली आहे. बाजारातून घरी आणल्या जाणाऱ्या रोजच्या वापरातील बऱ्याच वस्तूंना सॅनिटाइज करण्यासाठी या ‘यूव्ही केस’चा उपयोग होणार आहे. या यूव्ही केसमध्ये यूव्ही-सी लाइट डिसइन्फेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. जगभरात यूव्ही-सी स्टरलायझेशन ही एक व्हायरस आणि बॅक्टेरियांना नष्ट करणारी एस्टॅब्लिश सायंटिफिक मेथड मानली जाते. जागतिक आरोग्य संघटनेनेही हे मान्य केले आहे, की यूव्ही-सी लाइटने SARS-CoV-1 सह जवळजवळ ६५ प्रकारच्या विषाणू आणि जंतूंना मारता येते. हे सॅनिटायझेशन पूर्णतः केमिकल फ्री असून ९९ टक्के विषाणू आणि जंतूंना नष्ट करण्यासाठी सक्षम आहे. 

गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सने या संदर्भात केलेल्या दाव्यानुसार या यूव्ही केसचे परीक्षण ‘सीएसआयआर’ आणि ‘आयसीएमआर’सारख्या लॅबने केले आहे. या यूव्ही केसच्या मदतीने अगदी पैशांपासून मोबाइल, दागिने, मास्क अशा सर्वच वस्तूंना सॅनिटाइज करता येणार आहे. यूव्ही-सी प्रकाश माणसांसाठी हानिकारक असल्याने कंपनीने ही यूव्ही केस लिक प्रूफ तयार केली आहे. यामध्ये ऑटो कट ऑफ फिचर दिले आहे. या यूव्ही केसमध्ये १५ लिटर, ३० लिटर आणि ५४ लिटर अशी तीन मॉडेल्स उपलब्ध आहेत. यांच्या किमती अनुक्रमे ८ हजार ९९९ रुपये, १० हजार ४९९ रुपये, १४ हजार ९९९ रुपये अशा आहेत. ही केस कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येऊ शकते.    

काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगनेही वायरलेस चार्जिंगसह एक यूव्ही स्टरलायझर लाँच केला आहे. हा स्टरलायझर फक्त दहा मिनिटांमध्ये तुमच्या गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी इअरबड्स आणि स्मार्टवॉच अशा ॲक्सेसरीजना डिसइन्फेक्ट करू शकतो. मोबाइल, इअरबड्स, गॉगल या सतत वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत. शिवाय घराबाहेर जातानाही या वस्तू आपण सतत बरोबर बाळगत असतो. अशावेळी या वस्तूंच्या माध्यमातून व्हायरस पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या वस्तू वेळच्यावेळी डिसइन्फेक्ट करून घेणे गरजेचे आहे. यूव्ही स्टरलायझर संदर्भात कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, या स्टरलायझरचे मान्यताप्राप्त लॅबमध्ये परीक्षण केले असून हे स्टरलायझर ९९ टक्के व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करते. या स्टरलायझरला सुरू करण्यासाठी एक सिंगल बटण दिले आहे, जे सुरू केल्यावर वस्तू डिसइन्फेक्ट करण्याचे काम झाले की १० मिनिटांनी आपोआप बंद होते. याची किंमत ३,५९९ रुपये एवढी आहे. या यूव्ही स्टरलायझरला ‘सॅमसंग मोबाइल ॲक्सेसरीज पार्टनरशिप प्रोग्रॅम’ (SMAPP) चे एक भागीदार सॅमसंग C&T ने तयार केले आहे.    

संबंधित बातम्या