फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स 

ज्योती बागल
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

व्हॉट्‌स न्यू

आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वांनाच कमी वेळात बरीच कामे पूर्ण करायची असतात. अशावेळी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या वापरावर अधिक भर दिला जातो. वॉशिंग मशीन हे त्यापैकी एक महत्त्वाचे गॅजेट. कारण कपडे धुणे हे तसे रोजचे आणि वेळखाऊ काम असल्याने आज घरोघरी वॉशिंग मशीन्स पाहायला मिळत आहेत. त्यातही फुली ऑटोमॅटिक मशीन्सना प्राधान्य दिले जात आहे. नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या थॉमसनच्या फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनविषयी...

फ्रान्सची प्रसिद्ध कंपनी थॉमसनने (Thomson) भारतात अलीकडेच तीन नवीन वॉशिंग मशीन्स लाँच केली आहेत. यामध्ये ६.५ किलोग्रॅम, ७.५ किलोग्रॅम आणि १०.५ किलोग्रॅमच्या मशीन्सचा समावेश आहे. या तीनपैकी ७.५ किलोग्रॅमचे मशीन टॉप लोडिंग मॉडेल असून या मशीनची विक्री याच महिन्यापासून फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे.

थॉमसन वॉशिंग मशीन्सच्या किमती
     ६.५ किलोग्रॅम टॉप लोडिंग फुल ऑटोमॅटिक (9G PRO Series) - ११,४९९ रुपये
     ७.५ किलोग्रॅम टॉप लोडिंग फुल ऑटोमॅटिक (9G PRO Series) - १२,९९९ रुपये
     ०.५ किलोग्रॅम टॉप लोडिंग फुल ऑटोमॅटिक (Q10 Ultra Series) - २२,९९९ रुपये

थॉमसनच्या या वॉशिंग मशीन्सच्या फिचर्सविषयी कंपनीचे म्हणणे आहे, की ही तीनही वॉशिंग मशीन्स दीर्घकाळ टिकणारी आणि गंज न चढणारी आहेत. कारण सर्व मशीन्समध्ये स्टेनलेस स्टीलचे ड्रम्स आहेत. याशिवाय यामध्ये स्मार्ट मोटर दिली आहे. याबरोबरच मशीनमध्ये व्हायब्रेशन्स होत नसल्याचा दावाही कंपनीने केला आहे. या मशीन्समध्ये चाइल्ड लॉक मोड दिला आहे. या तीनमधील १०.५ किलोग्रॅमच्या मशीनमध्ये स्टीम वॉशिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. हे मशीन कपड्याचे वजन स्वतः माहीत करून घेते. थॉमसनच्या या तीनही मशीन्सना पाच स्टारचे रेटिंग आणि दोन वर्षांची वॉरंटी दिली आहे. तसेच वॉशिंगसाठी सहा मोड दिले आहेत. शिवाय एअर ड्रायचे फिचरही दिले आहे.  

वॉशिंग मशीन संदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी
वॉशिंग मशीन मुख्यतः फ्रंट लोडिंग आणि टॉप लोडिंग या दोन प्रकारात येतात. फ्रंट लोडिंग मशीनला पुढच्या बाजूने, तर टॉप लोडिंग मशीनला वरच्या बाजूने कपडे टाकता येतात. फ्रंट लोडिंग मशीनच्या तुलनेत टॉप लोडिंग वॉशिंग मशीनच्या किमती थोड्या कमी असतात. तसेच टेक्निकली फुली (Fully) ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक असे दोन प्रकार येतात. फुली ऑटोमॅटिक मशीनमध्ये कपडे एकाच ड्रममध्ये धुतले आणि पिळले जातात, तर सेमी ऑटोमॅटिक मशीनमध्ये कपडे पिळण्यासाठी कपडे टबमध्ये काढून पुन्हा ड्रायरमध्ये टाकावे लागतात. त्यामुळे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची किंमत फुली ऑटोमॅटिक मशीनपेक्षा कमी असते.  

संबंधित बातम्या