सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन 

ज्योती बागल 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

स्मार्टफोन्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सॅमसंग, अ‍ॅपल, वनप्लस, सोनी अशा अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये अप्रत्यक्ष स्पर्धा सुरू असून प्रत्येक कंपनी भरपूर फीचर्स असलेले स्मार्टफोन्स मार्केटमध्ये सादर करत आहे. सॅमसंगने नुकत्याच लॉंच केलेल्या ‘गॅलक्सी झेड फोल्ड टू’ या स्मार्टफोनविषयी... 

सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड टू (Samsung Galaxy Z Fold2) हा फोल्डेबल स्मार्टफोन भारतात नुकताच लॉंच झाला आहे. भारताबरोबरच हा स्मार्टफोन अमेरिका आणि चीनमध्येही लॉंच करण्यात आला आहे. या एकाच स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन असतील. सॅमसंगच्या या वर्षात लॉंच झालेल्या स्मार्टफोनपैकी हा सर्वांत महागडा स्मार्टफोन आहे. याआधी कंपनीने ''गॅलक्सी फोल्ड'' आणि ''गॅलक्सी झेड फ्लिप'' बाजारात आणले होते. ''सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड टू''ची भारतीय बाजारात १,४९,९९९ रुपये एवढी किंमत आहे. या स्मार्टफोनची क्रेझ आणि युजर्सचा रिस्पॉन्स लक्षात घेऊन कंपनीने ''गॅलक्सी झेड फोल्ड टू''च्या प्री-ऑर्डर्सही घेतल्या होत्या. 

''गॅलक्सी झेड फोल्ड टू'' हा स्मार्टफोन मिस्टिक ब्लॅक आणि मिस्टिक ब्रॉन्झ कलरमध्ये लॉंच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनला 7.6 इंचाचा फुल एचडी प्लस फोल्डेबल डिस्प्ले देण्यात आला असून याचे रिझोल्यूशन 1768×2208 पिक्सेल आहे. शिवाय उत्तम पिक्चर क्वालिटीसाठी एमोलेड इन्फिनिटी-O डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि आस्पेक्ट रेशो 22.5:18 आहे. तसेच फोनच्या कव्हरवर 6.2 इंचाचा सुपर एमोलेड इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. 

''सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड टू''च्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले, तर या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 12GB रॅम देण्यात आली असून 256GB चे UFS 3.1 स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेरे देण्यात आले असून यामध्ये 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे. याबरोबरच यात १२ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस पॉवर शेअरचाही सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 5G, 4G एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ V5.0 आणि यूएसबी-C पोर्टसारखे फीचर्स आहेत. या स्मार्टफोनच्या एका साईडला फिंगरप्रिंट सेंसर आहे. याशिवाय या फोनमध्ये स्टिरिओ स्पीकर्सही आहेत, जे डॉल्बी आयटम्सना सपोर्ट करतात. 

सॅमसंगच्या ''गॅलक्सी टॅब एससेव्हन प्लस'' (Samsung Galaxy Tab S7+) लाही भारतीय युजर्सकडून चांगली पसंती मिळाली आहे. ''गॅलक्सी टॅब एससेव्हन आणि गॅलक्सी एससेव्हन प्लस'' हे दोन्ही टॅब ऑगस्टमध्ये लॉंच झाले आहेत. कंपनीने यासाठीदेखील ग्राहकांना प्री बुकिंगचा पर्याय दिला होता. ''गॅलक्सी टॅब एससेव्हन प्लस''ची बंपर विक्री झाल्याने हा काही दिवसांतच ''आउट ऑफ स्टॉक'' झाला आहे. ''गॅलक्सी टॅब एससेव्हन आणि गॅलक्सी एससेव्हन प्लस'' या दोन्ही टॅबमध्ये अँड्रॉइड 10 चा सपोर्ट दिला आहे. गॅलक्सी टॅब एससेव्हनची किंमत 55,999 रुपये आहे, तर गॅलक्सी टॅब एससेव्हन प्लसची किंमत 79,999 रुपये आहे.

संबंधित बातम्या