गार्मीनचे सोलर स्मार्टवॉच 

ज्योती बागल 
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

सध्याच्या काळात शरीराच्या तापमानासह रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण आणि स्ट्रेस लेव्हलही वेळोवेळी जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आता स्मार्टवॉचचाही उपयोग होऊ शकतो. स्मार्टवॉच निर्माती कंपनी गार्मीनने ‘गार्मीन इन्स्टिंक्‍ट सोलर’ आणि ‘गार्मीन फिनिक्‍स सिक्‍स प्रो सोलर’ ही दोन स्मार्टवॉचेस नुकतीच भारतात लाँच केले आहेत. या स्मार्टवॉचच्या फीचर्सविषयी थोडक्‍यात माहिती घेऊ... 

बऱ्याच काळानंतर ‘गार्मीन’ने भारतीय बाजारात नवीन स्मार्टवॉच आणली आहेत. यामध्ये ‘गार्मीन इन्स्टिंक्‍ट सोलर’ (GarminInstinct Solar) आणि ‘फिनिक्‍स सिक्‍स प्रो सोलर’ (Fenix6 Pro Solar) या दोन स्मार्टवॉचेसचा समावेश आहे. या दोन्ही स्मार्टवॉचची खासियत म्हणजे ही दोन्ही स्मार्टवॉचेस सौरऊर्जेवर चार्ज करता येतात. शिवाय यांची बॅटरी लाईफ पन्नास दिवसांची असणार आहे. ‘गार्मीन’ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सोलर पॅनलसारखे एक डिझाईन तयार केले असून त्याला ‘पॉवर ग्लास’ असे नाव दिले आहे. ही पॉवर ग्लास अतिशय पातळ अशा मल्टीलेअर स्ट्रक्‍चरने तयार केली असल्याने सर्व बाजूंनी झाकलेले असतानादेखील हे स्मार्टवॉच चार्ज होते. 

‘गार्मीन इन्स्टिंक्‍ट सोलर’ हे स्मार्टवॉच ग्रॅफाईट, टिडल ब्लू, ऑर्किड, सनबर्स्ट आणि फ्लेम रेड या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असून त्याची भारतातील किंमत ४२,०९० रुपये एवढी आहे. तर ‘इन्स्टिंक्‍ट सोलर ग्रॅफाईट कॅमो’ (Instinct Solar Graphite Camo) आणि ‘इन्स्टिंक्‍ट सोलर लिकेन कॅमो’ (Instinct Solar Lichen Camo) ची किंमत प्रत्येकी ४७,४९० रुपये आहे. ‘गार्मीन फिनिक्‍स सिक्‍स प्रो सोलर’ या स्मार्टवॉचमध्ये ब्लॅक आणि स्लेट ग्रे हे दोन रंग उपलब्ध आहेत आणि याची किंमत आहे ८९,९९० रुपये, तर व्हाईटस्टोनबरोबर येणाऱ्या कोबाल्ट ब्लू बॅंडची किंमत ९९,९९० रुपये आहे. 

‘गार्मीन इन्स्टिंक्‍ट सोलर’मध्ये दिलेल्या पॉवर मॅनेजर फीचरमुळे युजर्सना अनलिमिटेड बॅटरी मिळते. मात्र ही सुविधा बॅटरी सेव्हर मोडमध्ये मिळते. या दोन्ही स्मार्टवॉचमध्ये इनडोअर क्‍लाइम्बिंग, फिशिंग आणि माउंटन बायकिंगसारखे फीचर्स दिले आहेत. तसेच यामध्ये बॉडी बॅटरी फीचर दिले आहे. हार्ट रेट व्हेरिबिलिटी, स्ट्रेस लेव्हल, स्लीप क्वालिटी, ओव्हरऑल बॉडी एनर्जी जाणून घेण्यास या फिचरची मदत होते. तसेच या वॉचमध्ये रक्तातील ऑक्‍सिजन संपृक्तता मोजायला मदत करणारा SpO2 ट्रॅकरही आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या स्मार्टवॉच मोडमध्ये चोवीस दिवसांचा बॅटरी बॅकअप आणि सोलर एक्‍सपोजर मोडमध्ये पन्नास दिवसांचा बॅकअप मिळेल. ‘फिनिक्‍स सिक्‍स प्रो सोलर’ हा गार्मीनच्या फ्लॅगशिप आउटडोअर जीपीएस सिरीजमधील एक नवीन मेम्बर आहे. यात गार्मीन पॉवर ग्लास सोलर चार्जिंग लेन्स आणि पॉवर मॅनेजर मोड आहेत. या स्मार्टवॉचमध्येदेखील माउंट बायकिंग आणि इनडोअर क्‍लायंबिंग ट्रॅक करता येते. ‘गार्मीन’ची हे दोन्ही स्मार्टवॉच अमेझॉन, फ्लिपकार्ट, टाटा क्‍लिक, मित्रासारख्या साईट्‌सवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 

याबरोबरच स्मार्टफोन मेकर कंपनी ‘वनप्लस’ही स्मार्टवॉच बाजारात आणणार असल्याचे सांगितले जात आहे. हे स्मार्टवॉच ‘वनप्लस वॉच’ याच नावाने लाँच होऊ शकते. एक्‍स्पर्ट्‌सच्या माहितीनुसार हे स्मार्टवॉच गुगल वेअर ओएस ऑपरेटिंग सिस्टीमसोबत येऊ शकते. मात्र या स्मार्टवॉचमध्ये कोणते कोणते फीचर्स असतील हे कळायला आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे.    

संबंधित बातम्या