बायोमेट्रिक पेमेंट सिस्टीम 

ज्योती बागल 
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

हल्ली कोणतेही पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन कॅशलेसचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये डेबिट, क्रेडिट कार्डसह ई-वॉलेटचाही समावेश आहे. त्यामुळे रोख रक्कम स्वतःबरोबर बाळगावी लागत नाही; शिवाय पैसे गहाळ होण्याचा धोकाही कमी असतो. मात्र यामध्येही नवीन तंत्रज्ञान आले असून आता फक्त आपला हात दाखवून कोणत्याही प्रकारचे पेमेंट करता येणार आहे. ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने नुकतीच बायोमेट्रिक पेमेंट सिस्टीम लाँच केली आहे. त्याविषयी थोडक्यात...      

 पेमेंट करण्याची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी ॲमेझॉनने ‘ॲमेझॉन वन’ नावाने बायोमेट्रिक पेमेंट सिस्टीम लाँच केली असून त्यामुळे सहजपणे कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येणार आहे. या बायोमेट्रिक पेमेंट सिस्टीमचे वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही प्रकारचे पेमेंट करताना फक्त आपला हात दाखवून ते पेमेंट करता येणार आहे. ॲमेझॉनच्या या खास सिस्टीममुळे ऑफिस आणि स्टेडियममधील प्रवेश प्रक्रियाही सोपी होणार आहे. कारण ही सिस्टीम कोणत्याही गेटवर ‘गेट पास’चे कामही करणार आहे. मात्र उपलब्ध माहितीनुसार, ॲमेझॉन ही पेमेंट सिस्टीम फक्त आपल्या वॉशिंग्टनमधील रिटेल स्टोअर्समध्ये इन्स्टॉल करून तिथेच याचा वापर करणार आहे. 

‘ॲमेझॉन वन’ ही बायोमेट्रिक पेमेंट सिस्टीम सर्वप्रकारच्या पेमेंटसाठी तळहाताचा वापर करते. एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्ही फक्त तुमचा तळहात दाखवून पेमेंट करू शकता. या पद्धतीचा फायदा म्हणजे शॉपिंग करायला जाताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कार्ड किंवा कॅश बरोबर घेऊन जावे लागणार नाही. ॲमेझॉनचे उपाध्यक्ष दिलीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बायोमेट्रिक पेमेंट सिस्टीम लोकांसाठी जलद, सुरक्षित आणि विश्वसनीय असेल. त्यासाठी या नवीन पेमेंट सिस्टीमबाबत ग्राहकांकडून फीडबॅक घेण्यात येत आहे. यानंतर ॲमेझॉनच्या दोन फिजिकल स्टोअर्समध्ये याची ट्रायल घेणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.   

ॲमेझॉनच्या आधी चीनमध्ये ‘अलीपे’ने ‘स्माइल टू पे’ सिस्टीम आणली होती. यामध्ये आयपॅडच्या आकाराचे एक डिव्हाईस वापरले असून त्याच्या माध्यमातून ग्राहक आपला चेहरा दाखवून पेमेंट करू शकतात. मात्र या प्रकारच्या बायोमेट्रिक पेमेंट सिस्टीममुळे ग्राहकांच्या प्रायव्हसीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवाय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या सिस्टीमचा फायदा हॅकर्स सहज घेऊ शकतात. त्यामुळे आता ‘स्माइल टू पे’नंतर ‘ॲमेझॉन वन’ कितपत यशस्वी होते, हे येणार काळच सांगेल. 

मात्र, अशाप्रकारे पेमेंट करून रिस्क घेण्यापेक्षा डेबिट-क्रेडिट कार्ड, ई-वॉलेट, तसेच कॅश बाळगणे जास्त सोयीचे वाटते. अर्थात पेमेंटसाठी कोणत्याही प्रकारचा वापर केला, तरी ग्राहकांनी नेहमी जागरूक असणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या