सीसीटीव्ही कॅमेरे  

ज्योती बागल 
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

आज सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑफिस, घर, सोसायटी, रस्ता, चौक असो किंवा एखादे वर्दळीचे ठिकाण; अशा सर्वच ठिकाणी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. अशावेळी वॉचमनबरोबरच दिवस-रात्र काम करणारी सीसीटीव्ही यंत्रणा उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. ‘सेक्युअरआय’ने नुकतेच दोन सीसीटीव्ही कॅमेरे लाँच केले आहेत, त्याविषयी थोडक्यात...        

सिक्युरिटी आणि सर्व्हेलन्स सेवा पुरवणारी कंपनी ‘सेक्युअरआय’ने भारतात ऑटोमॅटिक ॲडजस्टमेंटसह दोन सीसीटीव्ही कॅमेरे लाँच केले असून यामध्ये S-CCI3 बुलेट कॅमेरा आणि S-CCI2 डोम कॅमेऱ्याचा समावेश आहे. या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये आठ मेगापिक्सलचे लेन्स दिले आहेत. कॅमेऱ्यांची इमेज क्वालिटी उत्तम असून हे दिवस-रात्र कोणत्याही चुकांशिवाय व्यवस्थित चालत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्याचबरोबर दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये स्मार्ट डिटेक्शनचे फिचरही दिले आहे. 

‘सेक्युअरआय’चे दोन्ही कॅमेरे आयफोन, आयपॅड आणि अँड्रॉइड फोन अशा सर्व प्रकारच्या डिव्हाइसबरोबर कनेक्ट केले जाऊ शकतात. या कॅमेऱ्यांच्या स्मार्ट फंक्शनमध्ये क्रॉस लाईन डिटेक्शन, अनअटेंडेड ऑब्जेक्ट, मिसिंग ऑब्जेक्ट, रिजन एंट्रन्स, रिजन एक्झिटिंग, फास्ट मूव्हिंग, डिटेक्ट लॉइटरिंग, डिटेक्ट पीपल गॅदरिंग आणि डिटेक्ट पार्किंग इत्यादी फिचर्स दिले आहेत. शिवाय या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये आपल्या आवश्यकतेनुसार ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन, कलर, शार्पनेस ऑटोमॅटिक ॲडजस्ट करण्याचे फिचरही देण्यात आले आहे. 

या कॅमेऱ्यांसंदर्भात कंपनीने केलेला आणखी एक दावा म्हणजे, हे दोन्ही कॅमेरे -२२ अंशापासून १४० अंशापर्यंतचे तापमान सहन करू शकतात. वॉटर आणि डस्ट प्रूफसाठी या कॅमेऱ्यांना IP66 चे रेटिंग दिले आहे. S-CCI3 बुलेट कॅमेऱ्याची किंमत १२ हजार रुपये आहे, तर S-CCI2 डोम कॅमेऱ्याची किंमत ११ हजार रुपये एवढी आहे. 

याचवर्षी ‘सेक्युअरआय’ने भारतात वाय-फाय इनबिल्ट कॅमेरा, S-F40 आणि S-C20 लाँच केले आहेत. या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये टू वे ऑडिओ मॉनिटरिंगची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय वाय-फाय कनेक्टिव्हिटी, १२८ जीबीपर्यंत मेमरी आणि अँड्रॉइडसह आयओएसचा सपोर्टदेखील असेल. या दोन्हींमधील S-F40 हा ऑफिस असो किंवा घर, कुठेही सहज फिट होऊ शकतो अशाप्रकारे डिझाईन केला आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन मेगापिक्सल CMOS सेंसर दिले असून ३.६ मिमी लेन्सेससह फुल एचडी इमेज क्वालिटी मिळते. यांपैकी S-F40 कॅमेऱ्याची किंमत २,६९९ रुपये आहे, तर S-C20 कॅमेऱ्याची किंमत २,४९९ रुपये आहे.
---------------------------

संबंधित बातम्या