स्मार्ट पिलो
व्हॉट्स न्यू
आजच्या घडीला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच सोशल मीडिया, मोबाइल, कॉम्प्युटर आणि इंटरनेटचे व्यसन जडले आहे. व्यसन यासाठी, की अगदी थोडावेळ जरी आपण मोबाइल लांब ठेवला किंवा इंटरनेट बंद ठेवले तरी आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. कशाची तरी कमी असल्याचे सतत जाणवत राहते. जेव्हा एखाद्या वस्तू किंवा गोष्टीबाबत असे होते, तेव्हा ती वस्तू, गोष्ट फक्त आपल्या सवयीचा भाग न राहता व्यसन होते, तेव्हा त्यातून बाहेर पडणे सहज शक्य नसते. मात्र, नुकत्याच लाँच झालेल्या स्मार्ट पिलोचा तुम्हाला यासाठी उपयोग होऊ शकतो. या स्मार्ट पिलोबद्दल थोडक्यात...
अलीकडेच ‘पॉज पिलो’ या नावाने एक स्मार्ट पिलो लाँच झाली आहे. ही पिलो दक्षिण कोरियाच्या काही विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. ही पिलो तयार करण्यामागे, लोकांना इंटरनेटच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी मदत करणे हा मुख्य उद्देश असल्याचे समजते. बरेच लोक झोपतानाही मोबाइल हाताळत असतात, त्यामुळे झोप उशिरा लागते. अशावेळी या पिलोचा फायदा होऊ शकतो, कारण या स्मार्ट पिलोवर डोके ठेवताच इंटरनेट सिग्नल ब्लॉक होतो. असे कनेक्शन आपोआप बंद झाल्याने हातातील मोबाइल फोन बाजूला ठेवून तुम्हाला झोपावेच लागते.
‘पॉज पिलो’ डिव्हाईस दुबईमध्ये झालेल्या ‘सहाव्या ग्लोबल ग्रँड शो’मध्ये सादर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे डिव्हाईस तयार केले आहे, त्यांना हे काम मोठ्या प्रमाणात करता यावे यासाठी साधारण वीस करोड रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी म्हणजेच २०१७ मध्येदेखील एक स्मार्ट पिलो डिव्हाईस लाँच झाले होते. ही स्मार्ट पिलो लोकांना शांत झोप येण्यासाठी आणि वेळेवर झोपेतून जागे करण्यासाठी तयार करण्यात आली होती. या स्मार्ट पिलोची खासियत म्हणजे, झोपलेली व्यक्ती कितीही गाढ झोपेत असली तरीही ही पिलो त्या व्यक्तीला वेळेवर उठवते आणि जोपर्यंत तुम्ही उठत नाही तोपर्यंत ही पिलो दम खात नाही. या पिलोमध्ये निसर्गाचा मधुर आवाज आणि कृत्रिम सूर्यकिरणांचे फिचर दिले होते. कदाचित यावरूनच या पिलोचे नाव ‘सनराइज पिलो’ ठेवले असावे. त्या पिलोमध्ये दोन्ही बाजूला एलईडी लाईट्स दिले होते, जे सकाळी युजर्सच्या डोळ्यांवर सूर्यकिरणांप्रमाणे प्रकाश पाडत असत. याशिवाय अँटिस्नोरिंगसाठीही बऱ्याच कंपन्यांच्या स्मार्ट पिलोज बाजारात उपलब्ध आहेत.
ॲपल कंपनीनेदेखील अलीकडे एक स्मार्ट वॉच लाँच केले आहे. या डिव्हाइसला ‘नाइटवेअर’ असे नाव दिले आहे. हे स्मार्ट वॉच युजर्सना झोपेत असताना येणाऱ्या भीतीदायक स्वप्नांपासून वाचवते. ॲपल वॉचच्या माध्यमातून नाइटवेअर ॲप सर्व डेटा एकत्र करून युजर्ससाठी एक युनिक स्लीप प्रोफाईल तयार करते. त्यानंतर सेंसर बॉडी मूव्हमेंट आणि हार्ट रेटवरून वॉचला युजर एखादे वाईट स्वप्न बघत असल्याचे समजते. तेव्हा लगेच वॉचवर व्हायब्रेशन अलर्ट होते. मात्र, त्यासाठी युजर्सना झोपताना हे वॉच घालूनच झोपावे लागणार आहे.