फुजिफिल्मचा मिररलेस कॅमेरा 

ज्योती बागल 
सोमवार, 14 डिसेंबर 2020

आज कोणत्याही व्यावसायिक किंवा व्यक्तिगत कामाला जास्तीत जास्त गती द्यायची असेल, ते काम अधिकाधिक उत्तम करायचे असेल, तर त्या कामात अत्याधुनिक वस्तूंचा समावेश करणे आणि तो वाढवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच हल्ली प्रत्येक वस्तू डिजिटलाईज आणि युजर फ्रेंडली करण्यावर कंपन्या भर देत आहेत. कॅमेरा ही सध्याच्या घडीला लागणारी अतिशय महत्त्वाची वस्तू असून बदलत्या काळानुसार यात अनेक बदल होऊन कॅमेरे आणखीनच आधुनिक झाले आहेत. याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे फुजिफिल्मसने लाँच केलेला मिररलेस कॅमेरा. त्याविषयी थोडक्यात...  
 

फुजिफिल्म्सने नुकताच भारतात फुजिफिल्म एक्स-एस १० (Fujifilm X-S10) हा नवीन मिररलेस कॅमेरा लाँच केला आहे. फुजिफिल्म एक्स-एस १० हा डिजिटल कॅमेरा असून तो कंपनीच्या फ्लॅगशिप एक्स सीरिजच्या अंतर्गत लाँच केला आहे. हा कॅमेरा खासकरून व्‍ह्‍लॉगर आणि बिगिनर्ससाठी डिझाईन केला आहे. फुजिफिल्म्सच्या या कॅमेऱ्यात 26.1 मेगापिक्सलचा X-Trans CMOS 4 सेंसर, हाय स्पीड इमेज प्रोसेसिंग इंजीन आणि इन-बॉडी स्टेबलायझेशन (IBIS) हे फीचर्स दिले आहेत. याशिवाय कॅमेऱ्याबरोबर मिळणाऱ्या एलसीडी टचस्क्रीनमध्ये वारी (vari) अँगलचा सपोर्टही दिला असून त्याची स्क्रीन 180 डिग्रीपर्यंत फ्लिप करता येऊ शकते. या वारी अँगलमध्ये हाय, लो आणि फ्रंट फेसिंग हे अँगल दिले आहेत. फुजिफिल्म कंपनीच्या म्हणण्यानुसार एक्स सीरिजचा हा पहिला मिडरेंज कॅमेरा असून तो ‘मोशन सेंसर डिटेक्शन’सह येतो. 

याबरोबरच कंपनीने असाही दावा केला आहे, की हा कॅमेरा इतका वेगवान आहे की तो फक्त ०.०२ सेकंदात फोकस करू शकतो. या कॅमेऱ्यात ‘लाईव्ह व्ह्यू’चेदेखील फीचर दिले असून त्याबरोबरच तीन बूस्ट मोड्सही दिले आहेत. त्यामध्ये ‘लो लाइट प्रायॉरिटी’, ‘रिझोल्युशन प्रायॉरिटी मॉडेल’ आणि ‘फ्रेम रेट प्रायॉरिटी’ इत्यादींचा समावेश आहे. फुजिफिल्म एक्स-एस १० कॅमेऱ्यासह 5-एक्सिस इमेज स्टेबलायझेशन मिळते. याबरोबरच कॅमेऱ्याची सेटिंग ऑटोमॅटिकली ॲडजस्ट करणारे AUTO/SP हे फीचरदेखील दिले आहे. त्यामुळे या कॅमेऱ्याने युझर्स आरामात 30 fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. तसेच 240 fps वर हाय स्पीड फुल एचडी व्हिडिओही रेकॉर्ड करू शकतात. 

या कॅमेऱ्याचे वजन ग्रॅममध्ये असून त्याची स्क्रीन तीन इंचाची दिली आहे. फुजिफिल्म एक्स-एस १० च्या बॉडीची किंमत ९९ हजार ९९९ रुपये एवढी आहे, मात्र ग्राहकांनी 18-55mm च्या किट लेन्ससह कॅमेरा खरेदी केल्यास त्यांना १,३४,९९९ रुपये एवढी किंमत मोजावी लागेल. तसेच 16-80mm च्या किट लेन्ससह कॅमेऱ्याची किंमत १,४९,९९९ रुपये एवढी आहे. याआधी फुजिफिल्म्सने एक्स सीरिज अंतर्गत एक्स-टी १००, एक्स-ए ५, एक्स-टी ४, एक्स-ए ७, एक्स-टी २००, एक्स-टी ३० इत्यादी मिररलेस कॅमेरे लाँच केले आहेत, जे खरेदीसाठी ऑनलाइन उपलब्ध आहेत. फुजिफिल्मबरोबरच सोनी, कॅनॉन आणि निकॉन या कंपन्यांचेदेखील फुल फ्रेम मिररलेस कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या