कॅननची नवी ‘PIXMA G’ सीरीज

ज्योती बागल
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

व्हॉट्‌स न्यू

आयटी इंजिनिअर्स, सरकारी कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनादेखील अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स तयार करावे लागतात. त्यामुळे कार्यालयासह घराघरांतदेखील प्रिंटर्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी कॅननने नुकतेच बाजारात आणलेले प्रिंटर्स नक्कीच उपयोगी ठरतील...   

कॅनन (Canon) इंडिया कंपनीने भारतीय बाजारात प्रिंटर्सची ‘Canon PIXMA G’ ही नवीन सीरीज लाँच केली आहे. या सीरीजअंतर्गत PIXMA G3060, PIXMA G3021, PIXMA G3020, PIXMA G2060, PIXMA G2021, PIXMA G2020 आणि PIXMA G1020 हे सात इंक टॅंक प्रिंटर लाँच केले आहेत. हे प्रिंटर्स ड्रीप फ्री, हँड्स फ्री इंक रिफिलिंग सिस्टीमसह येतात. युजर्स कमी किमतीत जास्तीत जास्त प्रिंट्स काढू शकतात, असा दावा कंपनीने या नवीन सीरीजबाबत केला आहे. तसेच यांचा प्रिंटिंग स्पीडही उत्तम असून कार्टेजही सहज आणि कमी वेळात बदलता येते. 

  कॅननच्या या प्रिंटर्सचा वापर डॉक्युमेंट, ड्रॉइंग आणि फोटो प्रिंटसाठी होऊ शकतो. हे प्रिंटर्स घरी आणि कार्यालयात दोन्ही ठिकाणी वापरता येतील अशाप्रकारे डिझाईन केले आहेत. यामध्ये इकॉनॉमी मोड दिला आहे, ज्याच्या मदतीने युजर्स ७,७०० कलर पेज आणि ७,६०० ब्लॅक पेज प्रिंट करू शकतात. प्रिंटरमध्ये ऑन सिस्टम क्लिनिंग गाइड दिले आहे. प्रिंटरमध्ये चुकीची शाई भरली जाऊ नये यासाठी कंपनीने विशेष व्यवस्था केली आहे. म्हणजे ज्या रंगाची शाई असेल त्याच रंगाच्या टॅंकमध्ये टाकता येईल. वरील सात प्रिंटर्सपैकी PIXMA G3060, PIXMA G3020 आणि PIXMA G 3021 हे तीन प्रिंटर्स ‘ऑल इन वन’ प्रिंटर्स असून यांचा उपयोग प्रिंट, कॉपी आणि स्कॅनिंगसाठी होऊ शकतो.  

या प्रिंटर्समध्ये वायरलेस मोबाईल प्रिंट आणि क्लाउड प्रिंटचाही पर्याय दिला आहे. यामध्ये एक LCD पॅनेल दिले असून या प्रिंटर्सचा स्पीड ब्लॅक अँड व्हाईटमध्ये 10.8 ipm आणि कलरमध्ये 6.0 ipm आहे. तसेच यामध्ये एअरप्रिंटचाही सपोर्ट दिला आहे. या प्रिंटर्सचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यांमध्ये गुगल असिस्टंट आणि ॲमॅझॉन अलेक्साचाही सपोर्ट आहे, त्यामुळे युजर फक्त तोंडी सूचना देऊन कोणत्याही डॉक्युमेंटची प्रिंट काढू शकतात. याशिवाय Easy-PhotoPrint Editor ॲपचाही सपोर्ट दिला आहे.     

संबंधित बातम्या