स्मार्ट हेल्मेट

ज्योती बागल 
सोमवार, 1 मार्च 2021

व्हॉट्‌स न्यू

मोटरसायकल वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अपघातातून वाचण्यासाठी मोटारसायकल चालवताना हेल्मेट घालणे गरजेचे असते. पण चालकाचा जीव वाचवणारे हेच हेल्मेट स्मार्ट स्वरूपात आले, तर त्याचा आणखी फायदा होईल. अशाच स्मार्ट हेल्मेटविषयी... 

सध्या एका ‘स्मार्ट हेल्मेट’ची चर्चा सुरू आहे. हे हेल्मेट कोणत्याही कंपनीने तयार केले नसून  वाराणसीतील ‘अशोका इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट’ (Ashoka Institute of Technology and Management) या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या हेल्मेटला ‘मेड इन इंडिया’ हेल्मेट म्हणता येईल. याला ‘स्मार्ट ट्रॅफिक हेल्मेट’ असे नाव दिले आहे. हे स्मार्ट हेल्मेट चालकाचा जीव तर वाचवणार आहेच; शिवाय पेट्रोल बचतही करणार आहे. त्याचबरोबर अपघात झाल्यास अँब्युलन्स आणि पोलिसांना सूचना देण्याचे कामही हे स्मार्ट हेल्मेट करणार आहे. 

स्मार्ट ट्रॅफिक हेल्मेट वापरण्याचा फायदा असा, की एखादी व्यक्ती हे हेल्मेट घालून मोटरसायकल चालवत असेल आणि रेड सिग्नल लागल्यामुळे मोटरसायकल थांबवली असेल, तर मोटारसायकलचे इंजिन आपोआप बंद होईल आणि सिग्नल सुटल्यानंतर मोटरसायकलचे इंजिन आपोआप सुरू होईल. म्हणजे मोटरसायकल सिग्नलपासून ५० मीटर अंतरापर्यंतच्या टप्प्यात असेल तरच इंजिन आपोआप बंद-चालू होणार आहे.      

हे हेल्मेट ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समिटर’वर (Radio Frequency Transmitter) काम करत असून यामध्ये दोन ट्रान्समिटर आणि एक रिसिव्हर आहे. त्यापैकी रिसिव्हर मोटरसायकलवर बसवला असून एक  ट्रान्समिटर हेल्मेटमध्ये बसवला आहे. हेल्मेट घातल्यानंतर तो ॲक्टिव्हेट होतो. तसेच गाडीवरचा रिसिव्हरही सुरू होतो आणि चालकाने ते हेल्मेट घातल्यानंतर गाडी सुरू होते. यातील दुसरा ट्रान्समिटर सिग्नल सिस्टीमजवळ बसवलेला असेल. जेणेकरून मोटारसायकल रेड सिग्नलच्या ट्रान्समिटरच्या संपर्कात आली, की गाडीवरच्या रिसिव्हरला ट्रान्समिटरचा सिग्नल मिळते आणि तो बंद होतो; इंजिन बंद होते आणि सिग्नल हिरवा झाला की इंजिन पुन्हा सुरू होते. सध्या याची रेंज ५० मीटरपर्यंत असून, ती आणखीही वाढवता येऊ शकते, तसेच या हेल्मेटमध्ये आणखीही काही बदल करणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. 

या हेल्मेटची खास बाब म्हणजे या हेल्मेटमध्ये सेन्सर बसवले आहेत. त्यामुळे हे हेल्मेट घातलेल्या व्यक्तीच्या गाडीचा अपघात झाल्यास रुग्णवाहिका, पोलिस आणि कुटुंबीयांना आपोआप मेसेजद्वारे त्या व्यक्तीच्या लोकेशनची माहिती पाठवली जाईल. लोकेशनची माहिती लवकर मिळाल्याने अपघातग्रस्त व्यक्तीपर्यंत मदत तातडीने पोहोचू शकेल.

संबंधित बातम्या