फोल्डेबल एअर कुलर 

ज्योती बागल 
गुरुवार, 25 मार्च 2021

व्हॉट्‌स न्यू

उकाडा जाणवू लागला की कुलर, एसी, फॅन यांची तीव्रतेने गरज भासू लागते. मग काय, लगेच कोणत्या कंपनीचा कुलर चांगला आहे, कोणता परवडणारा आहे, कोणत्या कुलरची क्वालिटी उत्तम आहे, या सगळ्या गोष्टी पाहून खरेदी केली जाते. आता तुमच्या नेहमीच्या पर्यायात आणखी भर म्हणजे हिंदवेअर अप्लायन्सेसने आणलेले नवे एअर कुलर्स, त्याविषयी थोडक्यात...

होम अप्लायन्सेस आणि होम डेकॉर ॲक्सेसरीजसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हिंदवेअर (Hindware) या कंपनीने भारतात नुकतेच दोन प्रकारचे एअर कुलर लाँच केले आहेत. यामध्ये प्रमुख आहे तो भारतातील पहिला फोल्डेबल एअर कुलर, ज्याचे नाव आहे ‘आय-फोल्ड’ (i-Fold). याबरोबरच इतर दोन IoT एनेबल एअर कुलरही बाजारात आणले आहेत. 

‘आय-फोल्ड’ हा एअर कुलर हा विशेषकरून, कमी जागा असणाऱ्या घरांसाठी डिझाईन केला आहे. अर्थात हा फोल्डेबल असल्याने कमी जागेच्या कोणत्याही ठिकाणी त्याचा सहज वापर करता येणार आहे. या कुलरची खासियत म्हणजे हा पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात फोल्ड करता येतो आणि तितक्याच कमी कालावधीत ओपनही करता येतो. हा कुलर कॉम्पॅक्ट स्वरूपात असला तरी यामध्ये पॉवरफुल मोटर वापरली असल्याने कुलिंग चांगलेच वेगाने होते. त्याचबरोबर यामध्ये डास, किडे, धुळीचे कण जाऊ नयेत यासाठी काही फिल्टर्सही दिले आहेत. ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी म्हणजे, यामध्ये वापरलेली उत्तम टेक्नॉलॉजी, आर्टिस्टिक डिझाईन, सुदींग कलर इत्यादी.    

या ‘आय-फोल्ड’बरोबरच IoT एनेबल या सीरीजअंतर्गत आणलेल्या दोन कुलरमध्ये ‘Spectra i-Pro 36L’ हा पर्सनल कुलर आणि ‘Acura i-Pro 70L’ डेझर्ट कुलर यांचा समावेश आहे. या दोन्ही कुलरमध्ये ॲमेझॉन अॅलेक्साचा सपोर्ट दिला असल्याने युजर्स या कुलर्सना तोंडी कमांड देऊनही कंट्रोल करू शकणार आहेत. ॲलेक्साशिवाय हे कुलर्स वायफायच्या मदतीने कंपनीच्या ‘हिंदवेअर अप्लायन्सेस ॲप’ या ॲपबरोबरही कनेक्ट करता येतील. या ॲपच्या माध्यमातून कुलरला ऑन-ऑफ करता येईल. त्याबरोबरच कुलर स्पीड, कुलिंग मोड, कंट्रोल फॅन स्पीड आणि स्विंग कंट्रोलसह टायमरही सेट करता येणार आहे. तसेच या दोन्ही कुलरमध्ये ‘जेश्चर कंट्रोल फिचर’ दिले असून ‘जिओ फेन्स टेक्नॉलॉजी’चा वापरदेखील केला आहे.  

‘आय-फोल्ड’च्या या एअर कुलरची किंमत १९,९९० रुपये आहे. ‘Spectra i-Pro 36L’ची किंमत १५,९९० रुपये आहे, तर ‘Acura i-Pro 70L’ची किंमत १७,४९० रुपये आहे. हे दोन्ही एअर कुलर ॲमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि हिंदवेअरच्या www.evok.in या वेबसाइटवरून खरेदी करता येतील.

संबंधित बातम्या