सोलर वायरलेस स्पीकर 

ज्योती बागल 
सोमवार, 5 एप्रिल 2021

व्हॉट्‌स न्यू

ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेता पारंपरिक स्रोतांसह अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे गरजेचे झाले आहे. सौरऊर्जा हा ऊर्जेचा व्यापक आणि अमर्यादित स्रोत आहे. त्यामुळे सौरऊर्जेवर चालणारी सोलर बॉक्स कुकर, पॅराबोलिक सोलर कुकर, सोलर पॅनल, सोलर पंपपासून ते कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच अशी अनेक उपकरणे बाजारात दाखल झाली आहेत. असाच सौरऊर्जेवर चालणारा ‘वायरलेस स्पीकर’ नुकताच भारतात लाँच झाला आहे, त्याविषयी थोडक्यात...

युबॉन (UBON) कंपनीने पहिलावहिला ‘सोलर पॉवर ब्ल्यूटुथ स्पीकर’ भारतात लाँच केला आहे. UBON SP-115X या वायरलेस स्पीकरला इलेक्ट्रिक चार्जिंग करण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण सोलर पॉवरच्या सपोर्टमुळे हा सूर्यप्रकाशाने सहज चार्ज होऊ शकणार आहे. याशिवाय या वायरलेस स्पीकरमध्ये असणारी वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये सोलर पॉवर शिवाय यूएसबी चार्जिंग, एलईडी फ्लॅश लाईट, पोर्टेबल स्पीकर, एफएम रेडिओ आणि कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ V5.0 दिले असून हा दहा मीटरच्या रेंजमध्ये सहज कनेक्ट होऊ शकतो. यूएसबी पोर्टसह कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये मायक्रो टीएफ/एसडी कार्डचाही पर्याय दिला आहे. 

युबॉनच्या या स्पीकरमध्ये इनबिल्ट 1200mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. स्पीकरचे वजन ३०० ग्रॅम असून याची बॉडी वॉटर आणि डस्टप्रूफ आहे. हे वायरलेस स्पीकर्स स्टायलिश ब्लॅक, स्काय ब्लू, आणि रेड इत्यादी कलरमध्ये उपलब्ध आहेत. ते घर, ऑफिस आणि पार्टीसाठी परफेक्ट आहेत. तसेच कधी युजर्स बोअर झाले तर ते एफएमला शिफ्ट करू शकतात. त्यामुळे तुम्ही एखाद्या चांगल्या स्पीकरच्या शोधात असाल तर UBON SP-115X हा सोलर पॉवर वायरलेस स्पीकर उत्तम पर्याय ठरू शकतो. या सोलर पॉवर ब्ल्यूटुथ स्पीकरची किंमत १,६९९ रुपये असून याची विक्री ऑनलाइन तसेच ऑफलाइन सर्वत्र सुरू झाली आहे.   

पोर्टेबल आणि इनोव्हेटिव्ह इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तयार करणारी कंपनी ‘पोट्रोनिक्स’ने (Portronics) देखील ‘साउंडड्रम’ (Sounddrum) नावाचा एक ब्लूटूथ स्पीकर बाजारात आणला आहे. यामध्ये 5.0 ब्लूटूथ आहे. एक्स्ट्रा सपोर्टसाठी ३.५ मिमी ऑक्स (AUX) आणि ब्लूटूथ नसलेल्या पर्यायांसाठी पेनड्राइव्हचा सपोर्ट दिला आहे. या स्पीकरला सहा तासांचा बॅटरी बॅकअप दिला आहे. या स्पीकरची खासियत म्हणजे हा इतर स्पीकर्सशी कनेक्ट करता येऊ शकतो. याची किंमत ३,५९९ रुपये असून यावर एक वर्षाची वॉरंटी उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या