उपयुक्त मेडिकल गॅजेट्स

ज्योती बागल
सोमवार, 24 मे 2021

व्हॉट्‌स न्यू

कोरोनासारखे संसर्गजन्य आजार वाढत आहेत. लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी रुग्णालयात धाव घेत आहेत आणि त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका आणखी वाढत आहे. अशावेळी घाबरून न जाता घरीच ताप, ऑक्सिजनची पातळी, रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि शक्य तेवढे घराबाहेर जाणे टाळणे आवश्‍यक आहे. मात्र त्यासाठी पल्स ऑक्सिमीटर, थर्मोमीटर, ब्लड प्रेशर मशीन, ग्लुकोमीटर, ईसीजी मॉनिटर अशी मेडिकल गॅजेट्स घरात असायलाच हवीत...  

मराठीत एक प्रसिद्ध म्हण आहे, ‘तहान लागली की आड खोदणे.’ रोजच्या आयुष्यात बरेच जण असेच वागत असतात. पण असे वागणे सध्याच्या काळात अंगलट येऊ शकते. कारण सध्या कोरोनासारखी साथ सर्वत्र पसरली आहेच, पण त्याचबरोबर इतर साथीचे, श्वसनाचे आजारही वाढताना दिसत आहेत. अशावेळी प्रत्येकाने शक्य तेवढे सजग राहणे, सतर्क राहणे केव्हाही चांगले. म्हणजेच काय तर आपल्या घरात असणाऱ्या फर्स्ट एड किटमध्ये आवश्यक अशा मेडिकल गॅजेट्सचा समावेश करणे होय. यामध्ये कोणकोणत्या गॅजेट्सचा समावेश असावा, त्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा... 

पल्स ऑक्सिमीटर (Fingertip pulse oximeter) 
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी खूप खालावते. अशावेळी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. मात्र बऱ्याचदा कोरोना होऊनही आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी नॉर्मल असेल किंवा खूप खालावली नसेल, तर घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्ण घरीही उपचार घेऊ शकतात. मात्र त्यासाठी त्यांना 
सतत ऑक्सिजनची पातळी तपासावी लागते. अशावेळी पल्स ऑक्सिमीटर हे 
छोटेसे मेडिकल गॅजेट फार उपयोगी पडते. याच्या मदतीने आवश्यक तेव्हा ऑक्सिजनची पातळी आणि पल्स रेट तपासता येतात. त्यानुसार तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. त्यामुळे घर असो की कार्यालय, असे पल्स ऑक्सिमीटर तर असायलाच हवेत. 

ब्लड प्रेशर मशीन (Blood Pressure Monitor) 
हल्ली अनेक कंपन्यांची ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक/डिजिटल ब्लड प्रेशर मशीन्स बाजारात उपलब्ध आहेत. या मशीनच्या मदतीने घरच्या घरी अगदी सहज आपले ब्लड प्रेशर आणि पल्स रेटही मोजता येतात.   

ग्लुकोमीटर (Glucometer) 
ग्लुकोमीटरच्या मदतीने आपण रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे हे जाणून घेऊ शकतो. मधुमेह आणि रक्तदाब यांचा त्रास असणाऱ्या रुग्णांना इतर आजारही लवकर होतात, त्यामुळे त्यांना रक्तदाब आणि रक्तातील साखर यांचे प्रमाण व्यवस्थित ठेवावेच लागते; त्यासाठी वेळोवेळी तपासण्या कराव्या लागतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी हे गॅजेट नक्कीच उपयुक्त आहे.

ईसीजी मॉनिटर (ECG monitor) 
पूर्वी ईसीजी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते, मात्र आता पोर्टेबल पर्सनल ईसीजी मॉनिटरच्या मदतीने आपण घरीच ईसीजी मॉनिटर करून रिपोर्ट मिळवू शकता. मात्र या गॅजेटचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. अलीकडे काही स्मार्टवॉचमध्येही ईसीजी सपोर्ट  दिलेला पाहायला मिळतो. 

थर्मोमीटर (Thermometer) 
शरीराचे तापमान मोजण्यासाठी या मेडिकल गॅजेटचा वापर केला जातो. सध्या वातावरणात सतत बदल होत असतात, त्याचा आपल्या शरीरावर खूप लवकर परिणाम होताना दिसतो. शिवाय कोरोना या आजारात ताप येणे हे सर्वांत महत्त्वाचे लक्षण आहे. त्यामुळे वेळोवेळी आपले व आपल्या कुटुंबीयांचे तापमान तपासणे गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा ताप असूनही तो लक्षात येत नाही, त्यामुळे दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे नको त्या आजाराला आमंत्रणच मिळते. त्यामुळे सध्या सर्वच ठिकाणी या नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मोमीटरचा वापर वाढला आहे. 

तरुणांची रोगप्रतिकारशक्ती तुलनेने चांगली असते, पण लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना मात्र असे आजार पटकन होऊ शकतात. अशावेळी या मेडिकल गॅजेट्सचा जास्त फायदा होऊ शकतो. मात्र कोणत्याही मेडिकल गॅजेटचा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वरील सर्व मेडिकल गॅजेट्स ७०० ते ३००० हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर न पडता या मेडिकल गॅजट्सचा डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर करून आजारांपासून अनभिज्ञ न राहता वेळीच स्वतःची, कुटुंबीयांची काळजी घेणे केव्हाही चांगले. हे सर्व गॅजेट्स आकाराने अगदी छोटे छोटे असल्याने सहज कुठेही करता असून यांचा ‘फर्स्ट एड बॉक्स’मध्ये समावेश असणे गरजेचे आहे.  

या गॅजेट्सची कोरोना काळात अचानक मागणी वाढली आहे. मात्र ही गॅजेट्स जेवढी उपयुक्त आहेत, तेवढीच क्वचित ती घातकही ठरू शकतात; कारण काही वेळा ताप, ऑक्सिजनची पातळी, रक्तदाब, रक्तातील साखर यांचे प्रमाण चुकीचेही दाखवले जाऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशी गॅजेट्स खरेदी करणे उपयुक्त ठरेल.

संबंधित बातम्या