यूव्ही लाइट सॅनिटायझर

ज्योती बागल 
सोमवार, 28 जून 2021

व्हॉट्‌स न्यू

सध्या कोरोनासारखा साथीचा रोग तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अनेक जंतू, विषाणू असतात, जे आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे अशा विषाणूंना नष्ट करण्यासाठी यूव्ही लाईटचा वापर करता येऊ शकतो. अकुवा (Acuva)ने नुकतेच एक यूव्ही लाइट सॅनिटायझर बाजारात आणले आहे, त्याविषयी थोडक्यात...    

यूव्ही म्हणजे अल्ट्रा वॉयलेट लाइट (Ultraviolet light) हे मानवी शरीरास घातक असतात, मात्र वस्तूंच्या पृष्ठभागावरील जीवाणू, विषाणूंना मारण्यासाठी हेच सक्षम आहेत. यूव्ही लाइटने ९९ टक्के जंतू नष्ट होतात, याला जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेदेखील पुष्टी दिली आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्यांनी यूव्ही लाइट सॅनिटायझर बाजारात आणले असून त्यात अकुवा सोलॅरिक्स (Acuva SOLARIX) सॅनिटायझरचा नुकताच समावेश झाला आहे.     

‘अकुवा सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ने हे ‘अकुवा सोलॅरिक्स’ लाँच केले आहे. हे यूव्ही लाइट सॅनिटायझर पोर्टेबल असून ते फक्त १० सेकंदांत कोणत्याही विषाणूला, तसेच जंतूंना नष्ट करू शकतो. हे डिव्हाइस खासकरून ऑफिसच्या ठिकाणी आणि प्रवासात उपयोगी पडेल अशापद्धतीने डिझाइन केले आहे. याच्या मदतीने अगदी चावी, वॉलेट, मोबाइल, लॅपटॉप, डेक्सटॉप, हँडल अशा अगदी छोट्या छोट्या वस्तू सहज सॅनिटाइज करता येतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकुवा सोलॅरिक्स पूर्णपणे केमिकल फ्री आहे. तसेच हे डिवाइस फोल्डेबल असल्याने बॅगमध्ये किंवा अगदी आपल्या खिशात ठेवून कुठेही घेऊन जाता येऊ शकते. याला 270 डिग्रीपर्यंत फोल्ड करता येते. त्याचप्रमाणे हे डिवाइस चार्जेबल असून चार्जिंगसाठी यामध्ये टाइप-सी पोर्ट दिले आहे.

युजर्सना यूव्ही लाइटचा काही त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन हे डिवाइस डिझाइन केले आहे. यामध्ये एक टायमर आणि एक पॉवर बटण दिले आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या सेफ्टीसाठी चाइल्ड लॉकही दिले आहे. यामध्ये 3200 एमएएच ची बॅटरी दिली आहे. अकुवा सोलॅरिक्सची लॉंचिंग ऑफर सुरू असून 13,249 रुपये किमतीचे यूव्ही लाइट सॅनिटायझर, ऑनलाइन 9,999 रुपयांना मिळत आहे. ''अकुवा सोलरिक्स'' बरोबर एक ग्लोव्हजचा जोडही दिला जातो. हे डिवाइस वापरताना यूव्ही लाइट किरण आपल्या डोळ्यांवर पडू नयेत एवढी काळजी मात्र युजर्सनी घेऊन हे गॅजेट वापरायला काहीच हरकत नाही.

संबंधित बातम्या