हायटेक फेस मास्क!

ज्योती बागल 
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

व्हॉट्‌स न्यू

कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळले नसून तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका आहेच. त्यामुळे नागरिकांना सुरक्षेसाठी फेस मास्कचा वापर, लसीकरण, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करायला सांगितले जात आहे. आता काही हायटेक मास्कही बाजारात उपलब्ध झाले आहेत. असाच एक मास्क म्हणजे ‘केएन ९५’ फेस मास्क (KN95 Face mask). या मास्कबद्दल सविस्तर जाणून घेऊ...

मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Massachusetts Institute of Technology) आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल इन्स्पायर्ड इंजिनिअरिंग (Wyss Institute for Biologically Inspired Engineering)च्या एका रिसर्च टीमने ‘केएन ९५’ नावाने एक प्रोटोटाईप फेस मास्क तयार केला आहे. या फेस मास्कची खासियत म्हणजे फक्त श्वासोच्छ्वासावरून एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित आहे की नाही ते समजणार आहे. बायोटेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या ‘केएन ९५’ फेस मास्कमध्ये सिंथेटिक बायोसेन्सर (Biosensor)चा वापर केला आहे. या बायोसेन्सरच्या मदतीने केवळ ९० मिनिटांत एखाद्या व्यक्तीच्या श्वासात कोरोनाचा विषाणू होता की नाही हे कळू शकेल. ही टेस्ट करण्यासाठी या मास्कला एक बटण दिले आहे. हे बटण सुरू केले की सेन्सर ॲक्टिव्ह होतात, त्यानंतर रीड आउट स्ट्रिपद्वारे ९० मिनिटांत रिझल्ट समोर येतो. या सेन्सरने कोरोना विषाणूशिवाय इतरही अन्य विषाणू, जिवाणू शोधता येतात.

‘केएन ९५’ फेस मास्कच्या अचूकतेबद्दल बोलायचे झाले तर आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्टप्रमाणेच अचूक रिझल्ट हा फेस मास्क देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या छोट्याशा मास्कमध्ये पूर्ण लॅब समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या पीटर गुयेन यांनी म्हटले आहे. ‘केएन ९५’ फेस मास्कबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मास्कमध्ये बसवलेला डिस्पोजेबल सेन्सर आकाराने खूप छोटा आहे, त्यामुळे तो इतर कोणत्याही फेस मास्कमध्ये फिट करता येऊ शकतो. या मास्कच्या निर्मितीसाठी रिसर्च टीम पार्टनरच्या शोधात असल्याचे उपलब्ध माहितीतून समजते. जर या मास्कचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करून सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध करून दिले तर याचा नक्कीच फायदा होईल.

संबंधित बातम्या