iQOOचा ‘Z5 5G’ स्मार्टफोन लाँच!

ज्योती बागल 
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

व्हॉट्‌स न्यू

साधारण दोन महिन्यांपूर्वी iQOO कंपनीने भारतात iQOO Z5 5Gचे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. त्यावेळी आर्टिक डॉन (Arctic Dawn) आणि मिस्टिक स्पेस (Mystic Space) या दोन कलरमध्ये ते स्मार्टफोन सादर केले होते. आता मात्र कंपनीने या फोनला सायबर ग्रिड (Cyber Grid) कलरमध्ये नव्याने लॉँच केले आहे.  या स्मार्टफोनच्या फीचर्सविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

iQOO इंडियाने भारतात iQOO Z5चा नवीन  सायबर ग्रिड व्हेरियंट लॉँच केला आहे. iQoo Z5मध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर दिला आहे आणि रॅम स्टोरेजचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेल्या iQOO Z5 5Gची किंमत ₹   २३,९९०/- आहे, तर 256 GB स्टोरेज मॉडेलसह 12 GB रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत ₹ २६,९९०/- आहे. 

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. पहिली लेन्स ६४ मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आहे, तर दुसरी लेन्स ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेन्स आहे, आणि तिसरी लेन्स दोन मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तसेच iQOO Z5मध्ये अँड्रॉइड ११ ही सिस्टीम वापरली आहे. 

या व्यतिरिक्त iQOO Z5 5Gमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असून यामध्ये HDRचा सपोर्टदेखील आहे. त्याचबरोबर स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 642L GPU, 12GBपर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GBपर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये व्हर्च्युअल रॅम 4GBपर्यंत वाढवण्याची सुविधादेखील आहे. चांगल्या गेमिंगसाठी फोनमध्ये लिक्विड कूलिंग सिस्टीमदेखील आहे. शिवाय यात अल्ट्रा गेम मोड 2.0 देखील आहे.

या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G (n1/ n5/ n8/ n28/ n41/ n77/ n78), ट्राय-बँड वाय-फाय (2.4GHz, 5.1GHz, 5.8GHz), ब्लूटूथ v5.2, यूएसबी टाईप - सी पोर्ट, ३.५ मिमी हेडफोन जॅक, जीपीएस, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. 5000mAh बॅटरी आहे, जी 44Wच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन आर्टिक डॉन आणि मिस्टिक स्पेस कलरमध्ये उपलब्ध असून ॲमेझॉन आणि iQoo स्टोअरमधूनही खरेदी करता येईल.

संबंधित बातम्या