दमदार पॉवर बँक! 

ज्योती बागल
रविवार, 7 जून 2020

व्हॉट्‌स न्यू
स्मार्टफोन्सचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मग तो  कामासाठी असेल,  ऑनलाइन  गेम्स  खेळण्यासाठी असेल  किंवा कोणत्याही प्रकारच्या  कम्युनिकेशनसाठी असेल! हे  कम्युनिकेशन थांबू नये यासाठी इंटरनेट एवढीच गरज असते ती चार्जिंगची. त्यामुळे चार्जर आणि पॉवर बँक यांनाही तेवढेच महत्त्व आहे. पण लांबच्या प्रवासाला जाताना चार्जरपेक्षा पॉवर बँक जास्त उपयुक्त ठरते.  बाजारात नुकत्याच दाखल झालेल्या पॉवर बँक्सविषयी थोडक्यात माहिती...  

अँकर या  जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनीने नुकतीच नवीन  पॉवर बँक भारतात  लाँच  केली आहे. अँकरने आणलेल्या आतापर्यंतच्या  सर्व पॉवर बँकमध्ये ही  पॉवर बँक सर्वांत खास असल्याचे मानले जात आहे. या  पॉवर बॅंकचे नाव  ‘जंप स्टार्टर प्रो’ (Jump Starter Pro) असे आहे. या पॉवर बँकची खासियत म्हणजे हिने  स्मार्टफोन  तर  चार्ज  करता येतोच; शिवाय एखाद्या गाडीचे इंजिनही चार्ज  करता येते. या  पॉवर बँकमध्ये कंपास, यूएसबी पोर्ट्स आणि  एलईडी लॅंपचा सपोर्ट दिला आहे.  त्यामुळे युजर्सना  स्मार्टफोनसह कॅमेरा, मॅकबुक यांसारखे  डिव्हाइसही चार्ज करता येणार आहेत.   

अँकरची जंप स्टार्टर प्रो ही  लेटेस्ट पॉवर बँक  कॉम्पॅक्ट स्वरूपात डिझाईन केली असून खास गाड्यांचे इंजिन सुरू  करण्यासाठी असे  डिझाईन केल्याचे बोलले जाते.  या  पॉवर बँकमध्ये ८,००० एमएएचची  बॅटरी दिली आहे.  या पॉवर बँकची किंमत  ८,४९० रुपये असून यावर बारा महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. ही  पॉवर बँक कंपनीच्या अधिकृत  वेबसाइटवरून  तसेच ॲमेझॉनवरूनही खरेदी करता येऊ शकते.      

शाओमीनेदेखील नुकतीच एक सोलर  पॉवर बँक लाँच  केली आहे.  या ‘YEUX’ पॉवर  बँकला  खास आऊटडोर ट्रॅव्हलसाठी डिझाईन करण्यात आले आहे. या  सोलर  पॉवर बँकला  बॅगपॅक  ॲटॅच  करता येऊ येते. त्यामुळे ट्रॅव्हलिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, कॅम्पिंगसाठी ही  पॉवर बँक नक्कीच उपयुक्त ठरू शकते. YEUX सोलर  पॉवर बँकची  किंमत ३,६०० रुपये एवढी आहे. ही  पॉवर बँक हाय सेन्सिटिव्हिटी, सिग्नल क्रिस्टल सिलिकॉन सोलर पॅनलचा वापर करते. त्यामुळे या  पॉवर बँकचा  कन्व्हर्जन रेट  खूप चांगला असल्याचे बोलले जाते.  या  पॉवर बँकमध्ये दिलेल्या चार्जिंग बोर्डचे खास वैशिष्ट्य बघितले तर  यात सोलर चिप टेक्नॉलॉजी दिली आहे. याच्या मदतीने कमी ऊन असले, तरी चार्जिंग बोर्ड  वेगाने चार्ज करता येतो. यामध्ये ग्रीन, यलो आणि रेड अशा तीन लाइट्स दिल्या आहेत. ज्या अनुक्रमे खूप ऊन, साधारण ऊन आणि कमी ऊन  दर्शवतात. विशेष म्हणजे पाऊस पडल्यानंतरही  ही  पॉवर बँक चार्ज करता येते.    

या  सोलर  चार्जरमध्ये ६,४०० एमएएचची लिथियम बॅटरी देण्यात आली आहे.  या बॅटरीला  कोणत्याही लाइटला रिचार्जवर ठेवता येते. पॉवर सप्लाय झाल्यानंतर बॅटरी थेट रिचार्ज करता येते.  हे थ्री आऊट इंटरफेस डिझाईनवर काम करते. या  पॉवर बँकमध्ये  दोन यूएसबी पोर्ट आणि १० वॉटचे  मायक्रो यूएसबी पोर्ट  दिले आहे. या  सोलर पॉवर बॅंकनेदेखील स्मार्टफोनबरोबरच, डिजिटल कॅमेरा, टॅब्लेट्स, दुसरी पॉवर बँक आणि असे इतर डिव्हाइसेसही चार्ज करता येतात.  या पॉवर बँकला इनक्रिप्टेड ऑक्सफर्ड क्लोथच्या मदतीने तयार केले असून  हे वॉटरप्रूफ आहे. त्यामुळे ही  पॉवर बँक कधीही, कुठेही सहज वापरता येऊ शकते. 

संबंधित बातम्या