रहिए अब ऐसी जगह... 

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

जगण्यासाठी जी वणवण ग़ालिबला करावी लागली, ती फलप्रद ठरली नव्हती. त्याला अपयश आलं होतं. त्याचा पेंशनचा अर्ज १८३१ मध्येच निकालात निघाला. दिल्लीत राहताना त्याची जगण्याची लढाई कशीबशी चालू होती. अर्थात काही काम करून पैसे कमवण्याची धडपड त्याने केली नाही, हा भाग आहेच. कारण त्याची जडणघडण आणि वाटचाल विशिष्ट पद्धतीनं झाली होती. त्यात सैनिकी किंवा दरबारी पद असणं महत्त्वाचं होतं. सैनिकी पेशापासून तर तो केव्हाच दूर आला होता. उर्दू-फ़ारसी काव्य, भाषा यात त्याला विशेष गती होती. पण या कौशल्याचं रूपांतर पैशात, आमदनीत करणं त्याला जमलं नाही. त्याच्या स्वभावातला ताठा, अभिमान आणि रूढ नीतिमत्ता व आचरणाचे संकेत धुडकावण्याची वृत्ती आड आली. अशा स्वभावामुळंच १८४० मध्ये त्यानं चालून आलेली फ़ारसी शिक्षकाची नोकरी गमावली होती. यानंतरचे त्याचे दिवस बिकट होत चालले. तशात उंची मद्य पिण्याची आणि उत्तम दर्जाचं मांस भक्षण करण्याची त्याची सवय त्यानं सोडली नव्हती. हलाखीच्या परिस्थितीत भर टाकणारं असंच त्याचं हे वर्तन होतं... 

एकीकडं कलकत्ता वारीमुळं त्याचं नाव झालं होतं, भलेही आर्थिक आघाडीवर त्याचा अपेक्षाभंग झाला असेल. पण त्याच्या कवित्वाची आणि भाषाप्रभुत्वाची चर्चा होऊ लागली होती. ग़ालिबचे अनेक मित्र ठिकठिकाणी होते आणि त्यांच्याशी त्याचा नित्याचा पत्रव्यवहार असे. या दोस्तांमुळंही त्याच्या नावाचा गवगवा अधिक होत होता. मात्र जगताना या गोष्टींचा काहीएक उपयोग नव्हता. ग़ालिबची साहित्यसाधना मात्र सुरूच होती. आपलं काव्यच काही दिलासा देईल, असं त्याला वाटत होतं. १८३३ मध्ये त्यानं उर्दू दीवान तयार केला होता, पण तो प्रसिद्ध १८४१ मध्ये झाला. 

अशा परिस्थितीत ग़ालिबनं एक मार्ग शोधला, ज्यामुळं त्याला बदनामीचा धनी व्हावं लागलं... तसंही ग़ालिब धर्मभीरू नव्हता. तो मद्यपान करत असे आणि शिष्टसंमत नसलेला जुगारही खेळत असे. पण चौसर खेळायला कायद्यानंही बंदी होती. ग़ालिब केवळ खेळत होता असं नाही, तर त्यानं घरात जुगाराचे अड्डे भरवायला सुरुवात केली. त्याकाळी हौस म्हणूनही कुणी कुणी ‘चौसर’ हा खेळ खेळत असे. चौसर हा एक तऱ्हेचा सारीपाटाचा खेळच. चार रंगांच्या सोंगट्या आणि तीन फासे घेऊन ‘अधिक’ (+) चिन्हाच्या आकाराच्या पटावर हा खेळ खेळला जाई. (हिंदू पुराणात शिव आणि पार्वती सारीपाट खेळत असं मानलं जातं.) ग़ालिबलाही चौसर खेळणं आवडत असे. त्याला त्याचा नादच होता. पैसे लावून चौसर खेळल्यास त्यातून धनलाभही होतच असे. त्याच्या आयुष्यातलं हे एक अधःपतनच होतं. 

पैशाच्या निकडीतून त्रस्त झालेल्या ग़ालिबनं आलेली आर्थिक ओढाताण संपवण्यासाठी घरात चौसरचा अड्डा भरवण्यास सुरुवात केली. तत्कालीन सरकारच्या कायद्यानुसार जुगार खेळायला बंदी होती. मामला गुपचूप होता. १८४० मध्ये दिल्ली कॉलेजातली प्राध्यापकी मिळण्याआधीच सोडल्यानंतर त्याचे दिवस खडतर होत चालले होते. त्याचवर्षी त्याची आई गेली. तर १८४१ च्या सुरुवातीला त्याला घरात जुगार अड्डा चालवल्याबद्दल १०० रुपयांचा दंड झाला. दुसरीकडं त्याचा उर्दू दीवान तयार होत होता आणि १८४१ च्या ऑक्टोबरात तो प्रकाशितही झाला. त्याला ग़ालिबनं लिहिलेली फ़ारसी भाषेतली प्रस्तावना होती. या पुस्तकाची प्रशंसा तत्कालीन गव्हर्नर जनरलनंही केली होती. त्यानंतर १८४५ मध्ये त्याचा फ़ारसी दीवान पुस्तकरूपात आला. इकडं असा आशादायक माहौल असताना, ग़ालिबला निर्धनतेनं जेरीस आणलं होतं. त्याच्या घरी चालणारे जुगाराचे अड्डे हा त्यानं निवडलेला अर्थार्जनाचा अनधिकृत मार्ग चालू होताच. दिल्लीतल्या चाँदनी चौकातले अनेक सधन सुवर्णकार व जवाहिरांचे शौकिन व्यापारी त्याच्या घरी चौसर खेळण्यासाठी येत असत. त्याकाळचा दिल्लीचा कोतवाल मिर्ज़ा ख़ानी हा काव्यप्रेमी आणि ग़ालिबचा विशेष चाहता होता. तो त्याच्या या गुन्ह्याकडं दुर्लक्ष करत असे. पण या कोतवालाची नंतर बदली झाली आणि नवा कोतवाल फ़ैज़ल हसन ख़ान त्याच्या जागी आला. हा अतिशय कडक होता आणि गुन्हा करणाऱ्याला शासन झालंच पहिजे, असा त्याचा खाक्या होता. त्याच्या कारकिर्दीत ग़ालिबला चांगलाच झटका बसला आणि त्याला आयुष्यभर पुरेल असा डाग त्याच्या माथी लागला. 

ग़ालिब आपल्या घरात अड्डे चालवत होता आणि या नव्या कोतवालानं त्याला धडा शिकवण्याचा निश्चयच केला होता. १८४७ मध्ये २५ मे रोजी ग़ालिबला रंगेहाथ पकडण्यात आलं. त्यासाठी चक्क सापळाच लावण्यात आला. चौसरचा खेळ रंगात आला असताना, पालखीतून महिला वेषात पोलिस शिपाई उतरले. त्यांनी खेळ थांबवला आणि ग़ालिबसह आणखी चारजणांना ताब्यात घेतलं. त्यांची तुरुंगातच रवानगी झाली. पकडलेल्यांमधले इतर चौघे पैसे चारून सुटले. पण ग़ालिबकडं कुठला इतका पैसा असायला? त्याला सहा महिने तुरुंगवासात राहावं लागणार होतं. अशावेळी त्याला मदत करायला कोणीही धावून आलं नाही. उलट हितशत्रू गंमत बघत होते आणि त्याच्याबद्दल आणखी कंड्या पिकवत होते. 

ग़ालिबपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान असलेला शेफ़्ता हा शायर केवळ त्याच्या साह्यासाठी उभा राहिला. शेफ़्ता दिल्लीचा होता आणि ग़ालिबशी त्याची दोस्ती होती. नवाब मुस्तफ़ा ख़ान हे त्याचं मूळ नाव. तर ‘शेफ़्ता’ हे त्याचं उर्दू कवी म्हणून तख़ल्लुस (कविनाम) होतं. तर फ़ारसी काव्यासाठी तो ‘हसरती’ हे नाव वापरत असे. आपल्या उर्दू काव्यासाठी तो मोमिनला, तर फ़ारसी काव्यासाठी ग़ालिबला सल्ला विचारत असे. पुढं १८५७ नंतर शेफ़्तालाही त्यातील सहभागाच्या आरोपाखाली अटक झाली होती व त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ग़ालिबच्या बाजूनं उभं राहताना शेफ़्तानं सांगून टाकलं, ‘मिर्ज़ाबद्दलची माझी कौतुकाची भावना काही त्याच्या धार्मिक किंवा संतप्रवृत्तीवर आधारित नव्हती. तर त्याची बुद्धिमत्ता आणि उत्कृष्ट अशा काव्यशैलीमुळं ती होती. त्याच्यावरचा जुगाराचा आरोप हा नवीन आहे खरा; पण त्याला असलेला हा शौक सर्वज्ञातच होता. म्हणूनच, त्याला अटक झाल्यामुळं मला त्याच्याविषयी वाटणारा आदर कमी का बरं व्हावा? त्याची कलात्मक क्षमता आणि सर्जनशीलता तर बदललेली नाही.’ अगदी बादशाह बहादूरशाह ज़फरनं केलेल्या रदबदलीचा उपयोग झाला नव्हता. वास्तवात तो नामधारी बादशहाच उरला होता. खरं राज्य तर कंपनी सरकारचंच होतं. त्यामुळं जामिन मिळण्याचीही शक्यता उरली नव्हती. शेफ़्ताच्या प्रयत्नांचा ग़ालिबच्या शिक्षेत कपात होण्यास हातभार लागला. अखेर रॉस नावाच्या ब्रिटिश माणसानं मध्यस्थी केली, तेव्हा सहा महिन्यांची ही शिक्षा तीन महिन्यांवर आली. त्याशिवाय दोनशे रुपयांचा दंडही भरावा लागला. तोही बहुधा शेफ़्तानंच भरला. शेफ़्ताबद्दल ग़ालिब आयुष्यभर कृतज्ञ राहिला. 

मित्र असा बाजूनं उभा असताना आणि काही इंग्रज अधिकाऱ्यांनाही ग़ालिबची सुटका व्हावी असं वाटत असताना, नातेवाईकांनी मात्र ग़ालिबकडं पाठ फिरवली होती. लोहारूच्या त्याच्या सासुरवाडीनं तर त्याला एकदम झटकूनच टाकलं होतं. त्याला तुरुंगात भेटायलाही कोणी गेलं नाही. या घटनेनंतर आग्र्याच्या तत्कालीन वर्तमानपत्रांमधून ग़ालिबच्या अटकेविषयीची बातमी छापून आली होती. त्यात त्याचं नातं या घराण्याशी असल्याचा उल्लेख होता. त्यावेळी त्याच्या सासरच्या जहागीरदार घराण्यानं लगेच ग़ालिबशी आपलं नातं असल्याचा इन्कार केला. लांबचं नातं लागतं, असं त्यांनी जाहीर केलं. 

या एकूणच घटनेमुळं ग़ालिबला जीवनाचं आणि माणसांचं स्वरूप कळालं. एका बाजूनं तो उद्विग्नही झाला. आपण चांगलं काम केलं नाही, हे त्याला पटत होतं. त्याची शिक्षा त्यानं भोगली होती. पण ग़ालिबनं कधीही आपलं कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला नाही. शेफ़्ता जवळजवळ रोज त्याला तुरुंगात जाऊन भेटत असे. तुरुंगातला अधिकारीवर्गही ग़ालिबला सन्मानानं वागवत असे. त्याच्या मित्रमंडळींवर, भेटायला येण्यावरही बंधनं घातली नव्हती. पण भेटायला येणारेही कमी होते. घरून त्याला हवं ते मागवण्याची मुभाही होती. पण तरीही झालेल्या मानहानीची कसर भरून येणार नव्हती. तसा ग़ालिब आपल्याच मस्तीत राहणारा. त्याला एरवी आपल्या बदनामीचं भय नव्हतं. स्वतःवर हसण्याचा त्याचा स्वभाव होता आणि आपल्यावर आलेलं तो फारसं मनावर घेत नसे. त्याचा हा शेर पाहिला की खात्री पटेल - 
थी ख़बर गर्म कि 
‘ग़ालिब’ के उड़ेंगे पुर्जे 
    देखने हम भी गए थे 
    पर तमाशा न हुआ 

जुगार खेळताना मागंही कधीतरी त्याला कोतवालानं पकडलं होतं. तेव्हा इतरजण पळून गेले होते आणि ग़ालिब तेवढा त्याच्या हाती लागला. जुगार खेळत होतास का, असं कोतवालानं विचारताच तो उत्तरला होता, ‘हो, खेळत तर होतो. पण तुम्ही येऊन रंगाचा भंग केलात...’ यावर कोतवाल संतापला होता आणि पुन्हा सापडलास तर तुला तुरुंगात टाकेन, असं बजावून निघून गेला होता. (ज्या तवायफ़च्या कोठीवर हा कोतवाल जायचा, तिथं ग़ालिबला आपली काव्यरचना ऐकायला मिळाली होती आणि त्याचं तिथलं जाणंयेणं वाढलं होतं. ही गोष्ट कोतवालाला कळताच या स्त्रीला त्यानं तिथून हाकललं होतं, असाही एक किस्सा सांगितला जातो. ग़ालिबला आरोपात अडकवण्यात म्हणूनच या कोतवालाला रस होता.) एकूणच ग़ालिबला या नव्या कोतवालाची दुश्मनी महागात पडली. त्यात घरात जुगार अड्डा चालवण्याचा आरोप ही काही साधी बाब नव्हती. शिवाय शिक्षा होऊन वाट्याला आलेल्या या तुरुंगवासाची गोष्ट वेगळी होती. गंभीर होती. 

या काळात ग़ालिबनं एका पत्रात आपल्या एका मित्राला लिहिलं आहे, ‘मला असं वाटतं की या जगातच आपण राहू नये. जर राहिलोच, तर मग हिंदुस्तानात राहू नये. रोम आहे, इजिप्त आहे, इराण आणि बग़दाद आहे. तेही सोडून दे. तसंच खुद्द क़ाबा हे तर स्वतंत्र लोकांचं आश्रयस्थान, ईश्वराची कृपा हवी असलेल्यांचं घर आणि हृदय असलेल्या लोकांचं विसाव्याचं स्थान आहेच.’ 

घरापासूनचं अन् बाहेरच्या जगापासूनचं तुटलेपण. तेही तीन महिने. या कालावधीत कारावासात असताना ग़ालिबला एकटेपण छळत होतं आणि तरीही तेच बरं, असंही वाटत होतं. तुरुंगात असताना त्यानं लिहिलेली ही ग़ज़ल प्रसिद्धच आहे, ज्यात तो अगदी एकांतवासात जाऊन राहण्याची आणि जगापासून, मित्रमंडळींपासून तुटलेलं राहण्याची इच्छा व्यक्त करतो... आजारी पडल्यावर कोणी काळजी घेणारा नसेल आणि मृत्यूनंतरही कोणी शोक करणारा नसेल, अशा जागी जाण्याची आस त्याच्या मनात या तुरुंगवासानं जागवली... 
रहिए अब ऐसी जगह 
चलकर जहाँ कोई न हो 
    हमसुख़न कोई न हो 
    और हमज़बाँ कोई न हो 
बेदर-ओ-दीवार सा 
इक घर बनाया चाहिए 
    कोई हमसाया न हो 
    और पासबाँ कोई न हो 
पड़िए गर बीमार तो 
कोई न हो तीमारदार 
    और अगर मर जाइए तो 
    नौहा-ख़्वाँ कोई न हो  

संबंधित बातम्या