बेसबब हुआ दुश्मन... 

नंदिनी आत्मसिद्ध
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

जुगार खेळल्यामुळं तुरुंगात गेलेला ग़ालिब मुळात आयुष्याच्या जुगारातही मातच खात होता. हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही त्याला जगण्याची भ्रांत सतावतच होती. म्हणूनच तर त्याच्यासारखा प्रतिष्ठित मनुष्य जुगाराकडं वळला होता. या तुरुंगप्रकरणात ग़ालिबचा दोष नसताना त्याला कोतवालानं वैयक्तिक वैरामुळं अडकवलं, असं ग़ालिबचा एक चरित्रकार अल्ताफ़ हुलैन हाली यानं (‘यादगार-ए-ग़ालिब’) लिहिलं आहे. पण हे खरं नव्हतं. तशात हाली हा ग़ालिबचा भक्तच होता, त्यामुळं तो त्याच्या गुन्ह्यावर पांघरूण घालत होता. ग़ालिब जुगाराचा अड्डा चालवत होता, हे सत्यच होतं. मात्र त्याच्यासारख्या शाही दरबारात आणि इंग्रज अधिकाऱ्यांशी संपर्क असणाऱ्या मनुष्यालाही अटक चुकली नाही. अपराधाची सजा होण्यात न्याय होताच, परंतु तो ‘ग़ालिब’ होता, म्हणून त्याला शिक्षेबाबत माफी मिळाली नाही. ग़ालिबला ज्याप्रकारे शिक्षा झाली ते पाहता, यात सापळा रचूनच त्याला अडकवलं गेलं, हेही खरं होतंच... संबंधित कोतवालानं शाही दरबार, प्रतिष्ठित मान्यवर आणि इंग्रज अधिकाऱ्यांची विनवणी धुडकावून लावत ग़ालिबला शिक्षा मिळेल, असं पाहिलं. ग़ालिबविषयी त्याच्या मनात एक अढी असावी, हे स्पष्ट दिसतंच. पण काहीतरी कट यामागं असण्याची शक्यता आहे. करण ग़ालिबची लोकप्रियता काहींना सलत होतीच... कदाचित त्याला आयुष्यातून उठवण्याचा डावही यात असण्याची शक्यता आहे. म्हणूनच या साऱ्यापासून दूर जाण्याची भावना ग़ालिबच्या मनात उमटली. याच संदर्भात ‘मी काही कुणी मोठा ज्ञानी नाही की विद्वान नाही. असा काय मोठा गुन्हा मी केला, की अकारण दैवच माझा शत्रू बनलं’ असा सवाल ग़ालिबनं एका शेरमध्ये केला आहे... 
हम कहाँ के दाना थे, किस हुनर में यकता थे 
बेसबब हुआ दुश्मन ‘ग़ालिब’ आसमान अपना 

तुरुंगवासातून बाहेर पडलेला ग़ालिब अनुभवाचं गाठोडं घेऊनच बाहेर आला. शिवाय या काळात त्यानं फ़ारसी भाषेत काही उत्कृष्ट अशा काव्यरचनाही केल्या. ज्या शेफ़्तानं मदत केली होती, त्याचा उल्लेख ग़ालिबनं एका फ़ारसी कवितेत केला आहे. तसंच स्वतःच्या मृत्यूची सूचना देत, आपल्या एका उर्दू शेरमध्येही शेफ़्ताचा उल्लेख करून ग़ालिब म्हणतो, ‘शेफ़्ता आणि वहशत (दोघेही ग़ालिबचे शिष्य व मित्र) यांनी आता या ग़ालिबचं शोकगीत गावं. असं म्हणतात की मूर्खासारखं बोलणारा ‘ग़ालिब’ आता मरण पावला आहे.’ 
वहशत-ओ-शेफ़्ता अब मर्सिया कहवें शायद 
मर गया ‘ग़ालिब’-ए-आशुफ़्ता-नवा कहते हैं
 

स्वतःला आशुफ़्ता (घनचक्कर, भ्रमिष्ट) म्हणवून घेणारा ग़ालिब त्याच्या काव्यात अनेकदा भेटतो... एके ठिकाणी तो म्हणालाच होता - 
कहा किसने ‘ग़ालिब’ बुरा नहीं लेकिन 
सिवाय इसके कि आशुफ़्ता-सर है क्या कहिये 

खरोखरच वेड लागण्यासारखी परिस्थिती त्याच्या अवतीभवती होती. यातून काही मार्ग निघायला हवा होता. काही प्रमाणात तो निघण्याची चिन्हं दिसू लागली. खरं तर त्याला पूर्वीच, म्हणजे पेंशनचा अर्ज फेटाळला गेल्यानंतर, १८३५ च्या आसपास एकानं हैदराबादला जाण्याचा सल्ला दिला होता. तिथं महाराजा चंदूलाल हा निज़ामाचा पंतप्रधान काही सन्मान देईल. कारण तो काव्याची कदर करतो, असं सुचवलं गेलं. पण ग़ालिब काही तिथं गेला नाही. आपलं नाव तिथपर्यंत पोचलं असेल-नसेल, कशाला जा, असा विचार त्यानं केला असावा. तुरुंगातून बाहेर आल्यावरही त्याला असे सल्ले मिळाले. पण कुठल्यातरी नवाब व राजाची नोकरी पत्करणं त्याला रुचणारं नव्हतं. खास करून, आपण नोकरी मागायला जाणं हे त्याला किंमत कमी करून घेण्यासारखं वाटत होतं. आपले गुण पारखून आणि योग्यता ओळखून एखाद्यानं स्वतःहून आपल्याला बोलावून घ्यावं, अशी त्याची इच्छा आणि अपेक्षा होती. पण हे व्हावं कसं? शेवटी त्याच्या मित्रांनी आणि हितचिंतकांनी उचल खाल्ली आणि ग़ालिबला एखादं पद सन्मानपूर्वक मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले. दिल्लीचा बादशहा बहादूरशाह ‘ज़फ़र’कडं शब्द टाकून त्याला काही काम देण्याची बादशहाचा हकीम असहान उल्लाह आणि गुरू मियाँ काले या मान्यवरांनी शिफारस केली. ती मान्य होऊन ग़ालिबला तैमूर वंशाचा इतिहास फ़ारसी भाषेतून लिहिण्याचं काम देण्यात आलं. ग़ालिब मग १८५० च्या जुलै महिन्यात बादशहासमोर दरबारात आला आणि त्याचा ‘नज़म-उद-दौला दबीर-उल-मुल्क निज़ाम जंग’ असा गौरव करून त्याचा सत्कार करण्यात आला. महिना पन्नास रुपयांच्या वेतनावर तो शाही दरबारी नोकर झाला. या संदर्भातील साहित्य त्याला उपलब्ध करून देण्यात आलं. हा इतिहास दोन खंडांमध्ये लिहिण्याचं ग़ालिबनं ठरवलं होतं. पहिल्या खंडात तैमूरपासून हुमायूनपर्यंत आणि दुसऱ्यात अकबरापासून ते बहादूरशहापर्यंतचा इतिहास शब्दबद्ध होणार होता. पैकी पहिला खंड १८५४ मध्ये ‘मेहर-ए-नीमरोज़’ (माध्यान्हीचा सूर्य) या नावानं प्रकाशित झाला. याच सुमाराला लाल किल्ल्यातला बादशहाचा उत्तराधिकारी युवराज मिर्ज़ा मोहम्मद सुलतान ग़ुलाम फ़ख़रुद्दीन ऊर्फ ‘रम्ज़’ हा ग़ालिबचा शागिर्द बनला आणि यानिमित्त त्याला वर्षाकाठी ४०० रुपये तनख़ा मिळू लागला. तसंच दरबारी कवी ‘ज़ौक’ हा त्याच वर्षी मरण पावल्यावर ‘ज़फ़र’ही ग़ालिबकडून आपल्या काव्याचं परिष्करण करून घेऊ लागला. त्याचा दुसरा एक मुलगा, मिर्ज़ा ख़िज़र सुलतान हासुद्धा ग़ालिबचा शागिर्द बनला. याचा आर्थिक फायदाही ग़ालिबला होत होताच. शिवाय अयोध्येचा नवाब वाजिद अली शहा याच्याकडूनही ग़ालिबला ५०० रुपयांचं वर्षासन मिळायला याच वर्षी (१८५४) सुरुवात झाली. ग़ालिबचं बरं चाललं होतं. 

दिवस पालटू लागले आणि सुखाचा आस्वाद पुन्हा घेता येऊ लागला खरा, पण हे अल्पकाळच टिकणार होतं. कारण वातावरण बदलत चाललं होतं. इंग्रजांच्या राजवटीचे पाश इथल्या संस्थानिकांच्या गळ्याशी आवळत चालले होते. घटना एकामागोमाग एक घडत होत्या. १८५६ च्या फेब्रुवारीत वाजिद अली शहाचं राज्य खालसा झालं. त्याचवर्षी  ग़ालिबचा शागिर्द असलेला एक राजपुत्र मरण पावला. या दोन ठिकाणची मिळकत बंद होते न होते, तोच १८५७ हे वर्ष उजाडलं आणि त्या वर्षी १० मे रोजी मेरठला शिपायांच्या बंडाला तोंड फुटलं. त्याची पावलं दिल्लीपर्यंत यायला कितीसा वेळ लागणार होता? पुढं बघता बघता याचं मोठ्या देशव्यापी स्वातंत्र्यलढ्यात त्याचं रूपांतर होत गेलं... मेरठहून निघालेले बंडखोर सैनिक ११ मे १८५७ रोजी, दिल्लीच्या वेशीपाशी आले. दिल्लीचा दरवाजा त्यांनी उघडायला लावला आणि बादशहा बहादूरशाहला आपलं नेतृत्व करण्याची गळ घातली. बहादूरशाहनं स्वतःला ‘हिंदुस्थानचा बादशहा’ म्हणून घोषित करावं, असा आग्रह त्यांनी धरला. ८२ वर्षांचा वृद्ध बादशहा याला राजी होण्यास आधी तयार  नव्हता. पण घटनाच अशा घडत होत्या की परिस्थितीनं त्याला होकार द्यायला भाग पाडलं. मात्र प्रत्यक्षात तो नामधारी बादशहाच ठरला. काही दिवस धामधूम चालली, पण या मंडळींचं बळ फार काळ टिकलं नाही. तरी या लोकांनी इंग्रजांचा खजिना लुटला. अनेक ब्रिटिश अधिकारी आणि नागरिकांची कत्तल केली. बरेच इंग्रज दिल्ली सोडून पळाले. पण पाचेक महिन्यांतच ब्रिटिशांनी दिल्ली शहरावर पुन्हा ताबा मिळवला. त्यानंतर त्यांनीही अतिशय कडक व निर्दय धोरण अंगीकारलं आणि त्यांच्या सैनिकांची दंडेली सुरू झाली. या बंडात भाग घेतल्याच्या संशयावरून अनेकांची तपासणी सुरू करण्यात आली. अनेक नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना बंडातील सहभागावरून फासावरही चढवलं गेलं. लोकांच्या घरादारावर जप्ती आली. सधन घरांमधील स्त्रिया व मुलं अक्षरशः देशोधडीला लागली. तर पुरुषांना तुरुंगवास, फाशी अशा शिक्षा फर्मावण्यात आल्या. हा सर्व काळ ग़ालिब दिल्लीतच होता. त्यानं मात्र आपलं घर सोडलं नाही. तसंही तो असा कुठं जाणार होता? एकतर त्याची निर्वाहाची सगळीच साधनं तोवर बंद झाली होती. त्याचं पेंशनही बंदच झालं होतं. त्याच्या पत्नीनं सावधगिरी बाळगत, आपले सर्व दागिने, मौल्यवान कपडेलत्ते आणि इतर उंची वस्तू या रणधुमाळीच्या काळात काले मियाँकडं सुरक्षित राहतील म्हणून ठेवल्या होत्या. ते संतपुरुष, त्यांच्याकडं सारं सुरक्षित राहणारच असा तिला विश्वास होता. पण शहर हातात आल्यानंतर, इंग्रजांनी झाल्या पराभवाचं उट्टं काढत, दिल्लीत हिंसाचाराबरोबरच लूटमारही केली. त्यात काले मियाँचं घरही वाचलं नाही. सारं लुटलं गेलं, त्यात ग़ालिबच्या घरचा ऐवजही गेलाच. होतं नव्हतं ते सारंच गेलं. 

अस्वस्थतेचा हा काही महिन्यांचा काळ त्यानं कसाबसा निभावून नेला. त्याच्याबद्दल इंग्रजी अधिकाऱ्यांना सहानुभूतीही होती. नंतर इंग्रजी अंमलच सुरू झाला. ब्रिटिशांविरुद्ध ज्यांनी बंड केलं, त्यांची चौकशीही सुरू झाली. यावेळी ग़ालिबनं बहादूरशाहच्या दरबाराचा ‘शिक्का’ रचल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. पण त्याला त्याबद्दल शिक्षा न होता, माफी मिळाली. पण म्हणूनच त्यानंतर इंग्रज गव्हर्नर जनरल किंवा लेफ्टनंट गव्हर्नरच्या दरबारातून त्याला निमंत्रणही येईनासं झालं. एकूण काय, तर ग़ालिब ब्रिटिशांच्या काळ्या यादीत गेला. मात्र कालांतरानं मित्रांच्या मध्यस्थीमुळं ही बंदी मागं घेतली गेली. दरबारी शिक्क्याचा मजकूर ग़ालिबनं लिहिला नव्हताच. एक नोव्हेंबर १८५८ रोजी लॉर्ड कॅनिंगनं इलाहाबादेत भव्य दरबार भरवला आणि व्हिक्टोरिया राणीनं भारत सरकारची सूत्रं हातात घेतल्याचं जाहीर केलं. हा ‘राणीचा जाहीरनामा’ प्रसिद्धच आहे. कंपनी सरकारचा अंमल संपून इंग्लंडच्या राणीचं राज्य सुरू झालं. ग़ालिबला १८६३ पासून सरकारी कार्यक्रमांची निमंत्रणं त्याला पुन्हा मिळायला लागली. आपल्याला व्हिक्टोरिया राणीच्या दरबाराकडून कवी म्हणून पदवी आणि सन्मानाची वस्त्रं मिळावीत, असा अर्ज ग़ालिबनं केला होता. तो मात्र वेगळा बहाणा करून नाकारला गेला... 

राजकीय घडामोडींचा हा काळ मोठा खडतर होता. घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं होतं. त्यात एकदा ग़ालिबला समजलं, की आपल्या धाकट्या भावाच्या घरात गोरे शिपाई घुसले आहेत. त्याला चिंता लागून राहिली. आधीच हा भाऊ युसुफ़ स्किझोफ्रेनियाचा रुग्ण होता. त्यावेळी त्याची पत्नी आणि मुलगी वगैरे मंडळी जयपूरला गेली होती. आपल्या म्हाताऱ्या नोकर-नोकराणीसह युसुफ़ एकटाच घरात होता. मात्र घरातून बाहेर पडता येत नसल्यानं ग़ालिब जाऊही शकत नव्हता. तशात काही दिवसांनी भावाचा नोकर ग़ालिबकडं आला. त्यानं सांगितलं की पाच दिवसांच्या तापानंतर आदल्या रात्री युसुफ़ हे जग सोडून गेला होता. ग़ालिबला धक्काच बसला. तो दिवस होता १९ ऑक्टोबर १८५७. आपल्या भावाला कबरस्तानात पोचवायचं तरी कसं, हा प्रश्न ग़ालिबसमोर उभा राहिला. कारण शहरातली स्थिती चार माणसांना जमवून, मृतदेह घेऊन कबरस्तानापर्यंत जाण्याइतपतही स्थिर नव्हती. कसाबसा पटियालाच्या महाराजांच्या एका सैनिकाला घेऊन ग़ालिब भावाच्या घरी गेला आणि जवळच मशिदीच्या अंगणात खड्डा खणून त्यानं भावाला मूठमाती दिली.  धाकट्या भावाआधी, आपला दत्तक पुत्र आरिफ़चा मृत्यू त्यानं १८५२ मध्येच पहिला होता. एकेक दुःखं झेलत ग़ालिब दिवस ढकलत होता. ‘आपल्यासारखी दुःखं कुणालाही मिळू नयेत, असं मला वाटतं. नाहीतर मी आपलं आयुष्य शत्रूंना मिळावं असं मागणं ईश्वराकडं मागितलं असतं,’ असा ग़ालिबचा एक शेरच आहे... 
यूँ ही दुख किसी को देना नहीं ख़ूब, वर्ना कहता 
कि मेरे अदू को या रब! मिले मेरी ज़िन्दगानी

संबंधित बातम्या