जो न दे मुझको ज़बाँ और...

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 18 मे 2020

अन्दाज़-ए-बयाँ

कवीचा शोध घेताना त्याच्या कवितेतूनच पुढं सरकावं लागतं. ग़ालिबच्या संदर्भातही हे अर्थातच लागू होतं. स्वतःबाबत तो मौन राहिलेला नाही, हे त्याच्या रचना वाचल्यावर लक्षात येतं. खरंच आहे की कोणत्याही कवीच्या रचनांमध्ये त्याचं अंतरंग प्रतिबिंबित झालेलं असतं. आपले अनुभव, धारणा, तृप्त आणि अतृप्त आकांक्षा, इच्छा, उपलब्धी आणि अपयश हे सारं तो जीवनातल्या इतर अनेक गोष्टींबरोबर आपल्या काव्यामध्ये एका नव्याच रूपात विखरून टाकत असतो. स्वतः कवी जितका स्वतःबद्दल बोलका असतो, तितकं त्याच्याबद्दल इतर कोणी सांगू शकत नाही. कारण अखेरीस दुसरी व्यक्ती ही वेगळीच कुणी असते. कवीच्या मनाच्या गाभ्याच्या मर्मापर्यंत ती कितीशी पोचू शकणार? त्याच्या हृदयाची नेमकी खोली आणि मनातली खळबळ तिला कितपत जाणवून येणार? म्हणूनच ग़ालिबचं काव्य त्याच्याबद्दल जितकं बोलतं, तितकं सांगायला त्याच्यावरची पुस्तकं, त्याची विविध चरित्रं सांगू शकत नाहीत. जे त्याच्या रचना आणि इतर लेखन व पत्रं सुचवतात, ते त्याचं खरं अंतरंग आहे असं वाटत राहतं. यामध्ये त्याचं जे रूप दिसतं, ते अधिक खरं जाणवतं... 

एकूणच ग़ालिबच्या शायरीत असलेले स्वतःबद्दलचे आणि स्वतःच्या कवित्वाबाबतचे तसंच मतांविषयीचे उल्लेख त्याच्या अंतरंगापर्यंत घेऊन जाणारे आहेत. त्याच्या शायरीतले विविध प्रवाह व धागे न्याहाळताना त्यातील वेगवेगळाले स्तर आणि कप्पे जाणवतात. तसंच, आपलं काव्य समजत नाही असा जो आरोप त्याच्यावर केला जात होता, त्याबद्दलही तो पुन्हा काव्यातूनच लिहितो. टीकाकारांना तो काव्यातूनच उत्तर देतो. ‘मला ना प्रशंसेची अपेक्षा आहे, ना पुरस्काराची पर्वा. माझे शेर निरर्थक आहेत, असं वाटलं तर वाटू दे,’ असं एका शेरमध्ये तो म्हणालाच होता... असं जरी असलं, तरी आपलं काव्य असं काय मोठं कठीण आहे की ते इतरांना समजू नये? असंही त्याला वाटतच असणार. कदाचित त्याची फ़ारसीप्रचुर शैली, सामासिक शब्दांची रचना यामुळं ते समजून घेणं असल्यानं, या काव्यावर टीका होत असावी. पण यापलीकडं, ग़ालिबचे विरोधक आणि काही प्रतिस्पर्धीही ग़ालिब समजत नाही, तो कठीण लिहितो, अशी हाकाटी करत असावेत. कारण ग़ालिब तसा लहान वयातच प्रसिद्ध झाला आणि त्याच्या काव्याची व विद्वत्तेची चर्चा होऊ लागली. मात्र नंतर त्याच्यावर टीका होऊ लागली. मात्र तरीही ग़ालिबनं आपली शैली सोडली नाही, की रचनेला मुरड घातली नाही. त्याची शब्दकळा अधिक सोपी झाली, ती काळाच्या ओघात. सर्वसामान्य लोकांची भाषा त्याच्या काव्यात मग उतरत गेली. अर्थात ग़ालिबची म्हणून जी वैशिष्ट्यं होती, ती कधीच हरपली नाहीत... ग़ालिबनं स्वतःच्या रचनांसंबंधात लिहिलेले शेरही बघण्यासारखे आहेत. आपल्या शायरीच्या अनुषंगानं त्यानं बरेचदा लिहिलं आहे. वेगवेगळ्या तऱ्हांनी दिलेलं त्याबद्दलचं स्पष्टीकरण आणि संकेत त्याच्या काव्यात सापडतात. इतकं असूनही, त्याच्या काव्यातील ‘दुर्बोधता’ हा आजच्या काळातही चर्चेचा विषय ठरत असतो. 

ग़ालिबविषयी खूप उलटसुलट लिहिलं गेलं. त्याची उपेक्षा झाली, टिंगल झाली. त्याच्यावर दुर्बोधतेचा आरोप करण्यात आला आणि त्याचा प्रसार व प्रचार त्याच्यानंतरही सुरूच राहिला. पण काळाच्या ओघात ग़ालिबचे चाहते वाढलेही. त्याची कथित ‘दुर्बोध’ शायरी, तिच्या बारकाव्यांसकट जाणणारे तयार झाले. त्याच्या काव्यातल्या अनेक ओळी किंवा वचनं लोकांच्या ओठांवर खेळू लागली. इतका कठीण समजला जाणारा कवी अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन पोचला. त्यांच्या दैनंदिन भाषेत त्याच्या शायरीची झलक बेमालूमपणे मिसळली. किती म्हणून ग़ालिबची वचनं सांगावीत, जी तुमच्या आमच्या मनात कोरली गेली आहेत आणि आपल्या संभाषणात त्यांचा वापर आपसूक केला जातो. त्यानं केव्हातरी बहादूरशहा ज़फ़रसाठी लिहिलेल्या प्रशंसापर काव्यात म्हटलं होतं, ‘तुम जियो हज़ारो साल और हर साल के दिन हो पचास हज़ार’...ही ओळ त्यानंच प्रथम लिहिली होती आणि ती सामान्य लोकांच्या ओठांवर जाऊन पोचली. ‘जी ढूँडता है फिर वही फ़ुरसत के रात दिन’, ‘हज़ारो ख़्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले’, ‘हाय कमबख़्त, तूने पी ही नहीं’, ‘कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं’, ‘दर्द का हद से गुज़र जाना है दवा हो जाना’, ‘अिश्क पर ज़ोर नहीं है ये वो आतिश ‘ग़ालिब’/जो लगाए न लगे और बुझाए न बने’, अशा त्याच्या कैक ओळी लोकांच्या जिभेवर असतात. त्याच्या काही ओळी तर वचनांप्रमाणं दैनंदिन भाषेत वापरल्या जातात. कठीण समजली जाणारी ग़ालिबची कविता नंतरच्या काळात अशी लोकांच्या बोलीत जाऊन पोचली...

आपलं काव्य न समजणारे जे आहेत, त्यांच्याबद्दलचा पुढला ग़ालिबचा शेर बरंच काही सांगून जाणारा आहे. ‘मी हा असा आहे, मी असंच लिहीत राहणार,’ असा काहीसा आविर्भाव असणारा हा शेर त्याच्या खास शैलीतला आहे. तो यात म्हणतो, ‘हे ईश्वरा, यांना माझं म्हणणं समजत नाही आणि कधी समजणारही नाही. मला तू वेगळी वाणी देणार नसशील, तर मग यांना जरा वेगळं मन दे बघू.’
या रब, वो न समझे हैं न समझेंगे मेरी बात
दे और दिल उनको जो न दे मुझको ज़बाँ और

आपली कविता समजून घेण्यास जर लोक तयार नसतील, तर मग त्यावर काही इलाज नाही. असलाच तर मग त्यांना दुसरं मन, दुसरी समजशक्ती मिळणं हाच तर एकमेव उपाय आहे. कारण हे काव्य समजून घेण्याची इच्छाच त्यांना नाही. त्यांचं हृदयपरिवर्तन होईल, तेव्हाच ते माझं काव्य समजून घेतील. अन् हे ईश्वरालाच शक्य आहे. तसंच ‘माझी वाणी, माझी काव्यशैली बदलणं हे काही ईश्वरालाही शक्य नाही,’ असाही अर्थ इथं ग़ालिबला अभिप्रेत आहे... ग़ालिबला बदनाम ठरवण्यामागे त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचा हात होता आणि मद्यपानासारख्या व्यक्तिगत गोष्टींच्या संदर्भात त्याच्यावर टीका होऊनही, त्याच्या शायर म्हणून असलेल्या लोकप्रियतेला धक्का पोचत नव्हता. हे बघितल्यावर मग काव्याच्या आघाडीवरही त्याला लक्ष्य करण्यात आलं. त्याची टिंगल केली गेली, खिल्ली उडवली गेली. या संदर्भात एक शेर उद्धृत केला जातो. त्याचा कर्ता नेमका कोण ते ज्ञात नाही आणि ग़ालिबचंही नाव त्यात नाही. मात्र त्याच्यावर निशाणा साधूनच तो रचला गेला, हे स्पष्टपणे जाणवतं. शेर असा आहे की, ‘मीर’ आणि मिर्ज़ा सौदा यांची रचना आम्हाला समजते. पण ‘यांचं’ बोलणं एकतर त्यांना स्वतःला समजतं किंवा मग त्या ईश्वराला’...
कलाम-ए-मीर हम समझे,  कलाम-ए-मीरज़ा समझे
मगर इनका कहा ये आप समझे, या ख़ुदा समझे

आपल्यावर होणाऱ्या अशा या सततच्या टीकेमुळं त्रासून जाऊन, ग़ालिब बरेचदा काव्यातून आपलं उत्तर पेश करत असे. त्याच्या काळात दिल्लीतल्या गल्ली गल्लीत त्याच्या शायरीवर शेरेबाजी करण्याचे प्रकार केले जात. सुरुवातीच्या काळात तरुण वयात तो ‘असद’ या नावाने लिहीत असे, तेव्हापासूनच हे घडत होतं. या प्रकारांकडं निर्देश करून ग़ालिबनं लिहिलं होतं, ‘आमचे शेर आता विनोद आणि उपहासाचा विषय झाले आहेत. यावरून हे स्पष्ट दिसतं, की कलेच्या आविष्कारातून काहीच लाभ मिळत नाही.’
हमारे शेर हैं अब सिर्फ़ दिल-लगी के ‘असद’
खुला कि फ़ायदा अर्ज़-ए-हुनर में ख़ाक नहीं

तर दुसऱ्या एका शेरमध्ये ग़ालिब म्हणतो, ‘कलेतील उत्कृष्टतेला मत्सराची शिक्षा मिळते. कौशल्यासारख्या अनमोल गोष्टीचं मूल्य छळणुकीच्या रूपात केलं जातं, यावर काय बोलावं?’ आपल्या काव्यक्षेत्रातील निपुणतेबाबत प्रतिस्पर्ध्यांना वाटणाऱ्या मत्सराचा उल्लेख यात ग़ालिब करतो. तसंच या प्रवृत्तीमुळं आपल्या शायरीवर व तिच्यातील गुणांवर अन्याय होतो, असंही तो इथं सुचवतो. 
हसद सज़ा-ए-कमाल-ए-सुख़न है क्या कीजिए
सितम बहा-ए-मता-ए-हुनर है क्या कहिए

स्वतःच्या अनुभवांतून आणि हृदयातल्या दाहकतेतून केलेल्या आणि गंभीर चिंतनाची डूब असलेल्या रचनांबद्दल वाटेल ते बोलून, त्यांना निरर्थक ठरवून पूर्ण निकालात काढण्याचे प्रयत्न होताना पाहून, ग़ालिब उद्विग्न होत असे, ही एक स्वाभाविक अशीच गोष्ट आहे. कारण तो आयुष्यातल्या अनेक गोष्टींना काव्यातून स्पर्श करत होता. यात अध्यात्मापासून तत्त्वज्ञान, गूढवाद व धार्मिक धारणा तसंच मानवी जीवनाचं ऐहिक व सामाजिक स्वरूपापर्यंत अनेक बाबींचा समावेश होता. त्याची विनोदबुद्धी, चातुर्य आणि त्याच्या विचारांची डूब, यांच्या जवळपासही येऊ न शकणारे मात्र त्याच्या काव्यात दम नाही, ते निरर्थक आहे, अशी हाकाटी करत होते. त्याचे चाहते, त्याच्या शायरीचं मर्म समजणारेही तेव्हा होते. पण ठरवून ग़ालिबला नावं ठेवत राहणारे तितकेच जोरात होते. या साऱ्याचा ग़ालिबवर परिणाम घडलाच असणार. नव्हे, तो घडलाच...

आपल्या स्वतःच्या काव्याचे गुण व मर्मस्थानं ग़ालिब नक्कीच ओळखून होता. या शायरीची वैशिष्ट्यं तो जाणून होता. हे काव्य सरळ-सोपं नाही, तसंच ते सहज लिहिलेलं आणि नुसतंच हलकाफुलका आनंद देणारं नाही, याची अर्थातच त्याला कल्पना होती. आपल्या शैलीतली व शब्दांमधली ताकद व चटका याबद्दलही त्यानं लिहिलं आहे. स्वतःच्या दाहक कवितेबाबत एका शेरमध्ये तो म्हणतो, ‘माझ्या काव्यात एक आग आहे, दाहकता आहे, पण ती इतकीही नाही की ज्याला म्हणून मी कविता ऐकवली, त्या प्रत्येकानं या दाहकतेबद्दल तक्रार केली...’
गर्मी सही कलाम में, लेकिन न इस क़दर
की जिस से बात, उसने शिकायत ज़रूर की

स्वतःच्या काव्याबद्दल अभिमानी असणारा आणि ‘कहते हैं कि ‘ग़ालिब’ का है अंदाज़-ए-बयाँ और’ असं लिहून जाणारा ग़ालिब स्वतःच्या मर्यादाही ओळखून होता. खरंच आहे, की सर्वकाळ काही कोणी सर्वोत्कृष्ट काव्य लिहू शकत नाही. इतर अनेक गोष्टींचा परिणाम साहित्यनिर्मितीवर घडतच असतो. शिवाय नंतरच्या काळात ग़ालिबनं आपल्या रचनेची जातकुळी काहीशी बदलण्याचा प्रयोग केला, त्यामुळंही त्याची कविता बदलली असेल. ‘आपल्या कवितेत पूर्वीसारखी आग राहिलेली नाही,’ हा उल्लेख ग़ालिबनं आणखी एका शेरमध्ये केला आहे. पण वेगळ्या संदर्भात. तो म्हणतो, ‘ग़ालिबच्या लेखणीतून आग बरसते, याबद्दल मलाही विश्वास आहे. मात्र आता या म्हणण्यात काही काही तथ्य उरलेलं नाही.’
सुख़न में ख़ामा-ए-‘ग़ालिब’ की आतिश अफ़शानी
यकीं है हमको भी, लेकिन अब उसमें दम क्या है

आपल्या लेखणीची ताकद कमी होत चालली आहे, जाणीव त्याला होत असावी, हे यावरून दिसतं. याप्रकारं स्वतःच्या कवित्वाच्या ओसरत्या बहराबद्दल मोकळेपणानं लिहिणं, तेही ग़ालिबसारख्या कविश्रेष्ठानं, हे खूप बोलकं आहे.  

संबंधित बातम्या