यूँ होता तो क्या होता...

नंदिनी आत्मसिद्ध
शुक्रवार, 29 मे 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

शायरीच्या माध्यमातून प्रकट होणारा ग़ालिब वेगवेगळ्या वाटांनी खुणावत राहतो. त्याचा अन्दाज़-ए-बयाँ खरोखरच काही औरच आहे. ग़ालिबचं वाक्चातुर्य त्याच्या टीकाकारांना आणि दोस्तांनाही बेज़बान करून टाकत असे, याचे किस्से अनेक आहेत. काहींबाबत इथं चर्चाही झाली आहे. त्याच्या काव्यातही असे अनेक टप्पे येतात, अशा जागा भेटतात, जेव्हा वाचक बरेचदा गुंगमती होऊन जातो. तर कधी त्यातील अर्थांचे विविध कंगोरे धुंडाळत बसतो. कैकदा त्याच्या शेरमधून समोर येणारी एखादी कल्पना किंवा विचार हा आपल्याला खिळवून टाकणारा असतो. तर कधी त्याची एखादी ओळ किंवा शेर वाचून वाटतं, ‘अरे, हेच तर आपल्यालाही वाटतं...’ आपल्या स्वतःच्या कवित्वाचा हा गुणविशेष खुद्द ग़ालिबनं अनेकदा शायरीतून पेश केला. त्यातून कवितेबाबत त्याच्या काय धारणा होत्या, ते तर समजतंच. तसंच ग़ालिब जाणून घ्यायलाही मदत होते. कवितेच्या संदर्भात ग़ालिबचा एक शेर आहे, ज्यात तो म्हणतो, ‘बातचीत करण्यातला आनंद यात आहे, की जे काही ते बोलले, ते ऐकून मला असं वाटलं की माझ्या मनातही हीच तर गोष्ट होती.’ 
देखना तक़रीर की लज़्ज़्त, कि जो उसने कहा
मैंने यह जाना, कि गोया ये भी मेरे दिल में है

दुसऱ्याच्या हृदयात कसा प्रवेश मिळवायचा, याची कला हस्तगत असलेल्या ग़ालिबला स्वतःच्या या कसबाची पुरेपूर कल्पना होती. म्हणूनच तर, आपण कवितेतून जे व्यक्त केलं, ते दुसऱ्याला आपलंच वाटावं याप्रकारे उतरलं पाहिजे, असा विचार तो लिहून गेला. त्याला ‘कठीण कवी’ असं बिरूद लागलं असलं, तरी कवितेच्या संवादाची त्याची व्याख्या अशी साधी-सोपी होती. आपलं म्हणणं लोकांना समजावं, ही त्याची उत्कट इच्छा होती. कारण लेखक वा कवी तेव्हाच सफल मानला जाऊ शकतो, जेव्हा त्याच्या वाचकांमध्ये त्याच्या संवेदनांशी आपलं नातं जुळल्याची भावना निर्माण होईल, हे तो जाणून होता. त्याच्या स्वतःच्या कवितेतून जे व्यक्त होत होतं, ते त्याच्या हृदयाच्या अगदी आतल्या कप्प्यातून आल्याप्रमाणं खुलं होतं. म्हणूनच वाचकांना वाटत असे, की आपल्या मनात लपलेली ही भावना ग़ालिबच्या शायरीनं समोर आणली आहे. त्यात त्यांना स्वतःच्या मनाची स्पंदनं जाणवली. आजही जाणवतात...

लिखाण असं हवं, की त्याचा प्रभाव वाचणाऱ्यावर आणि ऐकणाऱ्यावर पडायला हवा. स्वतःच्या लेखणीच्या वर्णन करण्याच्या ताकदीचा उल्लेख त्यानं अनेकदा केला आहे. कधी तो जरा वेगळ्या वाटेनं जाऊन, तर कधी अगदी थेटपणे. ग़ालिबचा एक शेर असा आहे, की ज्यात तो म्हणतो, ‘माझी कहाणी ऐकायला तो पहिल्यांदा तयारच नाही होणार. दुसरं असं की (तयार झालाच, तर) ती माझ्या तोंडून ऐकायला तयार नाहीच होणार.’ 
कब वो सुनता है कहानी मेरी
और फिर वो भी ज़बानी मेरी

या शेरमध्ये तो सुचवतो की माझी कहाणी, माझं हृदगत हे हृदयाला त्रास देणारं आहे, बेचैन करणारं आहे. त्यातही ते माझ्या मुखातून ऐकणं हे तर फारच मनाला पीडा देणारं आहे. ज्याच्यापाशी ते सहन करण्याची क्षमता नाही, तो कसं काय या वाटेला वळेल? माझं म्हणणं ऐकून घेण्याची ताकद असेल, असाच मनुष्य माझ्या कवितेकडं येईल. कवीच्या शब्दांचा आशय आणि आविष्कार दोन्हींत ताकद असली पाहिजे, हेच तो इथं म्हणतो. या दोन्ही कलांमध्ये ग़ालिब अतिशय कसबी होता, हे सांगायलाच नको. 
स्वतःच्या आविष्काराची ताकद किती प्रभावी आहे, हे माहीत असलेला, त्याबद्दल खात्री असलेला ग़ालिब म्हणूनच असंही लिहून गेला, ‘त्या सुंदरीची चर्चा आणि माझं तिच्याबद्दलचं वर्णन. मग काय, ज्या म्हणून मित्राला या माझ्या रहस्यात सामील करून घेतलं तो तर माझा प्रतिस्पर्धीच झाला.’ हा शेर असा आहे-
ज़िक्र उस परीवश का और फिर बयान अपना
बन गया रक़ीब आख़िर था जो राज़दार अपना

याआधी उल्लेख केलेल्या शेरप्रमाणंच यातही स्वतःच्या बयानचा प्रभाव किती तीव्र आहे, याचा उल्लेख ग़ालिबनं केला आहे. प्रियेबद्दलचं माझं गुपित ज्याला संगितलं, तोच माझ्या त्या वर्णनानं प्रभावित झाला आणि माझा प्रतिस्पर्धी झाला, अशी ही कैफ़ियत आहे. जरा निराळ्या वाटेनं जाऊन, आविष्काराइतकाच माझा काव्यविषयही तितकाच परिणामकार आणि दमदार असतो हे सुचवलं गेलं आहे. 

याच ग़ज़लमध्ये एक शेर असाच चकित करणारा आहे. कल्पनेच्या स्तरावर एक वेगळीच झेप घेतली आहे ग़ालिबनं यात. माणूस बरेचदा असं झालं असतं, तर मीही तसं केलं असतं, असं म्हणत असतो. तसाच काहीसा भाव व्यक्त करणारा हा शेर आहे. ग़ालिब लिहितो, ‘मीही एखादं दृश्य उंचावर उभं केलं असतं. माझं घर तेवढं आकाशाच्या पलीकडं असायला हवं होतं...’
मंज़र एक बलन्दी पर और हम बना सकते
अर्श से उधर होता काश कि मकाँ अपना

म्हटलं तर साधी सरळ अशी ही कल्पना आहे, पण स्तिमित करून जाणारी. त्याला नेमकं काय म्हणायचं असेल, असा प्रश्न मनात निर्माण होतो. अर्थाच्या वेगवेगळ्या शक्यता या शेरमध्ये दडलेल्या आहेत. तो कदाचित आपल्याला सांसारिक गोष्टींसाठी खपावं लागल्यामुळं आपल्या हातून अधिक चांगलं काम झालं नाही असं म्हणत असावा का? एका विशिष्ट उच्च स्तरावरचं जगणं लाभलं असतं, तर मी आणखी उत्कृष्ट काही निर्माण करू शकलो असतो, असा एक स्पष्ट दिसणारा अर्थ यात प्रतीत होऊ शकतो किंवा मग एकूणच मानवजातीचं मर्यादित जीवन, विशिष्ट चौकटीत असलेली प्रत्येकाची झेप, हे समोर ठेवून हा शेर लिहिला असू शकतो. जितका अनुभव जास्त विस्तृत, तितका आविष्काराचा आवाका अधिक मोठी, हाही अर्थ यात असू शकेल. धर्म असो, तत्त्वज्ञान अथवा शाश्‍वताची गुपितं... त्या त्या उंचीला पोचल्याखेरीज त्यांचं आकलन होऊ शकत नाही. प्रत्येकाला काही सारं समजत असल्याचं दिसत नाही. म्हणूनच मग या भौतिक जीवनाच्या पलीकडचं जाणायला मी असमर्थ आहे. मात्र आकाशाच्या पलीकडंच जर माझं घर असतं, तर मी या गोष्टी समजू शकलो असतो आणि त्यांचं नेमकं चित्र उभं करू शकलो असतो, असं ग़ालिब म्हणाला असावा...

स्वतःच्या काव्यशक्तीचा अभिमान असल्यानं, ग़ालिब आपल्या बयानची आणि त्यामागील वेदनेची परिणमाकारकता वारंवार उलगडून सांगतो. इतरांनाही माझं दुःख शायरीसाठी प्रवृत्त करतं, असं सांगताना एका शेरमध्ये तो म्हणतो की, माझ्या दुःखाचा आणि आकांताचा प्रभावच इतका आहे, की मी जेव्हा उद्यानात गेलो, तेव्हा जणू तिथं पक्ष्यांची शाळाच भरली आणि माझे उसासे ऐकून तिथले बुलबुलही ग़ज़ल गाऊ लागले...
मैं चमन में क्या गया गोया दबिस्ताँ खुल गया
बुलबुलें सुनकर मिरे नाले ग़ज़लख़्वाँ हो गईं 

उर्दू काव्यात नेहमी येणाऱ्या काही कल्पना बहुतेक सर्व शायर वापरत आले आहेत. मद्य आणि संबंधित गोष्टी व व्यक्ती, ज्याचा वापर ग़ालिबनं स्वतः अनेकवार केला. तत्त्वज्ञान सांगण्यासाठी केला. सौंदर्य आणि अंतिम सत्याचं रूपकही उर्दू काव्यात नेहमी येतं. तसंच आपण आणि आपला प्रतिस्पर्धी अशा वाटेनं जात काव्यात खुमारी आणण्याचा रिवाजही दिसून येतो. तसंच आपली गुपितं ज्याला सांगितली त्यानं किंवा ज्याच्या हाती आपण पत्रं पाठवली त्या दूतानं प्रतिस्पर्धी होणं अशा कल्पना या शायरीत वापरलेल्या दिसतात. ग़ालिबच्या शायरीतही हे उल्लेख वारंवार आढळतात. स्वतःची काव्यशक्ती, आविष्काराचा आवाका आणि त्यामुळं प्रभावित होऊन प्रेमात आपला प्रतिस्पर्धी झालेला कुणी, त्याच्या शायरीत वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो. प्रेम काही ठरवून करता येत नाही, तर ते होतं, असं म्हणतात. स्वतः ग़ालिबनंच म्हटलं आहे, ‘प्रेम ही एक ठिणगी आहे, त्यावर कुणाचा प्रभाव चालत नाही. मुद्दाम ही आग पेटवता येत नाही आणि ही ठिणगी एकदा का जाळू लागली, की मग विझवू म्हटलं, तरी तिला विझवता येणंही अशक्य असतं’...
अिश्क़ पर ज़ोर नहीं, है ये वो आतिश ‘ग़ालिब’
कि लगाये न लगे और बुझाये न बने

प्रेमाबाबतची माणसाची अगतिकता ओळखून असल्यामुळंच, जिच्यावर आपण प्रेम करतो, तिच्यावरच दुसराही कुणी प्रेम करील हे ग़ालिब स्वाभाविक मानतो, कारण शेवटी प्रेम करणं हे माणूसपणाचं लक्षण आहे. तसंच, प्रेमात प्रतिस्पर्धी असणारच  हेही त्याला मान्य आहे. पण जेव्हा आपला पत्रवाहक दूतच आपला प्रतिस्पर्धी होतो, तेव्हा त्यावर काय बोलावं, असं एका शेरमध्ये तो म्हणतो. आपली पत्रं जर दूतच वाचत असला, तर मग त्याच्यावर प्रभाव पडून तोही त्या सुंदरीच्या प्रेमात पडणारच, असा एकूण आशय. 
दिया ये दिल अगर उसको, बशर है कया कहिए
हुआ रक़ीब तो हो, नामाबर है क्या कहिए

अशाप्रकारे प्रतिस्पर्धी, पत्रवाहक यांच्या माध्यमातून आपल्या काव्यशक्तीचा प्रभाव मांडणारा ग़ालिब भेटत राहतो. आगळ्यावेगळ्या आणि चमत्कृतिपूर्ण कल्पना सादर करणं हा तर त्याचा हातखंडाच. नेहमीचीच एखादी गोष्ट जरा निराळ्या पद्धतीनं मांडून आपलं वेगळेपण, खासियत तो दाखवून देतो. वाचकाला थक्क करून टाकतो. हा त्याचा गुण त्यला इतरांपेक्षा वेगळा शायर ठरवतो. एका शेरमध्ये तो म्हणतो की, पत्र आलं, ते पत्रवाहक दूतानं हातीही दिलं, पण तरी तो अजून माझ्या चेहऱ्याकडं बघतो आहे. म्हणजे नक्कीच एखादा तोंडी संदेश अजून बाकी आहे. एक अपेक्षा, आशा ठेवून लिहिलेला हा शेर त्या पत्रवाहकाचा तोंडी संदेश काय बरं असेल, याची उत्सुकता मनात जागवतो...
दे के ख़त मुँह देखता है नामःबर
कुछ तो पैग़ाम-ए-ज़बानी और है

ग़ालिबच्या काव्यात अशा थक्क करणाऱ्या जागा अनेक आहेत. त्या दरवेळी नवा अर्थ तुमच्या ओंजळीत टाकतात. हेच तर ग़ालिबचं वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या या क्षमतेवर ठाम विश्‍वास असल्यामुळंच, आपलं काव्य सर्वकाळ लोकांना खुणावत राहील, याबाबत त्याच्या मनात तिळमात्रही शंका कधी नव्हती. भवभूतीला वाटत होतं, की कधी ना कधी तरी आपलं काव्य समजून घेणारा समानधर्मा निपजेलच. तसंच काहीसं ग़ालिबचंही होतं. म्हणूनच आपल्या मरणानंतर कैक वर्षं लोटली, तरी आपलं काव्य वाचलं जाणार आहे आणि त्याबद्दल चर्चा होत राहणार आहे, हे तो जाणत होता. आपला शंकेखोर स्वभाव, विविध गोष्टींबाबत प्रश्‍न उपस्थित करण्याची हातोटी आणि जर असं झालं असतं, तर मग काय झाल असतं, याप्रकारे विचार करत काही ना काही मांडण्याची आपल्याला असलेली सवय, हे सारं येणाऱ्या काळातल्या वाचकांना नक्कीच वेधक वाटणार आहे, याची त्याला खात्रीच होती. त्याचा हा शेर याची साक्षच आहे आणि हा शेर किती सार्थ आहे, ते वेगळं सांगायला नकोच...
हुई मुद्दत कि ‘ग़ालिब’ मर गया पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूँ होता तो क्या होता

संबंधित बातम्या