क़तरे से गुहर होने तक

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 1 जून 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

कवी किंवा लेखक हा त्याच्या शैलीमुळं, शब्दकलेमुळं आणि लिहिण्याच्या एकूणच विशिष्ट अशा ढंगामुळं ओळखला जातो. तसा तो ओळखला जाणं, हे त्याच्या यशाचंही गमक असतं. ग़ालिबनं स्वतःच आपली लेखणी ही इतरांपेक्षा कशी वेगळी आहे, याचा वारंवार उल्लेख केला आहे. अर्थात केवळ त्याला आत्मगौरव करायचा नव्हता, तर कोणत्याही लेखकानं आपलं अस्तित्व ठळक करण्यासाठी एक खासियत रुजवणं आवश्यक कसं आहे, हे सांगायचं होतं. लेखनकलेचं एक इंगितच तो या निमित्तानं सांगू पाहत होता. एका शेरमध्ये तो लिहितो, ‘हा ‘ग़ालिब’ आपलं म्हणणं विशिष्ट ढंगात प्रस्तुत करत आहे. गुणांची कदर असलेल्यांना ते ऐकण्यासाठी खुलं निमंत्रण आहे.’
अदा-ए-ख़ास से ‘ग़ालिब’ हुआ है नुक़्तासरा
सला-ए-आ है यारान-ए-नुक़्ता-दा के लिए

चिंतनाच्या घुसळणीतून आणि शब्दांच्या अपार, अथांग अशा सागरातून निवडून निवडून मोजकी रत्नं धुंडाळण्याचं स्वप्न मनाशी जोपासत ग़ालिब आपल्या काव्यसफरीवर निघाला होता. खाणी खणून काढून, अशा रत्नांचा शोध घेण्याची ताकद आणि धाडस माझ्यात नक्कीच आहे, असंही तो एका शेरमध्ये म्हणतो –
सुख़न क्या कह नहीं सकते कि जूया हों जवाहर के
जिगर क्या हम नहीं रखते कि खोदें जा के माअदन को

इथं हेच तो सुचवू पाहतो की सफल आणि उत्तम कवी होणं हे सरळ सोपं नाही. सहजसाध्य तर बिलकुलच नाही. त्यासाठी रत्नाकरिता जसं खाणी खणल्या जातात, तसे परिश्रम घ्यावे लागतात. शब्दांची आराधना, विचारांची डूब आणि चिंतनाची खोली हे सर्व साध्य केल्याशिवाय उत्कृष्ट अशा काव्याचं रत्न हाती गवसत नाही. स्वतःच्या सिद्धहस्त लेखणीबद्दल अभिमान बाळगतानाही, त्यानं एका एका शेरसाठी घेतलेले कष्ट कुणी विसरू नये, अशी त्याची अपेक्षा आहे. मात्र हे कष्ट घेताना आणि बरोबरच प्रापंचिक व सांसारिक अडचणींचा सामना करतानाही आपलं चिंतन हे स्वतःच्या विशिष्ट गतीनं व दिशेनं नेहमीच जात राहिलं, हेही तो आवर्जून सांगतो. हा मुद्दा स्पष्ट करून सांगणारा त्याचा दुसरा एक शेर आहे, ‘धरणीच्या मांडीवर बसून घालवलेल्या दिवसांची कहाणी काय म्हणून मी सांगू? इतकंच सांगतो, की त्या (खडतर) काळातही माझं चिंतन हे मखमली बिछान्यावर विश्राम करत होतं.’ भले व्यक्तिगत पातळीवर कवी अडचणीत असो, त्याची दशा धुळीत पडल्याप्रमाणं असो, आपल्या निर्मितीला या गोष्टींची झळ त्यानं लागू देता कामा नये... जोवर कवी किंवा लेखकाचं चिंतन, त्याची विचारक्षमता गतिमान आहे, स्वतःच्या पद्धतीनं सुरू आहे, तोवर कवीच्या लेखणीवर कुठलाही दुष्परिणाम होणारही नाही, असा विश्‍वास ग़ालिब यात व्यक्त करतो. आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील समृद्धी, प्रतिष्ठा नसली, तरी विचारांची झेप आणि चिंतनाची खोली कवीला मोठं करतात...
नाज़िश-ए-अय्याम-ए-ख़ाकस्तर नशीनी क्या कहूँ
पहलू-ए-अन्देशा, वक़्फ़-ए-बिस्तर-ए-संजाब था

उत्तम कवित्वाचे जे गुण ग़ालिब वर्णन करोत, ते आपल्यात आहेत, असा अर्थताच त्याचा दावा होता. तो किती खरा होता, हे आजही असलेल्या त्याच्या काव्याच्या लोकप्रियतेवरून आणि आकर्षणावरून लक्षात येतंच.
स्वतःच्या रचनांची प्रशंसा करताना ग़ालिब संकोचत नाही. कारण आपण अतिशयोक्ती करत नाही, तर सत्य तेच सांगतो, हा विश्वास त्याला आहे. आपल्या कवितेतील कोमलता, संकेत यांचा थेट परिणाम वाचकावर होऊ शकतो, त्यामुळं हे काव्य त्याचं मन मोहून घेतं. मात्र भावुक व्यक्तीच्या दृष्टीनं ते प्राणसंकट ठरू शकतं, असंही त्यानं एके ठिकाणी म्हटलं आहे. हा शेर असा आहे –
बला-ए-जाँ है ‘ग़ालिब’, उसकी हर बात
इबारत क्या, इशारत क्या, अदा क्या

(ग़ालिबची प्रत्येक रचना ही हृदयासाठी धोका ठरू शकतो. काय त्यातील शैली, संकेत आणि इशारे...)
ग़ालिबचं काव्य हे उर्दूतील उत्कृष्ट काव्य मानलं जातं. फ़ारसीकडून तो उर्दूकडं वळला नसता, तर उर्दूचं मोठंच नुकसान झालं असतं. त्याचा काळ खरं तर उर्दू कवितेला लोकप्रियता, मान्यता मिळणारा काळ होताच, पण फ़ारसी काव्याचा दबदबाही समाजात तेव्हा होता. आपल्या काव्यामुळं फ़ारसी भाषेसाठी उर्दू मत्सराचा, ईर्ष्येचा विषय झाली आहे, असं ग़ालिब एका शेरमध्ये म्हणतो. उर्दूत आपलं काव्य स्थान मिळवून आहेच, पण फ़ारसीलाही यामुळं मत्सर वाटतो, हेवा वाटतो, असं सांगताना तो म्हणतो, ‘कोणी जर विचारलं, की उर्दू भाषेत असं काय विशेष आहे ज्यामुळं फ़ारसीच्या हेव्याचं कारण ती व्हावी? तर मग ग़ालिबची रचना त्या व्यक्तीला ऐकवा आणि म्हणा, ‘यामुळं’...
जो ये कहे कि रेख़्ता क्योंकि हो रश्क-ए-फ़ारसी
गुफ़्त-ए-‘ग़ालिब’ एक बार पढ़के उसे सुना कि ‘यूँ’

विशिष्ट अशा शैलीत रचना करणारा ग़ालिब त्याच्या खास व सूचक अशा शब्दाच्या वळणामुळं लक्षात राहतो. साध्या आणि अर्थवाही रचनाही त्याच्या लेखणीनं घडवल्या. नेहमीचाच अर्थ किंवा विचार थेट शब्दात सांगणाऱ्या त्याच्या अनेक रचना याची साक्ष आहेत. एक शेरमध्ये मनुष्याची विशेषता काय, याची चर्चा तो करतो. माणूस विचार करू शकतो, हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे, एरवी तोही पशूच, हे तो सूचकपणं मांडतो. ईश्‍वर सगळीकडं असतो, जिथं कुणी नाही, तिथंही तो असतोच, अशा पद्धतीचं एक जुनं वचन आहे. ग़ालिब याच विचाराला जणू एक नवं वळण देऊन सांगतो, की मनुष्य जरी एकटा असला, तरी तो कधीच एकटा नसतो, कारण त्याच्याबरोबर त्याचे विचार, अनुभव, आकांक्षा हे सारं असतंच असतं. अशावेळी तो या विचारांच्या बैठकीत मग्न असतो... मनुष्यत्वाची परिभाषाच या शेरमध्ये ग़ालिबनं केली आहे. तो म्हणतो, ‘माणूस हा स्वतःच विचारांचा एक हंगामा, महापूर आहे. जरी एकांत असला, तरी मी त्याला मैफलच समजतो.’
है आदमी बजा-ए-ख़ुद इक महशर-ए-ख़याल
हम अंजुमन समझते हैं ख़ल्वत क्यूँ न हो

विचार करण्याची शक्ती हे मानवाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. म्हणूनच एकटा असला, तरी माणूस एकटा कधीच नसतो. त्याच्या बरोबर त्याचे विचार त्याला घेरून असतात, ज्यांच्या मदतीनं तो एखाद्या भरलेल्या सभेत असल्याप्रमाणं अनुभव घेऊ शकतो. स्वतःच्या नजरेसमोर मनातल्या कल्पनांच्या साह्यानं वेगवेगळी दृश्यं उभारू शकतो आणि स्वतःचं असं एक जगच निर्माण करू शकतो. कवीच्या दृष्टीनं त्याची काव्यनिर्मिती हेच त्याचं जग असतं. ग़ालिबनं मांडलेला हा विचार खरोखरच आगळावेगळा असा आहे.
तर मनुष्याच्या मनुष्यत्वाचं मर्म आणि मनुष्याच्या स्वभाव कथन करणारा ग़ालिबचा एक शेर आहे, ज्यात माणसालाही माणूस होणं हे अनेकदा जमत नाही, हे तो नोंदवतो. माणूस म्हणून जगणं हे महत्त्वाचं खरं, पण हे माणूसपण आत्मसात करणं साऱ्यांनाच जमत नाही. ग़ालिब म्हणतो ते किती खरं आहे, हे वेगळं सांगायला नकोच.
बस कि दुश्वार है हर काम का आसाँ होना
आदमी को भी मयस्सर नहीं इन्साँ होना

(प्रत्येक काम काही सहजतेनं पार पडत नाही. माणसाला मनुष्य होणं हे अनेकदा जमत नाही.) तो मनुष्य आणि मनुष्यत्व यात फरक करतो आणि हे करताना, आदमी आणि इन्सान हे वेगळे शब्द योजतो.
त्याच्या थक्क करणाऱ्या आणि जगावेगळा, विक्षिप्त विचार मांडणाऱ्या शेरांची संख्याही कमी नाही. त्यापैकी एकाचा उल्लेख आवर्जून करावा असा. ग़ालिबच्या घनचक्कर स्वभावाचा अन् शैलीचा अनुभव देणार हा शेर आहे. तो असा –
ता फिर न इन्तज़ार में नींद आए अुम्रभर
आने का अहद कर गए आए जो ख़्वाब में

अर्थ असा, ‘मला आयुष्यभर झोप लागू नये, यासाठी तिनं येण्याचं वचन मला दिलं, (तेही) स्वप्नात येऊन.’ चक्रावून टाकणारा ह शेर आहे. प्रेयसीला माहीत आहे, की मला तिनं भेटण्याचं वचन दिलं, की माझी झोप उडणार. म्हणून मग तिनं काय केलं, तर माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं की नक्की भेटेन. पण यामुळं मी खडबडून जागा झालो आणि नंतर माझी झोपच उडाली. मी तिची वाट बघू लागलो. पण मग आठवलं, की ती स्वप्नात येऊन भेटणार आहे. एकूण काय, तर मला आयुष्यभर झोप लागू नये, म्हणून तिनं अशी युक्ती केली. आता मी स्वप्नात तिला कसं भेटू शकणार? कारण माझी झोपच उडाली आहे... अशा प्रकारच्या गोंधळात टाकणाऱ्या विचित्र आणि ‘क्रेझी’ ओळी ग़ालिब अनेकदा लिहिताना दिसतो...

कवितेच्या क्षेत्रात त्यानं निरनिराळे प्रयोग केले आणि कोणत्याही चौकटीत स्वतःला अडकवून घेतलं नाही. थोडक्यात सांगायचं, तर ग़ालिबची कविता ही जशी गूढ, गहिरी आहे तशीच ती अर्थपूर्ण आहे. एक वेगळं महत्त्व घेऊन ती येते. तिला समकाळाचे संदर्भ आहेत, तसेच मागच्या काळातले दुवेही ती अनेकदा उलगडते. भाषा, लोककथा, धर्मविचार, तत्त्वज्ञान अशा अनेक गोष्टींमध्ये ग़ालिब वावरला आणि या प्रवासातील चिंतनातून त्यानं स्वतःची कविता घडवली. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी म्हणून लिहिल्या जाणाऱ्या कवितेप्रमाणं ही कविता हलकीफुलकी आणि विरंगुळा बहाल करणारी नाही. गूढतेमुळं ती काहीशी कठीण वाटते. ती समजली आणि न समजली, तरी अस्वस्थ करून जाते. सतत खुणावत राहते. मनाला स्पर्शून जाते...

काव्याच्या यशासंबंधात पडणारे परिश्रम आणि सोसाव्या लागणाऱ्या वेदनांबद्दलचा सूचक उल्लेख आणखी एका शेरमध्ये ग़ालिबनं केला आहे. अनेक प्रकारच्या अडचणींचा, कष्टांचा सामना करावा लागतो, तेव्हा कुठं माणसाला यश मिळतं. या शेरमध्ये तो म्हणतो, ‘जलबिंदूचा मोती होण्यापर्यंतचा प्रवास खडतर असतो, हे लक्षात घ्यायला हवं. कारण लाटांच्या जाळ्यात जबडा वासलेल्या शेकडो मगरी आहेत, ज्या या जलबिंदूला गिळून टाकण्यास सज्ज आहेत.’
दाम-ए-हर मौज में है हल्क़ा-ए-सद-काम-ए-निहंग
देखें क्या गुज़रे है क़तरे से गुहर होने तक

सामान्य माणूस केवळ यश, सफलता बघतो. हे यश मिळवण्यासाटी किती धडपडी कराव्या लागतात, कोणत्या यातनांतून जावं लागतं, त्याची कल्पना त्याला नसते. जीवन अनेक संकटांनी भरलेलं असतं आणि त्यातून पार पडल्याशिवाय आनंद, यश मिळत नाही. एकूणच जीवनबद्दल लिहिलेला हा शेर काव्यक्षेत्रालाही लागू होतो.

संबंधित बातम्या