...पर याद आता है।

नंदिनी आत्मसिद्ध 
बुधवार, 1 जुलै 2020

अन्दाज़-ए-बयाँ

मृत्यूनंतरही ग़ालिबचं नाव मागं उरलं आहे. त्याची उर्दू आणि फ़ारसी भाषांमधली कविता, याच दोन भाषांमधली त्याची पत्रं, त्यानं १८५७ नंतरच्या काळावर लिहिलेला ‘दस्तंबू’ हा फ़ारसी ग्रंथ, असं खूप काही... त्या साऱ्याकडं वळायचंच आहे. पण थेट अलीकडच्या काळात ग़ालिब किती पोचलाय आणि त्याच्याविषयी लोकांना काय वाटतं, हेही महत्त्वाचं आहे. आपल्या संसदेतही ग़ालिबचा उल्लेख होतो. कधी तो चुकीचे संदर्भ देऊन केला जातो, हा भाग वेगळा...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच भाष्य केलं, ‘उरी आणि पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राइक केले. आपल्या सीमांचं रक्षण कसं करायचं, हे भारताला पक्कं ठाऊक आहे.’ त्यावर प्रतिक्रिया नोंदवताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ग़ालिबचा एक शेर किंचित बदल करून उद्धृत केला.  

सब को मालूम है सीमा की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ूश रखने को शाह-यद ये ख़याल अच्छा है।’
याला प्रत्युत्तर देताना संरक्षणमंत्री राजनाथसिंग म्हणाले, मिर्ज़ा ग़ालिब का ही शेर थोड़ा अलग अंदाज़ में है। 

‘हाथ’ में दर्द हो तो दवा कीजै
‘हाथ’ ही जब दर्द हो तो क्या कीजै
ग़ालिब राजकारणातही येतो, तो हा असा...

मध्यंतरी २० जुलै रोजी मिर्ज़ा ग़ालिबचा २२० वा जन्मदिन असल्याचं ट्विट माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध साहित्यिक शशी थरूर यांनी केलं होतं. तेव्हा जावेद अख़्तरनं त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली होती. ग़ालिबचा जन्मदिन २० जुलैला नसून, २७ डिसेंबरला असतो. परंतु, या जन्मदिनानिमित्त थरूर यांनी 

ख़ुदा की मुहब्बत को फ़ना कौन करेगा
सभी बन्दे नेक हो तो गुनाह कौन करेगा

हा शेर गालिबचा म्हणून उद्धृत केला. तेव्हा, हा शेरही ग़ालिबचा नसल्याचं जावेदनं त्यांना दाखवून दिलं. या चुकीची जाहीर कबुली देताना शशी थरूर म्हणाले, ‘प्रत्येक चतुर वचन हे ज्याप्रमाणं विन्स्टन चर्चिल यांच्या नावानं खपवलं जातं, त्याचप्रमाणं जेव्हा एखादी शायरी लोकांना आवडते, तेव्हा ते ती ग़ालिबची आहे, असं समजतात.’ हे मात्र अगदी खरं आहे. ग़ालिबच्या नावे असे कैक शेर व्हॉट्सॲपवर फिरत असतात...

एकदा राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढला शेर उद्धृत केला होता, पण तो ग़ालिबचा नाही. मात्र व्हॉट्सॲपवर तो त्याच्या नावानं आजही वेगानं फिरत असतो... 
ता अुम्र ग़ालिब ये भूल करता रहा
धूल चेहरे पे थी, आईना साफ़ करता रहा

ग़ालिबचा करिश्मा त्याकाळीही होताच. पण मृत्यूनंतर ग़ालिब अधिक प्रसिद्ध झाला. त्याचे अनेक शेर लोकांच्या तोंडावर असतात. आपला मुद्दा मांडण्यासाठी ग़ालिबला बरेचजण उद्धृत करतात. निरनिराळ्या प्रसंगी ग़ालिबचा एखादा तरी शेर लागू होतोच. म्हणूनच तर आयुष्यातल्या

वेगवेगळ्या वळणांवर ग़ालिब आठवतो...
आह को चाहिए इक अुम्र असर होने तक
कौन जीता है तेरी ज़ुल्फ़ के सर होते तक

हा त्याचा शेर निराश प्रेमिकांनी अद्याप मनाशी जपला आहे. असे किती म्हणून शेर सांगावेत... ग़ालिबचा हा शेरही जगताना अनेकांना आठवतो-
हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले

हाच शेर उद्धृत करून, मायक्रोसॉफ्टचे मूळ भारतीय वंशाचे सीईओ सत्या नाडेला दिल्लीत तरुणांसमोर बोलताना म्हणाले होते, ‘तरुणांनो, तुम्ही साहसी आणि महत्त्वाकांक्षी व्हा.’ यासारखे कित्येक शेर लोकांच्या ओठाओठावर रुंजी घालू लागले, याची तर गणतीच नाही...
***

ग़ालिबच्या २२० व्या जन्मदिनानिमित्त गुगलनं एका डूडलच्या रूपानं त्याचा सन्मान केला. जगभरातील वेगवेगळ्या भाषांमधून त्याच्या काव्याचा अनुवाद झाला असल्यामुळं, ‘ग़ालिब’ हे नाव जगाला चांगलंच ओळखीचं आहे. 

‘जीवन म्हणजे वेदनामय संघर्षाचा प्रवास आहे आणि त्याचा शेवट मृत्यूनंच होतो,’ हे ग़ालिबच्या रचनांमधील मूलभूत सूत्र असे. जुन्या दिल्लीत चाँदनी चोकच्या परिसरात ग़ालिबचं घर होतं, तिथं त्याचं स्मारक काही वर्षांपूर्वी करण्यात आलं. वीसेक वर्षांपूर्वी तर या जागेत मेकॅनिकल वर्कशॉप होतं. ग़ालिबचं दिल्लीतलं हे स्मारक ‘ग़ालिब  की हवेली’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं त्याच्या वापरातील काही वस्तू, कपडे, वगैरे वस्तू मांडण्यात आल्या आहेत. त्याचा एक पूर्णाकृती संगमरवरी पुतळाही तिथं आहे. 

ग़ालिबची आठवण त्याच्या चाहत्यांनी, अभ्यासकांनी जोपासली आहे. पण सामाजिक, सांस्कृतिक दृष्टी ठेवून सरकारी स्तरावर ग़ालिबचा विचार जरा उशिरानंच झाला. ग़ालिब मूळचा आग्र्याचा. ते त्याचं जन्मस्थान. परंतु त्याचा २०० वा जन्मदिवस साजरा करण्याचं आग्रा शहरवासीयांना सुचलं नव्हतं. इंग्रजीत जे शेक्सपिअरचं स्थान आहे, ते उर्दूत ग़ालिबला आहे. परंतु एखाद्या रस्त्याला वा प्रेक्षागृहाला ग़ालिबचं नाव द्यावं, अशी मागणी होऊनही आग्रा महापालिकेनं त्यास प्रतिसाद दिला नव्हता. उर्दू साहित्याच्या संशोधनासाठी ग़ालिबच्या नावानं एखादं अध्यासन निर्माण करावं, ही मागणीही आग्रा विद्यापीठानं फेटाळून लावली होती. उर्दू साहित्यातील संशोधनाकरिता सरकारनं वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी मिर्ज़ा ग़ालिब अकादमीचे संचालक सईद जाफ़री यांनी केली होती. आग्रा येथील कलामहल भागातील ज्या हवेलीत १७९७ मध्ये ग़ालिबचा जन्म झाला, तिथं आता गर्ल्स कॉलेज आहे. तिथं ग़ालिबचं स्मारक नाही. विदेशी पर्यटक आग्र्याला येतात, तेव्हा ग़ालिबच्या जन्मस्थळाबद्दल हटकून चौकशी करतात. त्यांना काय उत्तर द्यावं, असा प्रश्न त्यावेळी आग्रावासीयांना पडतो. कोलकात्यात ग़ालिब्या नावं रस्ता आहे. मुंबईतही भायखळ्याजवळ ‘मिर्ज़ा ग़ालिब स्ट्रीट’ आहे. इतरभही काही ठिकाणी त्याचं नाव याप्रकारे झळकलं असेल. 

ग़ालिब आणि उर्दू भाषा यांचं नातं अभिन्न आहे. पण इतरही भाषांमधून ग़ालिब पोचला आहे. ग़ालिबच्या काव्यावर आधारित कार्यक्रम, नाट्य, असे अनेक प्रयोग कलावंतांना, गायकांना करावेसे वाटले. काही वर्षांपूर्वी फरीदाबाद इथं रामलीला मैदानात एक वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग झाला. रामायणाची कथा सादर करताना, त्यात हिंदी व उर्दू शेरोशायरीचा वापर करण्यात आला. या संमिश्र भाषाप्रयोगाचं ‘मिर्ज़ा ग़ालिब मीट्स तुलसीदास’ असं वर्णन करण्यात आलं होतं. 

‘दिल्ली की आख़री शमा’ हे मिर्ज़ा फ़रहतुल्लाह बेग देहलवी यानं लिहिलेल्या ‘दिल्ली का यादगार मुशायरा’ या कल्पनेवर आधारित नाटक तर प्रसिद्धच आहे. मुग़ल दरबारात बहादूरशाह ज़फ़रच्या साक्षीनं १८५७ मध्ये झालेला अखेरचा दरबारी मुशायरा हा याचा विषय. बहादूरशाहच्या दरबारातले दाग़, ज़ौक़ ग़ालिब, मोमिन, वगैरे नामचीन शायर या मुशायऱ्यात सहभागी झाले, अशी कल्पना यात आहे. २०१२ मध्ये या नाटकाचा एक प्रयोग दिल्लीच्या लाल किल्ल्यात झाला होता, ज्यात दिवंगत कलाकार टॉम आल्टरनं बहादूरशहाची भूमिका केली होती.  

मागच्या दोन दशकांत सईद आलम यांनी लिहिलेल्या ‘ग़ालिब की न्यू देहली’ या नाटकाचे काहीशे प्रयोग झाले आहेत. ग़ालिब आधुनिक नवी दिल्लीत प्रवेश करतो आणि बदलत्या काळाशी जुळवून घेताना त्याची तारांबळ उडते, या कल्पनेवर आधारित असलेलं हे नाटक आहे. त्यात उपहास आहे, गंमत आहे. नोटेवर गांधींचं चित्र बघून ग़ालिब एकाला विचारतो, तेव्हा ते गांधी आहेत, असं त्याला समजतं. त्यावर तो प्रश्न करतो, ‘हे कोणी कवी आहेत का?’

दिल्लीचा ग़ालिब स्ट्रीट लोधी रोडपासून सुरू होतो आणि काहीशे मीटरवर दक्षिणेला ग़ालिबच्या संगमरवरी समाधीपाशी संपतो. सूफी संत अवलिया हज़रत निज़ामुद्दीन यांचीही समाधी याच परिसरात आहे. याच गल्लीत आज ‘ग़ालिब कबाब कॉर्नर’ही आहे. गुलज़ारनं एकदा म्हटलं होतं, ‘प्रत्येकाच्या दृष्टीनं ग़ालिब हा महत्त्वाचाच आहे. त्याची भाषा तुमच्या परिचयाची नसली, तरी तुम्हाला त्याच्याबद्दल माहीत असायलाच हवं. ग़ालिबच्या कविता, त्याची जीवनशैली, त्याचं वागणं-बोलणं हे सर्वच प्रेरणादायी आहे. ज्या काळी लोकांकडं बघितलं तरी त्यांचा धर्म कोणता, हे ओळखू यायचं, तेव्हा ग़ालिब मानवतावादाबद्दल बोलतच होता. ग़ालिबची सात मुलं एकापाठोपाठ गेली. असं असूनही, ग़ालिबनं चांगली विनोदबुद्धी जोपासली होती.’ 

गुलज़ार यांच्याही नावानं अनेक त्यांच्या नसलेल्या कविता सोशल मीडियावरून फिरत असतात. ते म्हणतात, ‘पूर्वी ९९ टक्के वेळा माझ्या नावानं अशा कविता फिरत. आता १०० टक्के माझ्या नसलेल्याच कविता फिरतात. माझा विषय सोडून द्या. पण माझा आदर्श असलेल्या ग़ालिबबाबत असा अन्याय होतो, तेव्हा मला विलक्षण वेदना होतात...’

गुलज़ार यांनी केलेली ग़ालिबवरची मालिका अप्रतिम होती आणि नसीरुद्दीन शाहनं त्यात साकारलेला ग़ालिब अगदी लाजवाब. गुलज़ारच्या मिर्ज़ा ग़ालिब मालिकेत नावेतून जाताना ‘आह को चाहिए इक’ ही ग़ज़ल चित्रित झाली आहे. त्यात ग़ालिबची विशिष्ट टोप घातलेला नसीरुद्दीन आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आर्त, उत्कट भाव कायम लक्षात राहण्यासारखा आहे. सोहराब मोदी यांनी केलेला ‘मिर्ज़ा ग़ालिब’ हा चित्रपटही ग़ालिबला न्याय देणारा होता. त्याच्या लेखन-संशोधनात मंटो या उर्दू लेखकाचा वाटा होता. त्याच्या हयातीत मात्र हा चित्रपट पूर्ण झाला नाही.  

राहत फ़तेह अली ख़ान यांच्या आवाजातही ‘दिल से तेरी निगाह जिगर तक उतर गई’ ही ग़ज़ल आज व्हिडिओवर बघता येते. भारतात ग़ालिब आपल्याला जागोजागी भेटतो. अनेक माध्यमांतून भेटत आलाय. सैगलपासून रफी, तलतपर्यंत आणि बेगम अख़्तर, लतापासून चित्रा सिंगपर्यंतच्या अनेक गायक-गायिकांनी ग़ालिबच्या रचना गायल्या आहेत. या गायनामुळं ग़ालिब एका वेगळ्या जिवंतपणानं आजच्या लोकांना भेटत राहतो...

सलमान ख़ानच्या ‘किक’ या चित्रपटात शिवगजराच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी लोकांना ठार मारताना, ग़ालिबचे शेर ऐकवतो. ‘कोई उम्मीद बर नहीं आती’ हा शेर त्याचा आवडता शेर आहे. ‘हज़ारों ख़्वाहिशें ऐसी’ या चित्रपटात शुभा मुद्गलच्या भन्नाट आवाजात ‘इश्क़ पर ज़ोर नहीं, है ये वो आतिश ग़ालिब’ ही ग़ज़ल ऐकायला मिळते. शाहरुख़ आणि मनीषा कोईरालाच्या ‘दिल से’ या चित्रपटातदेखील याच ओळींचा वापर करण्यात आला होता. ‘जी ढूँडता है’ या ग़ालिबच्या ग़ज़लचा वापर करून गुलज़ारने मौसम या चित्रपटात ‘दिल ढूँढता है’ या गाण्याचा मुखडा केला. 

‘ग़ालिब प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करतो,’ असे उद्‍गार इतिहासकार राणा सफ़वी यांनी काढले होते. ग़ालिबनं ज्या उर्दू भाषेत लिहिलं, ती एका विशिष्ट धर्माशी व त्याच्या अनुयायांशी जोडली गेलेली भाषा होती. त्यानं जर इंग्रजीत लिहिलं असतं, तर त्याला नोबेल मिळालं असतं, असं इतिहासकार सुहैल हाशमीनं म्हटलं आहे. 

दुर्दैवानं आजच्या पिढीतल्या उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनाही ग़ालिबची माहिती नसते. अशावेळी ‘पूछते हैं वो कि ‘ग़ालिब’ कौन है’ या शेरची आठवण होते. दिल्लीचे धर्मनिरपेक्षतेचे धागे उसवत चाललेले असताना, मिर्ज़ा ग़ालिब लोकांना समजावून सांगण्याची व त्यांच्यापर्यंत पोचवण्याची आणखीनच आवश्यकता आहे, विशेषतः लहान मुलांपासूनच ही सुरुवात कली पाहिजे. उर्दू, मुसलमान यांच्याबद्दलच्या विशिष्ट प्रतिमा पसरवल्या व रुजवल्या जात असतानाच्या काळात तर ग़ालिबचं स्मरण करणं गरजेचं आहे...   

संबंधित बातम्या