उधर होता काश कि मकाँ अपना

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 6 जुलै 2020

विविध विषय, कल्पना, विचारांचं सौंदर्य आणि शब्दांच्या पलीकडं जाणारा गर्भित अर्थ व्यक्त करण्याची क्षमता ग़ालिबच्या काव्यात पुरेपूर भरलेली आहे. त्याच्या रचना म्हणजे अत्यंत दिलखेचक असा कवितेचा नमुनाच आहे. संक्षिप्त आणि अर्थगर्भ रचना हे त्याच्या शायरीचं वैशिष्ट्यच...

ग़ालिब एकाच वेळी काफ़िर, म्हणजे धर्मभ्रष्ट, नास्तिक आणि त्याचवेळी मुसलमानही होता. त्याची आध्यात्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक धारणाच तशी होती. त्याच्या काव्यात यासह जीवनातल्या इतरही धारणांचे ठसे आढळून येतात. त्याचा शंकेखोरपणा, प्रस्थापित समजुतींना प्रश्‍न विचारण्याची वृत्ती त्याला वेगळं ठरवते. भारताच्या आंतरिक बहुसांस्कृतिक गाभ्याशी तो खऱ्या अर्थानं जोडलेला होता... त्याच्या काव्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर धर्म, ईश्‍वर यांची चर्चा आढळते. एका शेरमध्ये त्यानं म्हटलं आहे, की मला एकीकडं माझा धर्म विचलित होण्यापासून रोखत आहे, तर त्याचवेळी नास्तिकता मला आपल्याकडं खेचून घेत आहे. माझ्या पाठीमागं क़ाबा आहे आणि पुढं कलीसा, म्हणजे चर्च आहे...

ईमाँ मुझे रोके है और खींचे है मुझे कुफ्र 
क़ाबा मिरे पीछे है कलीसा मिरे आगे

‘धर्म माझी वाट रोखून धरत आहे आणि नास्तिकता मला पुढं ओढत आहे. काबा माझ्या पाठीमागं आणि चर्च माझ्या पुढं आहे,’ असाही याचा अर्थ लावता येऊ शकतो. म्हणजे, जग आता आधुनिक वळण घेत आहे, पण धर्म आधुनिकतेकडं जाण्यास रोखत आहे, असंही त्याला सुचवायचं असावं. तर आपल्याला लाभलेला इस्लामी संस्कृतीचा वारसा आणि इंग्रजांच्या वाढत्या वर्चस्वामुळं समोर दिसत असलेलं बदलतं वास्तव यांचाही संदर्भ यात अपेक्षित आहे. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतींमधला बदल आणि संघर्ष ग़ालिबच्या नजरेनं टिपला होता, हे या ओळींमधून दिसतं. नवीन बदलांचं स्वागत करणारा ग़ालिब गृहीत धरला, तर या शेरचा आणखी वेगळाच अर्थ होतो. बदलत्या काळाची चाहूल लागलेला एक द्रष्टा कवी यातून समोर येतो...   

माणसाची धर्मनिष्ठा बाह्य गोष्टींवर जोखू नका, हे सांगताना ग़ालिब म्हणतो, ‘जपमाळ आणि जानवं यांच्यातील गाठींवर काही अवलंबून नाही. निष्ठेवरूनच शेख आणि ब्राह्मण या दोघांचीही पारख केली जाते,’  
 

नहीं कुछ सुब्हा-ओ-ज़ुन्नार के फंदे में गीराई
वफ़ादारी में शैख़ ओ बरहमन की आज़माइश है

या शेरमध्ये धर्मविषयक निष्ठेचा संदेश थेटच आहे. पण याला १८५७ नंतरच्या काळाचा संदर्भही लागू पडतो. इंग्रजांशी निष्ठा असेल, तर ते अधिक महत्त्वाचं, असा तो काळ होता. या ग़ज़लचा जो मतला, म्हणजे प्रारंभिक शेर आहे, त्यातही या अर्थाकडे झुकणारे संदर्भ सापडतात- 

क़द ओ गेसू में क़ैस ओ कोहकन 
की आज़माइश हो
जहाँ हम हैं वहाँ दार-ओ-रसन 
की आज़माइश है

ग़ालिब मद्यपानासाठी बदनामच होता. मद्याची त्याला आसक्ती होती आणि ती त्यानं कधी लपवली नाही. मद्याबाबतच्या रूढ समजुतींना त्यानं कधीच मानलं नाही. पण काव्यात शराबचा उल्लेख करण्याची परंपरा मात्र त्याला मान्य होती. म्हणूनच कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे तो शराबचा उल्लेख करून आपला आध्यात्मिक विचार, तात्त्विक मतं मांडत असे. उर्दू-फ़ारसी काव्यात मद्य, मद्यपान आणि नशा यांना एक विशिष्ट स्थान आहे. दारू हा विषय समाजात तसा हलक्या आवाजात बोलण्याचा. इस्लामी धर्मात तर मद्यपान पूर्णतः वर्ज्य ठरवलं आहे. तरीदेखील मद्याचा उल्लेख, अपूर्व आनंदाशी जोडलेला मद्यपानाचा संकेत हे या काव्यात आपसूकच येतं. ‘अंतिम सत्याविषयीची चर्चा करायची झाली, तर शराब आणि प्याला यांच्याविना ती करता येत नाही,’ अशा अभिप्रायाचा त्याचा हा शेर प्रसिद्धच आहे-

हर चन्द हो मुशाहिदा-ए-हक़ की गुफ़्तगू
बनती नहीं है बादा-ओ-साग़र कहे बग़ैर

जगण्याची आसक्तीच इतकी चिवट आणि जिवट असते, की कुठल्याही परिस्थितीत असलेला मनुष्य जीवनाचे रंग अनुभवण्यातच रमलेला असतो. स्वतःला सगळी सुखं उपभोगता आली नाहीत, तरी इतरांच्या जगण्यातला आनंद व जोश निरखत माणूस जीवनाचे रंग अनुभवत असतो. माणसाच्या या जीवनलालसेशी शराबला जोडून, ग़ालिबनं म्हटलं होतं, ‘माझ्या हातांना हालचालही करता येत नाही, पण माझ्या डोळ्यांमध्ये अद्याप पुरेपूर क्षमता आहे. मद्याचा पेला आणि सुरई माझ्या समोरच राहू द्या.’ 

गो हाथ को जुंबिश नहीं आँखों में तो दम है
रहने दो अभी साग़र-ओ-मीना मेरे आगे

ग़ालिबचं काव्य म्हणजे अक्षरशः खजिना आहे. विविध विषय, कल्पना, विचारांचं सौंदर्य आणि शब्दांच्या पलीकडं जाणारा गर्भित अर्थ व्यक्त करण्याची क्षमता काव्यात पुरेपूर भरलेली आहे. ग़ालिबच्या रचना म्हणजे अत्यंत दिलखेचक असा कवितेचा नमुनाच आहे. ग़ज़लमध्ये तर विचारांची इतकी उंच झेप, व्यापकता आणि अर्थपूर्णतेचा आवाका त्याच्याइतका इतर कुणीच गाठला नाही. संक्षिप्त आणि अर्थगर्भ रचना हे त्याच्या शायरीचं वैशिष्ट्यच. आपलं काव्य न समजणारे जे आहेत, त्यांच्याबद्दलचा पुढला ग़ालिबचा शेर बरंच काही सांगून जाणारा आहे. ‘मी हा असा आहे, मी असंच लिहीत राहणार,’ असा काहीसा आविर्भाव असणारा हा शेर त्याच्या खास शैलीतला आहे. तो यात म्हणतो, ‘हे ईश्‍वरा, यांना माझं म्हणणं समजत नाही आणि कधी समजणारही नाही. मला तू वेगळी वाणी देणार नसशील, तर मग यांना जरा वेगळं मन दे बघू.’

या रब, वो न समझे हैं न समझेंगे मेरी बात
दे और दिल उनको जो न दे मुझको ज़बाँ और

आपली कविता समजून घेण्यास जर लोक तयार नसतील, तर मग त्यावर काही इलाज नाही. असलाच तर मग त्यांना दुसरं मन, दुसरी समजशक्ती मिळणं हाच तर एकमेव उपाय आहे. कारण हे काव्य समजून घेण्याची इच्छाच त्यांना नाही. त्यांचं हृदयपरिवर्तन होईल, तेव्हाच ते माझं काव्य समजून घेतील अन् हे ईश्‍वरालाच शक्य आहे. तसंच ‘माझी वाणी, माझी काव्यशैली बदलणं हे काही ईश्‍वरालाही शक्य नाही,’ असाही अर्थ इथं ग़ालिबला अभिप्रेत आहे...

माणूस बरेचदा असं झालं असतं, तर मीही तसं केलं असतं, असं म्हणत असतो. तसाच काहीसा भाव व्यक्त करणारा हा शेर आहे. ग़ालिब लिहितो, ‘मीही एखादं दृश्य उंचावर उभं केलं असतं. माझं घर तेवढं आकाशाच्या पलीकडं असायला हवं होतं...’   
 मंज़र एक बलन्दी पर और हम बना सकते
 अर्श से उधर होता काश कि मकाँ अपना  

संबंधित बातम्या