हो चुकीं बलाएँ सब तमाम 

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 13 जुलै 2020

ग़ालिबच्या काव्यातही दुःखाचं बहुरंगी रूप बघायला मिळतं. दुःखाला भिडण्याचा एक उपाय ग़ालिब सांगतो... ‘दुःखाची सवय करून घ्या.’ सवय करून घेणं, म्हणजे अर्थातच रडत बसणं नव्हे, तर त्याला ताकदीनं तोंड देणं. ग़ालिबच्या मृत्यूबद्दलच्या जाणिवा आणि धारणाही त्याच्या कवितेत उतरत गेल्या. 

ग़ालिबच्या थक्क करणाऱ्या आणि जगावेगळा, विक्षिप्त विचार मांडणाऱ्या शेरांची संख्याही कमी नाही. त्यापैकी एकाचा उल्लेख आवर्जून करावा असा. ग़ालिबच्या घनचक्कर स्वभावाचा अन् शैलीचा अनुभव देणार हा शेर आहे. तो असा –

ता फिर न इन्तज़ार में नींद आए अुम्रभर 
आने का अहद कर गए आए जो ख़्वाब में

अर्थ असा, ‘मला आयुष्यभर झोप लागू नये, यासाठी तिनं येण्याचं वचन मला दिलं, (तेही) स्वप्नात येऊन.’ चक्रावून टाकणारा हा शेर आहे. प्रेयसीला माहीत आहे, की मला तिनं भेटण्याचं वचन दिलं की माझी झोप उडणार. म्हणून मग तिनं काय केलं, तर माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं की नक्की भेटेन. पण यामुळं मी खडबडून जागा झालो आणि नंतर माझी झोपच उडाली. मी तिची वाट बघू लागलो. पण मग आठवलं, की ती स्वप्नात येऊन भेटणार आहे. एकूण काय, तर मला आयुष्यभर झोप लागू नये, म्हणून तिनं अशी युक्ती केली. आता मी स्वप्नात तिला कसं भेटू शकणार? कारण माझी झोपच उडाली आहे... अशा प्रकारच्या गोंधळात टाकणाऱ्या विचित्र आणि ‘क्रेझी’ ओळी ग़ालिब अनेकदा लिहिताना दिसतो... 

ग़ालिबनं एका शेरमध्ये दुःखाबद्दल म्हटलं आहे, ‘प्रत्येक जलबिंदूला समुद्रात सामावून जाण्यात आनंद वाटतो. तसं दुःख जेव्हा आपली मर्यादा सोडतं, तेव्हा त्याचं रूपांतर उपचारात/औषधात होतं.’ म्हणजे, दुःख जेव्हा चरमसीमेला पोचतं, तेव्हाच त्याला ओहोटी लागते. त्यानंतरच ते कमी होणार असतं, ही भावना ग़ालिब वेगळ्याच शैलीत मांडतो. 

अिशरत-ए-क़तरा है दरया में फ़ना हो जाना
दर्द का हद से गुज़रना है दवा हो जाना

ग़ालिबच्या काव्यातही दुःखाचं बहुरंगी रूप बघायला मिळतं. ‘दुःख जर आहेच, तर त्याची सवय करून घ्यायला हवी. त्याचा सामना करायला हवा, त्याला तोंड द्यायला हवं. हे केल्यानं ते दुःख मग दुःख राहत नाही’, असं ग़ालिब एका शेरमध्ये म्हणतो. त्यात तो असंही लिहितो, ‘माझ्यावर इतकी संकटं आली, की ती माझ्यासाठी संकटं राहिलीच नाहीत.’ 

रंज से ख़ूगर हुआ इन्साँ तो मिट जाता है रंज
मुश्किलें मुझ पर पड़ीं इतनी कि आसाँ हो गईं

दुःखाला भिडण्याचा एक उपाय ग़ालिब यात सांगतो. ‘दुःखाची सवय करून घ्या.’ दुःखाची सवय करून घेणं, म्हणजे अर्थातच रडत बसणं नव्हे, तर त्याला ताकदीनं तोंड देणं. तो म्हणतो, ‘माझ्यावर पडलेल्या संकटांतून बाहेर पडण्यासाठी मी हरतऱ्हेने प्रयत्न केले.’

ग़ालिबच्या मृत्यूबद्दलच्या जाणिवा आणि धारणाही त्याच्या कवितेत उतरत गेल्या. एका शेरमध्ये तो म्हणतो, ‘तो इतका जिद्दी आहे, की आज काही यायचा नाही. पण केव्हातरी आल्याशिवाय राहायचाही नाही. मृत्यूविषयीची माझी ही मोठीच तक्रार आहे, त्याविषयी काय सांगू?’

ये ज़िद कि आज न आवे और आए बिन न रहे
क़ज़ा से शिकवा हमें किस क़दर है क्या कहिए

माणूस जगताना थकून जातो, ग़ालिबचं तसंच झालं होतं. अखेरच्या काळात शारीरिक व्याधींमुळं तो त्रस्त झाला होता. शेवटची तीन वर्षं त्याची तब्येत जरा खालावलेलीच होती. तरीही त्याचं काम सुरूच होतं. तो अनेकांना पत्रं लिही आणि आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तर देणं त्याला आपलं कर्तव्य वाटत असे. त्याचं नाव झालं असल्यानं देशाच्या विविध भागांमधून त्याला पत्रं येत. शिवाय नवे व होतकरू शायर आपलं काव्य त्यानं वाचावं आणि आपली प्रतिक्रिया द्यावी, यासाठी पत्रव्यवहार करत. प्रकृती बिघडत गेली, तेव्हा मग तो तोंडी पत्राचा मजकूर सांगे व कोणीतरी तो लिहून घेत असे. पण अशीही वेळ आली, जेव्हा त्याला हाही खटाटोप त्रासदायक झाला. मग त्यानं वर्तमानपत्रांमधून जाहीर केलं, ‘माझी अवस्था ठीक नसल्यानं कोणाला माझं पत्रोत्तर विलंबानं पोचलं किंवा मिळालंच नाही, तर त्यांनी कृपया तक्रार करू नये. आजवर मी याबाबत चालढकल केली नाही. पण आता मी निकामी झालो आहे. माझ्यात शक्ती उरलेली  नाही. मग मी करणार तरी काय? माझ्यामुळं कुणाला क्लेश झाले, तर त्यांनी मला क्षमा करावी.’ 

याप्रकारचं निवेदन प्रकाशित झाल्यानंतरही ग़ालिबच्या भोवतीची माणसांची गर्दी कमी होत नव्हती. पत्रांचा आणि कवितांचा बाहेरील ओघ सुरूच राहिला... १८६९ वर्ष उजाडलं, तेव्हा ग़ालिबची तब्येत बरीच ढासळली होती. त्याची इहयात्रा अंतिम टप्प्यात होती. शेवटच्या दिवसांमध्ये त्याची शुद्ध अधून मधून हरपत असे. मधेच तो भानावर येई. खाणंपिणंही कमी होत जाऊन हळूहळू बंद झाल्यागत झालं होतं. १५ फेब्रुवारी १८६९ रोजी दुपारी त्याची, तो वाट पाहत असलेल्या मृत्यूशी भेट झाली. सकाळपासूनच त्याच्या घरी शेकडो चाहते आणि शिष्य जमा झाले होते. मित्रांच्या सहवासाची आणि संवादाची ओढ असलेला ग़ालिब अखेरच्या प्रवासाला निघाला, त्यावेळी एकटा अजिबात नव्हता. चाहत्यांच्या गराड्यात होता. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा दफनविधी निज़ामुद्दीन इथल्या दफनभूमीत पार पडला. 

त्याचा संबंध ज्या लोहारूच्या नवाब घराण्याशी होता, त्या घराण्यातील नवाब ज़ियाउद्दीन यानं ग़ालिबचं अंतिम क्रियाकर्म केलं आणि मोठ्या सन्मानानं दिल्लीजवळच्या हज़रत निज़ामुद्दीन इथल्या आपल्या वंशाच्या कब्रस्तानात ग़ालिबच्या शवाला चिरविश्रांती दिली. 

इतकी दुःखं सोसली, आता एकच तर उरलं, त्यालाही सामोरं जायचंय... मात्र मरण कधी येणार, हे खरंच माहीत नाही. ते अचानक आणि नकळत येणार आहे. पण नक्की येणार आहे....

हो चुकीं ग़ालिब बलाएँ सब तमाम 
एक मर्ग-ए-नागहानी और है

‘‘ग़ालिब’, आता सगळी दुःखं, संकटं संपली. पण आहे, अजून एक बाकी आहे. ते म्हणजे अचानक येणारा मृत्यू.’ मृत्यूशी असलेलं ग़ालिबचं नातं इथं जरा रोमँटिक होऊन जातं. अखेर हा मृत्यूही त्याला भेटला. ग़ालिबनंच म्हटल्यानुसार, त्याच्या जीवनातल्या अंतहीन दुःखांवरचा इलाज होता तो...

संबंधित बातम्या