ग़ालिबचं पत्रलेखन

नंदिनी आत्मसिद्ध 
मंगळवार, 21 जुलै 2020

अन्दाज़-ए-बयाँ

कवी म्हणून ग़ालिब किती मोठा होता हे सर्वच जाणतात. पण त्याच्या हातून काव्यरचना घडली नसती, तरी आपल्या पत्रलेखनामुळं तो एक उत्तम लेखक म्हणून प्रस्थापित झाला असता, असं त्याच्या पत्रांकडं बघून म्हणावंसं वाटतंच; इतकं त्याचं पत्रलेखन प्रभावी आणि दिलखेचक आहे. अर्थात त्याचं कवी असणं हे त्याच्या प्रचंड लोकप्रियतेचं आणि अशा विपुल पत्रलेखनाचं कारण आहे, हेही तितकंच खरं... देशभर त्याचे चाहते होते, शिष्य होते आणि त्यांच्याशी त्याचा पत्रव्यवहार सातत्यानं सुरू असे. ग़ालिबनं आपल्या शिष्यांना, मित्रांना आणि चाहत्यांना लिहिलेल्या पत्रांचा, ‘ख़ुतूत-ए-ग़ालिब’ हा संग्रह म्हणजे पत्रातून किती मनमोकळेपणानं आणि आस्थेनं लिहता येतं याचा उत्कृष्ट नमुनाच आहे. या पत्रांमधून ओळख होते ती ग़ालिबच्या व्यक्तिगत संबंधांची, त्याच्या रागलोभांची, विचारांची आणि त्याच्या गद्यलेखनाच्या नमुन्याचीही. अर्थातच त्या काळची सामाजिक परिस्थिती, तत्कालीन भाषा अशा अनेक गोष्टी या पत्रांमधून उलगडत जातात. एकप्रकारे ही पत्रं म्हणजे १९ व्या शतकातील एका कालखंडाचा इतिहासही आहेत. या पत्रांचा संपूर्ण वेध घेणं हा एका पुस्तकाचा ऐवज ठरेल. पण त्यांची छोटीशी झलकही मिळाली, तरी ग़ालिबच्या अंतरंगात डोकावल्याप्रमाणे वाटेल...

मुळात ग़ालिबला आपली पत्रं अशी पुस्तकरूपानं लोकांसमोर जावीत, असं आधी वाटत नव्हतं. त्याचा शिष्य व दोस्त मुन्शी हरगोपाल ‘तफ़्ता’ यानं तसा आग्रह धरला असावा. कारण त्याला १८५८ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात ग़ालिब म्हणतो, ‘रुक़आत (पत्रं) के छापे जाने में हमारी ख़ुशी नहीं है. लड़कों सी ज़िद न करो. और अगर तुम्हारी ख़ुशी इसीमें है तो साहब हमसे न पूछो।’ तरीपण ही पत्रं प्रसिद्ध झाली. आपल्या जवळच्यांना लिहिलेल्या व्यक्तिगत पत्रांचं जगजाहीर होणं त्याला कदाचित खटकत असावं. मात्र यामुळंच तर त्यांचं महत्त्व वाढलं होतं...

एका कवीच्या मनातले विचार व स्पंदनं या पत्रांमध्ये आहेतच, पण त्याचबरोबर हिंदी-उर्दू भाषेतील गद्याचा एक उत्कृष्ट नमुना त्यात बघायला मिळतो. त्यावेळची उर्दू भाषा, तिच्यात आलेले हिंदी-फ़ारसी व इंग्रजी शब्द वगैरेंबद्दल समजतं. हे सारं गमतीशीरही आहे आणि भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीनंही उपयुक्त आहे. ग़ालिब स्वतः फ़ारसीचा पंडित होता. त्यानं सुरुवातीच्या काळात कवितेप्रमाणं पत्रंही फ़ारसीतच लिहिली. त्याचा फ़ारसी भाषेतील पत्रसंग्रहही पुस्तकरूपात प्रकाशित झाला आहे. ग़ालिबच्या हयातीतच एक पत्रसंग्रह ‘ऊदे हिंदी’ या नावानं प्रकाशित झाला होता, पण त्यात छपाईच्या फार चुका असल्यानं तो नाराज झाला होता. (ग़ालिब सुरुवातीला उर्दू भाषेला ‘हिंदी’च म्हणायचा.) मग त्याच्या परवानगीनं दुसरी आवृत्ती तयार केली गेली आणि ग़ालिबच्या पत्रांचा ‘उर्दू-ए-मुअल्ला’ हा सुधारित संग्रह, १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झालेल्या त्याच्या मृत्यूनंतर पुस्तकरूपात लगेचच प्रसिद्ध झाला. पुढं ‘हिन्दुस्तानी ॲकॅडमी’तर्फे ‘ख़ुतूत-ए-ग़ालिब’ हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याचा देवनागरी लिपीतला अवतार १९५८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यापूर्वी १९४९ मध्ये कराची इथून ‘नादिरात-ए-ग़ालिब’ हा पत्रसंग्रह प्रकाशित झाला होता. 

बदलत्या काळात या पत्रांचं स्वरूपही बदलत गेलं, हे ही सारी पत्रं वाचताना जाणवतं. तसंच उर्दू-हिंदी भाषांमधल्या गद्यलेखनाचा सुंदर असा नमुना या पत्रांमध्ये बघायला मिळतो. साधारणतः १८४८ पासून ग़ालिबनं उर्दूतून पत्रं लिहायला सुरुवात केली. या संग्रहातली पत्रं मुख्यतः १८४९ ते १८६८ या दरम्यानची आहेत. ज्यात ग़ालिबची बदलती उर्दू भाषाशैलीही प्रतिबिंबित झाली आहे. सुरुवातीला असणारे मोठे मायने, खुशालीबद्दलचा बराच लांबलचक पारंपरिक मजकूर हे नंतरच्या काळातील पत्रांमध्ये कमी होत गेलं आणि थेट पत्रातील मुद्द्यालाच हात घालण्याकडं ग़ालिबचा कल वाढला, असं दिसतं. कुणी त्याला जर जुन्या पद्धतीनुसार लंबाचवडा मायना इ. असलेलं पत्र पाठवलं, तर तो उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात तो लिहिणाऱ्याची नक्कल करून टिंगल करणारं पत्रं लिहीत असे. या पत्रांमध्ये ग़ालिबच्या गमतीदार स्वभावाची, धारदार व विक्षिप्त शैलीची, तसंच त्याच्या एकूण जीवनविषयक चिंतनाचीही झलक मिळते. पत्रलेखनाला त्यानं दुसऱ्याशी संवाद साधण्याचा एक मार्गच केलं होतं. त्याच्या जिवाला पत्रं लिहून जणू एक दिलासा मिळत असे. म्हणूनच स्वतःच्या पत्रलेखनाबद्दल ग़ालिबनं एका पत्रातच म्हटलं आहे, ‘मैने वो अंदाज़-ए-तहरीर (लिहिण्याचा ढंग) ईजाद (शोधून काढला आहे) किया है कि मुरासिले (पत्र) को मुकालमा (बातचीत) बना दिया है। हज़ार कोस से बज़बाने क़लम (लेखणीरूपी जिव्हा) से बातें किया करो। हिज़्र (वियोग) में विसाल (मलन) के मज़े लिया करो।’ समोरासमोर बसून गप्पा माराव्या, तसं पत्रलेखन करणं ग़ालिबला आवडत असे. त्याच्या आयुष्यात पत्र लिहून आपल्या शिष्यांशी, मित्रांशी संपर्क साधणं हाच काय तो विरंगुळा होता. त्यातून त्याचं मन हलकं होत असे. इतरत्र घडणाऱ्या नवीन गोष्टी व घडामोडींबद्दल इतरांकडून त्याला कळत असे. ही पत्रं म्हणजे त्याच्यासाठी जगाकडं बघण्याची खिडकीच होती. इतक्या वर्षांच्या या पत्रांमधून आपल्यालाही बऱ्याच गोष्टी कळतात. कारण ग़ालिब अवतीभवतीच्या घडामोडींविषयी इतरांना लिहीत असे. त्यात मग साहित्यिक बाबींपासून समाजातली खळबळ, राजकीय हालचाली, स्वतःवर गुदरलेले प्रसंग, अडचणी, संकटं वगैरे बरंच काही...

अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्ययुद्धानंतरची आसपासची परिस्थिती, आर्थिक विवंचना, स्वतःच्या पेन्शनच्या अडचणी, आपल्या १५ अपत्यांपैकी एकही न वाचल्याचं दुःख, दोस्तांबद्दल वाटणारी आपुलकी अशा अनेक बाबी या पत्रांमधून उलगडत जाताना दिसतात. आपला शागिर्द तफ़्ता याला लिहिलेली सर्वाधिक, म्हणजे १२४ पत्रं या संग्रहात आहेत. त्याला एका पत्रात तो लिहितो, ‘तुझं पत्र बरेच दिवसात आलं नाही, म्हणजे तू आला नाहीस. पत्र लिही बाबा. नाहीतर का लिहिलं नाहीस, त्याची कारणं तरी लिही.’ समोर बसून बातचीत करावी, त्याप्रमाणे ग़ालिब अनेकदा लिहीत असे. एका पत्रात त्यानं लिहिलंय, ‘सुबह का वक़्त है। जाड़ा ख़ूब पड़ रहा है। अँगीठी सामने रखी हुई है। दो हर्फ़ लिखता हूँ, आग तापता जाता हूँ।’ किती अनौपचारिक आणि आस्थेवाईकपणे लिहिलं आहे हे सारं...

ग़ालिबची ही पत्रं म्हणजे उर्दू व हिंदी दोन्ही भाषांच्या दृष्टीनं एक अनमोल असा ठेवाच आहे. काळाच्या ओघात ग़ालिब खूप साध्या व सोप्या उर्दूत लिहू लागला. त्याच्या कवितांपेक्षा पत्रांमधली भाषा अधिक बोलकी व सहज आहे. पुढं काही इंग्रजी शब्द ग़ालिबला माहीत झाले आणि ते त्याच्या पत्रांमधून येऊ लागले. नॉटपेड, टिकट, पम्फलेट, पार्सल, दर्जन असे इंग्रजीतून उर्दूत आलेले शब्द तो वापरू लागला. त्याची ही पत्रं शैली आणि आशयदृष्ट्या तसंच संवेदनेच्या पातळीवरही एक उंची गाठणारी आहेत. याला कारण आहे, की ग़ालिबनं ही पत्रं स्वतःची विद्वत्ता मिरवण्यासाठी किंवा स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी लिहिली नव्हती. त्याला आपल्या जवळच्या माणसांशी संवाद साधायचा होता. आपली सुखंदुःखं त्यांना सांगायाची होती आणि त्यांचीही जाणून घ्यायची होती. 

त्यानं लिहिलेली ही पत्र जास्त करून साहित्यिक व शिष्यांना लिहिलेली आहेत. पण ही मंडळीही वेगवेगळ्या सामाजिक व आर्थिक स्तरातली आणि विभिन्न अभिरुची असलेली आहेत. सगळ्यांशी त्याचे संबंध एकाच पातळीवरले नाहीत. काहींशी त्याची सलगी आहे, तर काहीजणांशी तो हात राखून वागताना दिसतो. तर वेळप्रसंगी समोरच्याला जागा दाखवून द्यायलाही मागंपुढं पाहत नाही. काहींच्या पत्रांसाठी तो आसुसलेला दिसतो, तर काहीजण वारंवार पत्र लिहितात आणि विशेष काही सांगायचं नसलं, तरी आपल्याकडून पत्रोत्तराची अपेक्षा धरतात, हे त्याला आवडत नाही. तो याबद्दल संबंधित व्यक्तीला कळवतोही. तुम्ही माझ्या पत्रांना उत्तर देत नाही, असं लिहिणाऱ्या क़ाज़ी अब्दुल जमील याला १८५५ मध्ये पत्रोत्तरादाखल ग़ालिबनं लिहिलं होतं, ‘जवाब लिखने में जो मेरी तरफ़ स क़ुसूर वाक़ई होता है उसके दो सबब हैं। एक तो हज़रत महीनाभर में नौ पते लिखते है, मैं कहाँतक याद रखूँ। दूसरा सबब ये कि शौक़िया ख़ुतूत का जवाब कहांतक लिखूँ और क्या लिखूँ।’ पुढं तो असंही स्पष्टपणे लिहितो, की पत्रलेखनाचा रिवाज सोडून देऊन मी आता अर्थ असेल तेव्हाच लिहायचं, असं ठरवलं आहे. मग मला आवश्यक वाटत नसेल तर मी काय म्हणून लिहू? पण खास मर्जीतल्या शिष्यांना व मित्रांना मात्र रोजच्या रोज पत्र लिहायचा त्याला कंटाळा येत नसे. ‘ख़त आया, मुझको बातें करने का मज़ा मिला’ असं त्यांना तो खुशीनं कळवताना दिसतो. हा संग्रह बघितला की लक्षात येतं, की ग़ालिबला पत्रं लिहिण्याचा छंदच होता. एखाद्याला पत्र लिहिण्यासाठी तो निमित्तच शोधत असावा. 

इतकी सुंदर पत्रं लिहिणाऱ्या ग़ालिबला आपल्याला दुसऱ्यानंही अशीच खास व शैलीदार पत्रं पाठवावीत असं वाटत असे. त्याला पत्रांची अपेक्षा असे आणि उत्कंठेनं तो त्यांची वाट पाहत असे. एखाद्या प्रिय शिष्याचं व मित्राचं पत्र आलं, की त्याच्या मनातला उद्वेग, दुःख सारं काही दूर पळून जात असे. दोस्तांचा सहवास नाही, तर त्यांची पत्रं तरी येत राहावीत. म्हणजे त्यांची उणीव भरून निघेल, असं त्याला वाटे. डाक घेऊन येणारा डाकिया हा ग़ालिबच्या दृष्टीनं देवदूतापेक्षा कमी नव्हता. बरेचदा परिस्थितीमुळं ग़ालिबपाशी टपाल तिकिटासाठी पैसेही नसत. पण पत्रं लिहिण्याचा आनंद घेतल्यावाचून त्याला राहवत नसे. तिकीट न लावता मग तो पत्रं पाठवत असे. त्याचे मित्र पैसे भरून पत्रं सोडवून घेत. त्याची ही पत्रं खूप संवादी, प्रवाही आहेत. एका मित्राला तो लिहितो, ‘लो भाई, अब तुम चाहो बैठे रहो चाहो जाओ अपने घर। मैं तो रोटी खाने जाता हूँ। अन्दर-बाहर सब रोज़ेदार हैं। यहाँ तक कि बड़ा लड़का बाक़रअली खाँ भी। सिर्फ़ एक मैं और एक मेरा पयारा बेटा हुसैनखाँ ये हम रोज़ाख़्वार है। वही हुसैनअलीखाँ जिसका रोज़मर्रा है, ‘खिलौने मँगा दो, मैं भी बाज़ार जाऊँगा।’ 

व्यक्तिगत गोष्टींबरोबरच अवतीभवतीच्या वातावरणाविषयी, अतिवर्षा, रोगाच्या साथी अशा बाबी आणि समकालीन राजकीय परिस्थितीबद्दलही तो लिहितो. स्वतःच्या कुटुंबाची हालहवाल, साहित्य, भाषेचं व्याकरण इथपासून धार्मिक विचार व सिद्धांत यांचंही विवेचन ग़ालिबच्या या पत्रांमधून आढळतं. त्याच्या पत्रलेखनातून त्याच्या लेखनसामर्थ्याचा निराळा पैलू समोर येतो. तो काळ व इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. ग़ालिबचे शिष्य, मित्र आणि त्याच्या संपर्कातील वेगेवगळ्या व्यक्ती यांच्याबद्दलही समजतं. त्याच्या काळातील साहित्यिक-सामाजिक घडामोडींची माहिती मिळते आणि एक महान कवी जगाकडं कुठल्या नजरेतून बघत होता, याची कल्पना येते. 

ग़ालिबला अनेकजण त्याच्या शायरीचा अर्थही विचारत व तो उत्तरही देई. ग़ालिबनं स्वलिखित शेर फार मार्मिक पद्धतीनं उलगडून सांगितले आहेत. ते मुळातून वाचणं हा अपूर्व असा आनंद आहे. त्याची पत्रं त्या गेलेल्या दिवसांबद्दल खूप काही सांगून जाणारी आहेत. पत्र ही खरोखरच एक हृद्यगोष्ट आहे. ग़ालिबची भाषाशैली या गद्यरूप पत्रांमधूनही खुलत गेलेली दिसते. ग़ालिबच्या पत्रांमधील अन्दाज़-ए-बयाँसुद्धा काही औरच आहे...  

संबंधित बातम्या