...और दिल्ली उसकी जान 

नंदिनी आत्मसिद्ध
सोमवार, 2 मार्च 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

आपल्यासारखं दुःख इतर कुणाला मिळू नये, अशी मनोमन इच्छा बाळगणारा ग़ालिब १८५७ नंतरच्या परिस्थितीत अत्यंत बेजार झाला होता. आपण दिल्ली सोडून अन्यत्र जावं, असा विचार त्याच्या मनात येत होता. आर्थिक अडचणींमुळं निराशेनं त्याला पुरतं घेरलं होतं. किंबहुना यापुढं एकट्यानंच राहण्याच्या निर्णयाप्रत तो आला होता. आपली पत्नी आणि नातवंडं यांना लोहारूला (जिथं तिचे नातेवाईक होते) पाठवून द्यायचं आणि आपण स्वतः दुसरीकडं कुठंतरी राहायचं असं त्यानं ठरवलं होतं. त्याच्या या वागण्यामुळं घरातले सारेजण घाबरून गेले. संसार आणि पत्नी यांची जबाबदारी, त्यांची काळजी या साऱ्याबाबत त्याच्या या काळातील पत्रांमध्येही संदर्भ सापडतात, तसंच काव्यातही. 

अवतीभवतीच्या परिस्थितीमुळं हा सारा उद्रेक होता. एरवी आपल्या माणसांबद्दल त्याला प्रेमच होतं. नातवंडांवर तर फारच जीव होता. त्याची ही स्थिती पाहून लोहारूच्या नवाबानं उमराव बेगमला दरमहा ५० रुपये देणं मान्य केलं आणि तिला ही रक्कम तहहयात मिळेल अशी व्यवस्थाही केली. पण अर्थातच हा पैसा पुरणारा नव्हता. मग ग़ालिबला एका मित्रानं सांगितलं, की तू पटियालाला जा, तिथल्या दरबारात काही ना काही व्यवस्था होईल. मिळणाऱ्या पैशात पत्नी व मुलांना लोहारूला राहता येईल. आपण पटियालाला जावं आणि काही काम झालं, तर त्यांना बोलावून घेता येईल, असा विचार ग़ालिब करत होता. बहुधा याच काळात लिहिलेल्या एका शेरमध्ये त्यानं म्हटलंच होतं, ‘अजून काही दिवस आयुष्य असलं, तर माझ्याही मनात वेगळं काही करण्याची इच्छा आहे...’ 

कोई दिन गर ज़िन्दगानी और है 
अपने जी में हमने ठानी और है 

या ओळींमध्ये तुम्हाला नेमकं म्हणायचं आहे तरी काय, असं ग़ालिबला काज़ी अब्दुल जमील ‘जुनून’ या मित्रानं पत्र लिहून विचारलं, तेव्हा उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात - १८६४ मध्ये ग़ालिब लिहितो, 

‘इसमें कोई इशकाल नहीं। जो लफ़्ज़ हैं वही मानी हैं। शायर अपना क़स्द क्यूँ बताये कि मैं क्या करूँगा? मुबहम कहता है कि कुछ करूँगा। ख़ुदा जाने शहर में या नवाहे शहर में तकिया बनाकर फ़कीर होकर बैठा रहे, या देस छोड़ परदेस चला जाए।’ 

ग़ालिब दिल्ली सोडणार, ही बातमी पसरली. त्याच्या मित्र-दोस्तांना हे अजिबात आवडलं नाही. त्याऐवजी त्यानं रामपूरला जावं, तिथला नवाब पूर्वी त्याचा शिष्य झाला होताच. त्याच्याकडून काही सन्मान, मदत नक्कीच मिळेल. निदान त्याच्याशी या विषयावर बोलावं तरी... हा नवाब लहानपणी काही काळ दिल्लीला राहिला, तेव्हा ग़ालिबकडून फ़ारसी भाषेचे धडे घेत होता. थोडाच काळ त्यांचा संबंध आला होता. नंतर संपर्क नव्हता. यावेळी मग फ़ज़ले हक़ ख़ैराबादी यांनी रामपूरच्या नवाबाकडं ग़ालिबची शिफारस केली. ग़ालिबनं या नवाबाची प्रशंसा करणारं काव्य लिहावं, असंही त्यांनी सुचवलं. त्याप्रमाणं ग़ालिबनं केलंही. मग ५ फेब्रुवारी १८५७ रोजी फ़ज़ले हक़ यांनी सांगितल्यानुसार, नवाबानंही आपली काव्यरचना ग़ालिबकडं सुधारण्यासाठी पाठवून दिली. एकप्रकारे त्याचं शिष्यत्व स्वीकारलं. त्याला अडीचशे रुपयेही नवाबानं पाठवले होते. पण पैसे देण्याच्या तपशिलाबाबत नेमकं काही ठरण्याच्या आतच मे १८५७ मध्ये मेरठला बंड झालं आणि ते दिल्लीपर्यंत येऊन ठेपलं. परिस्थिती जरा निवळल्यानंतर पुन्हा ग़ालिबनं पत्राद्वारे नवाबाला आपल्या परिस्थितीची कल्पना दिली. काही रक्कम नियमित मिळावी, अशी अपेक्षाही त्यानं त्यात व्यक्त केली होती. १८५९ मध्ये एका पत्राद्वारे नवाबानं ग़ालिबला दरमहा शंभर रुपये देण्याचं मान्य केलं. तो हयात असेपर्यंत ही रक्कम त्याला मिळतही राहिली... 

ग़ालिब मग दिल्लीतच राहिला. बायकोला व नातवंडांना लोहारूला सोडून पटियालाला जाण्याचा निर्णय त्यानं रहित करून टाकला. खरं तर त्यानं पटियाला महाराजांसाठी लिहिलेलं स्तुतिपर काव्यही (क़सीदा) लिहून तयार ठेवलं होतं. पण दिल्ली सोडण्याची वेळ त्याच्यावर आली नाही. आग्रा सोडून इतकी वर्षं तो दिल्लीत राहात होता. या शहराच्या गल्ल्यांमधून हिंडला होता. त्याची सारी सुखदुःखं इथंच रुजली होती. तसंही दिल्ली सोडणं त्याला जडच गेलं असतं. ग़ालिबचा प्रतिस्पर्धी असलेला दिल्लीचा राजकवी शेख़ मोहम्मद इब्राहिम ‘ज़ौक़’ हा तर दिल्लीचाच. दक्षिणेकडं काव्याची कदर वाढती असतानाही, त्याला दिल्ली सोडण्याची कल्पना नको वाटायची. तोही आपल्या काव्यात म्हणून गेला, 
इन दिनों गरचे दकन में है बड़ी क़दर-ए-सुख़न 
कौन जाए ‘ज़ौक़’ पर दिल्ली की गलियाँ छोड़कर 

तर दिल्लीश्वर बहादूरशाह ‘ज़फ़र’लाही दिल्ली शहर सोडावं लागल्याची वेदना मनात घेऊनच इंग्रजांच्या कैदेत रंगूनला जावं लागलं. त्याच्या या ओळी प्रसिद्धच आहेत, 
कितना बदनसीब है ‘ज़फ़र’ दफ़्न के लिए 
दो दज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में 

अनेक उर्दू कवींनी दिल्ली शहराबद्दल लिहिलं आहे आणि आपल्या शायरीतून या शहराची विविध रूपं कोरून ठेवली आहेत. ग़ालिबच्या मनात बनारस ठसलं असलं, तरी त्याचं बालपणानंतरचं सारं आयुष्य दिल्लीतच गेलेलं. म्हणजे आजच्या जुन्या दिल्लीत. या शहराशी, तिथल्या वातावरणाशी, सांस्कृतिक खुणांशी त्याचं नातं जडलं होतं. आठवणी मनात रुतल्या होत्या. त्याचं बरंचसं काव्य इथंच लिहिलं गेलं. सुरुवातीला घरं बदलून तो इथल्या चाँदनी चौकमधल्या गली क़ासिमजान इथं स्थायिक झाला. त्याच्या  

पत्रांमधून दिल्लीबद्दल खूप वाचायला मिळतं. आपला एक लाडका मित्र मीर मेहदी हुसैन ‘मजरूह’ यानं बदलत्या काळातल्या दिल्लीची खबर विचारली, तेव्हा उत्तरादाखल लिहिलेल्या २ डिसेंबर १८५९ रोजीच्या पत्रात ग़ालिब म्हणतो, ‘क्या पूछते हो? क्या लिखूँ? दिल्ली की हस्ती मुन्हसिर कई हंगामों पर थी.. क़िला, चाँदनी चौक, हर रोज़ा बाज़ार मस्जिदे जामा का, हर हफ़्ते सैर जमना के पुल की। हर साल मेला फूलवालों का। ये पाँचों बातें अब नहीं। फिर कहो—दिल्ली कहाँ? हाँ कोई शहर क़लमरू-ए-हिन्द में इस नाम का था।’ 

पण याच दिल्लीत ग़ालिबनं काही दिवस तरी सुखाचे पाहिले होते. ज़ौक़च्या मृत्यूनंतर ग़ालिब दरबारी राजकवी झाला आणि दिल्लीचा सम्राट बहादूरशहाच्या खास संपर्कात आला. या काळात तो बहादूरशाह ‘ज़फ़र’ची कविता संपादित करत असे. त्यात सुधारणा सुचवत असे. रोज सकाळी नऊ वाजता लाल किल्ल्यात जाण्याचा त्याचा शिरस्ता होता. मग दुपारच्या जेवणासाठी घरी येई आणि पुन्हा राजवाड्यात जात असे. बहादूरशाहला पतंग उडवण्याचा शौक होता, त्याच्याबरोबर ग़ालिबही पतंगबाजीत भाग घेई. दिल्लीच्या जीवनाशी ग़ालिब एकूणच समरसून गेला होता. पण ते दिवस मागं पडले होते, जेव्हा तो कुणाचा नोकर नव्हता. स्वतःचा स्वतंत्र बाणा जपत आणि बादशहाचाही सन्मान राखत, कटू वास्तवाचं चित्र समोर ठेवत त्यानं लिहिलेला हा शेर बघा - 
‘ग़ालिब’ वज़ीफ़ाख्वार हो, दो शाह को दुआ 
वो दिन गये कि कहते थे, ‘नौकर नहीं हू मैं’ 

‘दिल्ली’ या नावाबद्दलही ग़ालिबनं आपल्या एका पत्रात चर्चा केली आहे. हे शहर दिल्ली, देहली, देल्ही अशी वेगवेगळी नावं असणारं कसं आहे, त्याविषयी तो लिहितो. तर १८५७ नंतर जी दिल्लीची अवस्था झाली आणि त्याच्या आयुष्याची जी दैना होण्याची वेळ आली, त्यावरही त्यानं लिहिलं आहे - 
है अब कि मामूरे में मेरी क़हत-ए-ग़म-ए-उल्फ़त ‘असद’ 
हमने ये माना कि दिल्ली में रहे खायेंगे क्या 

दिल्ली शहर १८५७ नंतर खूपच बदलत गेलं. पण त्याआधीचा लगतच्या काळातही दिल्ली दरबारचे रंग विटतच चालले होते. तिथल्या सांस्कृतिक जिवंतपणाला उतरती कळा लागली होती. ग़ालिबच्या अनेक पत्रांमधून याची झलक वाचायला मिळते. त्यानं १८५४ मध्ये काज़ी अब्दुल जमीलला लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख येतो, ‘मुशाहरा यहाँ शहर में कहीं नहीं होता, क़िले में शहज़ादगाने तैमूरिया जमा होकर कुछ ग़ज़लख़्वानी कर लेते हैं। मैं कभी उस महफ़िल में जाता हूँ कभी नहीं जाता। और ये सोहबत ख़ुद चन्द रोज़ा है। इसको दवाम कहाँ? क्या मालूम - अब ही न हो, अब के हो वो आइन्दा न हो।’ 

दिल्लीतल्या अशा मन विषण्ण करणाऱ्या आणि उद्वेगजनक परिस्थितीतही ग़ालिबची विनोदबुद्धी आणि खट्याळपणा टिकून होता. एकदा ग़ालिबला अटक करून कर्नल बर्न या दिल्लीच्या रेसिडेंट कमिशनरकडं (याचा उल्लेख ग़ालिब आपल्या पत्रात कर्नल ब्राउन असा करतो) नेण्यात आलं. त्याचा सहभाग बंडखोरांना मदत करण्यात आहे, अशी शंका येऊन त्याला पकडण्यात आलं होतं. तिथं स्वतःची बाजू मांडताना, आपण सरकारच्या विरोधात काहीच कसं केलं नाही, उलट व्हिक्टोरिया राणीचीही प्रशंसापर कविता लिहून स्तुतीच केली आहे, वगैरे सांगून ग़ालिबनं स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याची विशिष्ट पद्धतीची तुर्की टोपी आणि एकूण पोशाख पाहून गंमत वाटून त्याला कर्नलनं विचारलं, ‘तू कोणत्या धर्माचा आहेस?’ तेव्हा ग़ालिब उत्तरला, ‘आधा मुसलमान.’ कर्नलनं प्रश्न केला, ‘हे कसं काय?’ त्यावर ग़ालिबचा जवाब होता, ‘शराब पीता हूँ, सुअर नहीं खाता.’ यावर कर्नल बर्न खळखळून हसला आणि त्यानं ग़ालिबला सोडून दिलं. 

दिल्लीतल्या हिंसेबद्दल आणि अराजकाविषयी त्याला खेद वाटत होता. इंग्रजांच्या सैनिकांनी शहरात धुमाकूळ घातला होता आणि बंडात सहभाग घेतल्याच्या आरोपावरून बऱ्याच जणांना ठार मारलं होतं आणि चाँदनी चौकमधल्या झाडांवर त्यांची प्रेत लटकावली होती. ग़ालिबनं चाँदनी चौकला ‘वधस्तंभ’ (मक़्तल) असं संबोधून, या भयंकर प्रकाराचं वर्णन करताना लिहिलं आहे - 
चौक जिसको कहें, वह मक़्तल है 
आज घर बना है नमूना ज़िन्दान का 

दिल्लीची बादशाही पूर्ण लयाला नंतर गेली, पण त्या शहराची रया आधीच जायला लागली होती. शहरातल्या प्रत्येक धनिक आणि समृद्ध व्यक्तीला आपण जणू नवा बनलोब आहोत, असं वाटायला लागलं होतं. त्याबद्दल ग़ालिब लिहितो, ‘इथल्या बादशाहीचीच हालत अशी आहे, त्यामुळं प्रत्येकालाच आपण नवाब झाल्यासारखं वाटतं...’ 

बादशाही का जहाँ ये हाल हो ‘ग़ालिब’! तो फिर 
क्यूँ न दिल्ली में हर इक चीज़ नवाबी करे 

मात्र असं असलं, तरी ग़ालिबच्या मनात या शहराविषयी एक हळुवार कोपरा नक्कीच होता. म्हणूनच तर त्यानं दिल्लीबद्दल लिहिलं होतं, 
एक रोज़ अपनी रूह से पूछा कि दिल्ली क्या है 
तो यूँ जवाब में कह गये, ये दुनिया मानो जिस्म है 
और दिल्ली उसकी जान

संबंधित बातम्या