ग़ालिबचा मनमोकळा हृदयसंवाद 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

अन्दाज़-ए-बयाँ

पत्रलेखन म्हणजे दोन व्यक्तींमधल्या संवादाचं माध्यम. पत्रसंवादाचा हा सिलसिला अनेकदा बराच काळ चालत राहून उत्तरोत्तर रंगत जातो. साहित्याच्या दुनियेत तर पत्रलेखनाचं एक वेगळंच महत्त्व आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील व्यक्तींची पत्रं जशी त्यांच्या स्वभावावर, परस्परसंबंधांवर प्रकाश टाकतात, तशीच ती त्या त्या काळाचा आरसाही बनून येतात. ग़ालिबच्या पत्रांबाबत हेच म्हणता येईल. 

त्याचे शिष्य व मित्र यांना तो अगदी मनापासून पत्रं लिहीत असे. त्याच्या पत्रसंग्रहात सर्वांत अधिक, म्हणजे १६४ पत्रं आहेत, ती मुन्शीहरगोपाल ‘तफ़्ता’ याला पाठवलेली. तरी तफ़्तानं बहुधा आलेली ही सर्वच पत्रं पत्रसंग्रहात दिलेली नाहीत. किंबहुना यापेक्षाही जास्त पत्रं त्याला ग़ालिबनं लिहिली असावीत. कदाचित काही गहाळही झाली असतील. कारण १८४९ ते १८६५ पर्यंतचीच पत्रं या संग्रहात आहेत आणि १६४ पेक्षाही जास्त पत्रं नक्कीच लिहिली गेली असणार. तफ़्ता हा ग़ालिबपेक्षा तीनेक वर्षांनीच लहान असेल. ग़ालिब प्रेमानं त्याला ‘मिर्ज़ा’ तफ़्ता म्हणत असे. त्याचा तो आवडता शिष्य व मित्र होता. पंडित हरगोपाल तफ़्ता हिंदुधर्मीय होता. ग़ालिबचे अनेक मित्र हिंदू होते. तफ़्तानं ग़ालिबच्या ‘उर्दू-ए-मुअल्ला’ या पत्रसंग्रहाला (जो ग़ालिबच्या मृत्यूनंतर (१५ फेब्रुवारी १८६९) काहीच दिवसांनी, ६ मार्च १८६९ रोजी प्रकाशित झाला) लिहिलेली विवेचक प्रस्तावना हे ग़ालिबच्या संदर्भातलं पहिलं समीक्षापर लिखाण मानलं जातं. तफ़्ता दिल्लीपासून काही अंतरावरील सिकंदराबाद इथं राहत असे. ग़ालिबपेक्षा तो फार लहान नसला, तरी ग़ालिब त्याला पुत्रवत् मानत असे. ग़ालिबचं ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व तफ़्ताला अर्थातच मान्य होतं. तफ़्ता हा मुख्यतः फ़ारसीचा कवी होता.ग़ालिब तफ़्ताला उद्देशून महाराज, भाई, बन्दा परवर, साहब.. असे वेगवेगळे मायने वापरताना दिसतो. काही पत्रांवर तारीख आहे, तर काहींवर नुसताच महिना. सही करताना ‘ग़ालिब’ हे नाव सर्वसाधारणपणं तो लिहीत असे. आपलं नाव लिहिण्यापूर्वी कधी निजात का तालिब तर कधी जवाब का तालिब, असंही लिहिण्याची त्याची पद्धत होती. तर असद किंवा असदुल्लाह या नावांचा वापर ग़ालिब तफ़्ता आणि मीर मेहदी हुसैन अशा आपल्या दोस्तांना लिहितानाच करताना दिसतो. तफ़्ताला १८६५ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात त्यानं सही करण्यापूर्वी, ‘मर्ग-ए-नागाह का तालिब’, अर्थात ‘अचानक येणाऱ्या मृत्यूची वाट पाहणारा’ असंही लिहिलं आहे. तसंच पत्रावर सही केल्यावर, खाली वार आणि इंग्रजी तारीख तो लिहीत असे. वार मात्र दोशम्बा, पंचशम्बा असे तो फ़ारसी भाषेतच लिहीत असे. 
 
तफ़्ताबद्दलचं प्रेम या पत्रांमधून बघायला मिळतं. एका पत्रात ग़ालिब लिहितो, ‘आओ मिर्ज़ा तफ़्ता, मेरे गले लग जाओ, बैठो और मेरी हक़ीकत सुनो।’ तर आणि एके ठिकाणी लिहितो, ‘मेरी जान, क्या समझे हो, सब मख़लुक़ात (सर्व प्रणिमात्र) तफ़्ता और ग़ालिब के जैसे क्यों बन जाएँगे।’ तफ़्तानं दहाबारा दिवसांत पत्र पाठवलं नाही, की तो अस्वस्थ होत असे. त्यांच्यातलं नातं लोभस होतं आणि याचा प्रत्यय ग़ालिबच्या अनेक पत्रांमधून येतो. १८६२ मधील एका पत्रात तफ़्ताची तारीफ करणारा एक फ़ारसी शेर ग़ालिबनं लिहिला आहे -
मिर्ज़ा तफ़्ता के पेवास्ता बदिल जा दारद 
हर कुजा हस्त ख़ुदाया बसलामत दारश 
याचा अर्थ असा, ‘मिर्ज़ा तफ़्ताची माझ्या हृदयात अशी एक खास जागा आहे. तो जिथं राहील तिथं ईश्वर त्याला सकुशल ठेवो.’

तफ़्ताशी गमतीत संवाद साधण्याचीही ग़ालिबची धाटणी होती. डिसेंबर १८५८ मधील एका पत्राच्या उत्तरादाखल ३ जानेवारी १८५९ रोजी तफ़्ताला लिहिलेल्या एका पत्रात ग़ालिब मौजेनं लिहितो, ‘देखो साहब, ये बातें हमको पसन्द नहीं। सन् १८५८ ईसवीं के ख़त का जवाब १८५९ में भेजते हो और मज़ा ये है कि जब तुमसे कहा जाएगा तो ये कहोगे कि मैंने दूसरे ही दिन जवाब लिखा है। लुत्फ़ इसमे है कि मैं भी सच्चा और तुम भी सच्चे।’ तर आणि एकदा लिहितो, ‘मैं ये ख़त बग़ैर टिकट लगाए भेज रहा हूँ और तुम जवाब भी इसी तरह भेजना. डाक के लोग इसतरह के ख़त जल्दी पहुँचाते हैं और टिकटवाले ख़त की बारी तभी आती है जब डाकिये को उस गली में और भी ख़त लेकर जाना होता है...’ आपलं पत्र आवडत्या शिष्याला नक्की पोचावं, म्हणून ते विनातिकीट पाठवायची ही शक्कल मोठी नामी होती... 

आणखी एका पत्रात ग़ालिब लिहितो, ‘छोटा ग़ालिब है तू मेरी जान। मेरे बाद क्या करोगे? मैं तो चिराग़-ए-सुबह दम (सकाळचा, म्हणजे विझणारा दिवा) और आफ़ताब-ए-सरे कोह (डोंगरामागे लपणारा सूर्य) हूँ।’तफ़्तानं आपल्याला नियमितपणं पत्र लिहावं, असं ग़ालिबला नेहमी वाटे. कधी त्याचं पत्र आलं नाही, की तू रागावला आहेस का असं ग़ालिब त्याला पत्र लिहून विचारत असे. ग़ालिबलाप्रत्यक्ष भेटणाऱ्या मित्रांपेक्षा पत्रमित्रच अधिक होते. शिव राम ब्राह्मण आणि बालमुकुंद हे त्याचे आणखी दोन हिंदू मित्र, जे त्याला अधूनमधून भेटायला येत असत. 

ग़ालिबची कविता पुस्तकरूपात छापण्याकरिता तफ़्तानं नेहमीच मदत केली. त्याला आर्थिक साह्यही तो करत असे. तफ़्ता हा सरकारच्या महसूल विभागात अधिकारी होता. सिकंदारबादप्रमाणंच तो भरतपूर इथंही काहीकाळ वास्तव्यास होता. त्याचा एक फ़ारसी काव्यसंग्रह त्याकाळी लाहौरहून प्रकाशित झाला होता. ग़ालिब त्याच्या कविता सुधारून देत असे. तो ग़ालिबच्या परिवारातलाच एक बनला होता. आपल्या लाडक्या मिर्ज़ा तफ़्ताला उद्देशून ग़ालिबनं ऑगस्ट १८६२ मधील एका पत्रात लिहिलं आहे,‘मुझको इस पर नाज़ है कि मैं हिन्दुस्तान में एक दोस्त-ए-सादिक़ुलविला (खरा मित्र)’रखता हूँ, जिसका हरगोपाल नाम और तफ़्ता तख़ल्लुस है।’ग़ालिबच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी, १८७९ साली तफ़्ताचा मृत्यू झाला. या दोघांमध्ये बराच हास्यविनोद चालत असे. एकदा तफ़्तानं ग़ालिबचे पाय दाबून दिले आणि त्याचा मोबदला मागितला. तेव्हा ग़ालिब हसून त्याला म्हणाला, ‘तू माझे पाय दाबलेस आणि मी ते दाबून घेतले, हिशेब बरोबर झाला. झाली फिट्टंफाट।’ दिल्लीत तफ़्ताच्या ग़ालिबशी भेटीही अधूनमधून होत असत, कारण तफ़्ता कामानिमित्त इकडून तिकडं प्रवास करत असे. या भेटींचा उल्लेखही सदर पत्रांतून आढळतो. पत्र लिहिण्याचा लकडा तर अनेक पत्रांमध्ये आहे. आठवड्याला एक तरी पत्र तफ़्तानं लिहावं, असा आग्रह ग़ालिब करतो.तफ़्तावर ग़ालिबचा जीव होता. २७ डिसेंबर १८५८ रोजी (हा तर ग़ालिबचा जन्मदिवस) त्याला लिहिलेल्या पत्रात ग़ालिब म्हणतो की तू किती दिवस रुसून राहणार आहेस? या रुसव्याचं कारण तरी कळव. पत्रांवरच भरोसा ठेवून मी जगतो बाबा, असं सांगून तो पुढं लिहितो, ‘मैं इस तनहाई में सिर्फ़ ख़ुतूत के भरोसे जीता हूँ। यानी जिसका ख़त आया मैंने जाना कि वो शख़्स तशरीफ़ लाया। ख़ुदा का एहसान है कि कोई दिन ऐसै नहीं होता जो अतराफ़ (आसपास) व जवानिब से दो चार ख़त नहीं आ रहते हों, बल्कि ऐसा भी दिन होता है कि दो बार डाक का हरकारा ख़त लाता है, एक दो सुबह को और एक दो शाम को। मेरी दिललगी हो जाती है। दिन उसके पढ़ने और जवाब लिखने में गुज़र जाता है। ये क्या सबब? दस-दस बारह-बारह दिन से तुम्हारा ख़त नहीं आया यानी तुम नहीं आये। ख़त लिखो साहब! न लिखने की वजह लिखो। आधान-ए-वक़्ल (कंजूसपणा) न करो। ऐसा ही है तो बैरंग (विनातिकीट) भेजो।’ 

या लिहिलेल्या पत्रांमधून तफ़्ताच्या फ़ारसी काव्याबाबतचं आपलं मतही ग़ालिब नोंदवताना दिसतो. तर कधी फ़ारसीचं व्याकरण आणि फ़ारसी शब्दांच्या अर्थाची चिकित्सा करताना दिसतो. बारकाईनं स्पष्टीकरण देत, आपली मतं कळवतो. फ़ारसी भाषेच्या संदर्भात चिकित्सा करत तो तफ़्ताच्या लिखाणाची कधी चिरफाडही करतो.तसंच तफ़्ताच्या फ़ारसी काव्यरचनांची प्रशंसाही बरेचदा ग़ालिबनं केली आहे. फ़ारसीतील वचनं, काव्यपंक्ती यांचा वापर या पत्रांमधून विशेषकरून आहे, अगदी पानापानावर आहे. कारण तफ़्ता फ़ारसीचाही जाणकार होता.ग़ालिबला फ़ारसीची जाणकारी तर होतीच होती. त्यामुळं फ़ारसी म्हणी, वाक्प्रचार आणि कवितांचा सहज उल्लेख त्याच्या पत्रांमधून तो करत असे. तर कुठली पुस्तकं पोहोचली, ती कशी आहेत, १३ नोव्हेंबर १८५८ रोजीचं एक पत्र आपल्याला मिळालेल्या पुस्तकांचं कौतुक करण्यावर ग़ालिबनं खर्ची घातलं आहे. तफ़्ताला तो लिहितो, ‘भाई साहब, ३३ किताबें भेजी हुई बरख़ुरदार मुन्शी शिवनारायन की कल जुमे के दिन १२ नवंबर को पहुँचीं, काग़ज़ और स्याही और ख़त का हुस्न देखकर मैंने अज़ रूए यक़ीन जाना कि (खात्रीपूर्वक मला वाटलं) तोलाई (सोनेरी) काम पर ये किताबें ताऊस-ए-बिहिश्त (स्वर्गाचं सिंहासन) बन जाएँगी। हूरें इनको देखकर शरमाएँगी।’

या पत्रांमधले सारे संदर्भ नेमकेपणानं समजले नाहीत, तरी त्या काळातील अनेक गोष्टींची कल्पना येते. टपालव्यवस्थेचं समाजात असलेलं महत्त्वही समजून येतं. त्यावेळचे इंग्रज व देशी अधिकारी, त्यांच्याशी असलेला ग़ालिबचा पत्रव्यवहार व पुस्तकांची देवाणघेवाण अशा बऱ्याच बाबींवर प्रकाश पडतो. तफ़्ताला ग़ालिब आपल्या आर्थिक अडचणी, पेन्शनबद्दलच्या नवीन वार्ता हेही कळवत असे. वय वाढल्यानंतर आपण कसे निकामी होत चाललो आहोत, कसा त्रास होत असतो, हे कळवून ग़ालिब एका पत्रात स्वतःच्याच शेरमध्ये बदल करून लिहितो,
ज़ोफ़ ने ‘ग़ालिब’ निकम्मा कर दिया 
वर्ना हम भी आदमी थे काम के 

तफ़्ताला लिहिलेल्या पत्रांमधून एक जिव्हाळा दिसून येतो. तफ़्ता हा ग़ालिबचा खास लाडका. त्याला लिहिलेल्या पत्रांमधून ग़ालिबची आतली बाजू विशेषत्वानं कळून येते. त्याच्या मनात डोकावता येतं. एका महान कवीच्या अंतरंगाचा उलगडा झाल्यासारखं वाटतं...

संबंधित बातम्या