मेरा सलाम कहियो... 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

अन्दाज़-ए-बयाँ

हरगोपाल तफ़्ताप्रमाणं क़ाज़ी अब्दुलजमील ‘जुनून’ हा ग़ालिबचा शिष्य. हा वयानं ग़ालिबपेक्षा बराच लहान होता. तो सारखी पत्रं पाठवून सतावणूक करायचा आणि मग ग़ालिब त्याला कसं सुनवायचा, हे आपण मागच्या एका लेखात पाहिलंच आहे. एकदा अब्दुलजमीलनं बहुधा आधीच्या पत्रात ग़ालिबची पत्रं वेळेवर मिळत नाहीत, तसंच आपल्या पत्रांना ग़ालिब उत्तर देत नाही, अशी तक्रार केली असावी. त्यावर उत्तर देताना ग़ालिब त्याला लिहितो, ‘आपको ख़त पहुँचने में तरद्दुद (परेशानी) क्यों होता है? हररोज़ दो-चार ख़त अतराफ़ व जवानिब (आसपास व विविध ठिकाणांकडून) से आते हैं। गाह गाह (कधी कधी) अँगरेज़ी भी और डाक के हरकारे मेरा घर जानते हैं, पोस्ट मास्टर मेरा आशना (परिचित) है। मुझको जो दोस्त, ख़त भेजता है वो सिर्फ़ शहर का नाम और मेरा नाम लिखता है, मुहल्ला भी ज़रूर नहीं। आप ही इन्साफ़ करें आप ‘लाल कुआँ’ लिखते रहें और मुझको ‘बल्लीमारों’ में ख़त पहुँचता रहा।’ तू जी पत्रं खरोखरच पाठवलीस, ती मात्र मिळाली, असा टोलाही याच पत्रात ग़ालिब मारतो... तर अन्य एका पत्रात, अक्षर नीट लागत नाही, म्हणून त्याचं काव्य आपण परत पाठवत आहोत, असं ग़ालिब अब्दुलजमीलला कळवताना दिसतो. मी तुझं पत्र फाडून फेकून दिलं असं तुला वाटू नये, म्हणून मूळ पत्र पाठवत आहे, असंही वर ग़ालिब या पत्रात लिहितो... 

ग़ालिबनं अशी टिंगल केली, तरी अब्दुलजमीलनं पत्रं लिहिणं थांबवलं नाही. त्यांच्यातल्या पत्रव्यवहारात अधूनमधून स्वरचित कवितांवरील ग़ालिबच्या स्पष्टीकरणांचा समावेश आहे. त्यामुळं एक वेगळाच आनंद वाचकाला मिळतो. क़ाज़ी अब्दुलजमील ‘जुनून’ हा रायबरेलीत १८३५ मध्ये जन्मला. तो ग़ालिबचा शिष्य होता. इंग्रजी राजवटीत त्याला ‘ख़ानबहुर’ ही उपाधी मिळाली होती. त्याला लिहिलेली ३० पत्रं या संकलनात आहेत. एकदा या अब्दुलजमीलनं ग़ालिबला एक शेर पाठवला, जो त्याला कुणीतरी ग़ालिबचा म्हणून सांगितला होता. त्याबद्दल लिहिताना ग़ालिब स्पष्ट कळवतो की अरे बाबा, हा माझा शेर नाही. माझ्या नावे असे कित्येक शेर अनेकदा फिरत असतात, क्वचित छापूनही येतात. ग़ालिब पूर्वी ‘असद’ या नावानं लिहीत असे, त्या नावानं तर बरेचदा इतरांचे शेर ग़ालिबचे म्हणून छापून येत. त्यातले दोन शेर देऊन ग़ालिब जमीलला लिहितो, की हा शेर ज्याचा आहे, त्याला तो लखलाभ होवो, तो जर मी लिहिला असेल, तर धिक्कार असो माझा. ‘असद’ नाव आहे, म्हणजे तो माझा शेर असं लोक का समजतात, ते आपल्याला कळत नाही, असं ग़ालिब लिहितो. खरं तर कुण्या एका सामान्य कुवतीचा शायर असलेल्या ‘असद’ची शायरी म्हणजे आपली शायरी, असं लोक समजतात हे लक्षात आल्यावर ग़ालिबनं आपलं आपलं ते तख़ल्लुस वापरणं कधीच बंद केलं होतं. तरीही अशा गफलती होत असत... 

अब्दुलजमीलनं ग़ालिबला त्याच्या काही शेरांचा अर्थ उलगडायला सांगितला, तेव्हा ग़ालिबनं लिहिलेली स्पष्टीकरणं अप्रतिम आहेत. त्यातला एक शेर असा, 
लेता न अगर दिल तुम्हें देता कोई दम चैन 
करता जो न मरता कोई दिन आहों फ़ुगाँ और 

या शेरसंबंधी ग़ालिब सांगतो, की यातल्या ‘लेता’ शब्दाचा संबंध ‘चैन’शी आहे, तर ‘करता’चा ‘आहों फ़ुगाँ’शी. थोडक्यात काय, तर ‘अगर दिल तुम्हें न देता तो कोई दम चैन लेता, अगर न मरता तो कोई दिन और आहो फ़ुगाँ करता।’ पुढचा शेर होता,
मिलना नहीं तेरा आसाँ तो सहल है 
दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नहीं 

या ओळींविषयी ग़ालिब कळवतो, ‘यानी अगर तेरा मिलना आसान नहीं तो ये अम्र मुझ पर आसान है। ख़ैर तेरा मिलना आसान नहीं, न सही, न हम मिल सकेंगे न कोई और मिल सकेगा। मुश्किल तो ये है कि वही तेरा मिलना दुश्वार भी नहीं। जिससे तू चाहता है मिल भी सकता है। हिज़्री (वियोग) को तो हमने सहल समझ लिया था मगर रश्क (ईर्ष्या) वो अपने ऊपर आसान नहीं कर सकते।’ 
आणखी एक शेर असा होता, 
तुझ से तो कुछ कलाम नहीं लेकिन ऐ नदीम 
मेरा सलाम कहियो अगर नामा-बर मिले 

अर्थ असा, ‘मित्रा, तुझ्याबद्दल काहीच म्हणायचं नाही मला, पण तुला जर तो पत्रवाहक भेटला, तर त्याला माझा सलाम सांग.’ याचं स्पष्टीकरण देताना ग़ालिब म्हणतो, ‘सुरुवातीला याविषयाची पार्श्वभूमी सांगायला हवी. काय झालं, की एकदा एका प्रेमिकाला पत्रदूताची गरज पडली. पण पेच असा होता की प्रियेवर तोच अनुरक्त होता नये. या प्रेमी मनुष्याचा एक मित्र एकाला घेऊन आला आणि म्हणाला, हा माणूस अगदी विश्वसनीय आहे, हा असं काही करणार नाही याबद्दल मी जामीन राहतो. मग त्याच्या हाती पत्र पाठवलं गेलं. पण दुर्दैवानं या प्रेमी मनुष्याची शंका खरी ठरली. जिला पत्र लिहिलं, त्या व्यक्तीला पाहून तो वेडा झाला. मग कुठलं पत्र नि कुठलं त्याचं उत्तर. वेडा होऊन तो अंगावरचे कपडे फाडून जंगलाकडे निघून गेला. आता या घटनेनंतर हा आशिक आपल्या मित्राला म्हणत आहे, की काय घडलं ते देवालाच ठाऊक. एखाद्याच्या मनातलं गुपित कसं काय समजणार? मित्रा, तुझ्याबद्दल काही तक्रार नाही माझी. पण तो पत्रवाहक जर तुला भेटलाच, तर त्याला माझा सलाम सांग आणि विचार की बाबा रे, प्रेमिक न बनण्याचे कसले कसले दावे तू करत होतास आणि काय करून गेलास...’ गमतीशीर असं हे सारं लेखन आहे. 

ग़ालिबच्या एका ग़ज़लचा हा मतला, म्हणजे प्रारंभिक शेर आहे, त्याचा अर्थही अब्दुलजमीलनं विचारला होता, 
कोई दिन गर ज़िन्हगानी और हो 
 अपने जी में हमने ठानी और है 

याबद्दल ग़ालिब लिहितो, ‘इसमें कोई इश्काल (कठीण) नहीं। जो लफ़्ज़ हैं वही मानी हैं। शायर अपना कस्द क्यूँ बताए कि मैं क्या करूँगा? मुबहम कहता है कि कुछ करूँगा। ख़ुदा जाने शहर में या नवाहे शहर में तकिया बनाकर फ़कीर होकर बैठा रहे, या देस छोड़ परदेस चला जाए।’ 

हरगोपाल तफ़्ता जसा ग़ालिबचा लाडका होता, तसाच त्याचा आणखी एक आवडता शिष्य म्हणजे मीर मेहदी हुसैन ‘मजरूह.’ तो दिल्लीचा, पण १८५७ च्या धामधुमीत दिल्ली सोडून पानिपतला जाऊन राहिला होता. काही काळ त्यानं लवार संस्थानात नोकरी केली. तिथून तो रामपूरला गेला. त्याचा एक ग़ज़लसंग्रह प्रकशित झाला होता. याला ग़ालिबनं लिहिलेली एकूण ५० पत्रं या संग्रहात आहेत. ही सारी पत्रं विशेष प्रेमानं आणि आपुलकीनं भरलेली आहेत. साध्या आणि अनौपचारिक शैलीत ती लिहिली आहेत. त्याला उद्देशून ग़ालिब एका पत्रात आस्थेनं लिहितो, ‘अहाहा, मेरा प्यारा मीर मेहदी आया। आओ भाई, मिज़ाज तो अच्छे हैं। बैठो, ये रामपूर है।’ मीर मेहदीच्या कुटुंबाला ग़ालिब ओळखत होता आणि त्यांच्या ख्यालीखुशालीविषयीचा मजकूरही या पत्रांमध्ये दिसतो. 

कंपनी सरकारची दिल्लीवरची पकड १८५७ नंतर घट्ट होत गेली, त्याबद्दल ग़ालिबनं आपल्या मित्रांना व शिष्यांना पत्रांमधून अनेकदा लिहिलं आहे. त्यावेळची परिस्थिती आणि तिची भयावहता, सामान्यांना होणारा त्रास, विस्कटलेलं वास्तव याबद्दल मीर मेहदी हुसैन याला लिहिताना २ डिसेंबर १८५९ च्या पत्रात तो म्हणतो, ‘भई, क्या पूछते हो? क्या लिखूँ? दिल्लीकी हस्ती मुन्हसिर कई हंगामों पर थी। - क़िला, चाँदनी चौक, हर रोज़ा बाज़ार मस्जिदे जामा का, हर हफ़्ते सैर जमुना के पुल की, हर साल मेला फूलवालों का। ये पाँचों बातें अब नही। फिर कहो - देहली कहाँ...’ 

एकदा मीर मेहदी हुसैनला लिहिलेलं पत्र दुसऱ्या कुणा मीर मेहदीला पोचतं, त्याबद्दल त्यानं कळवलं. त्यावेळी उत्तरादाखल ग़ालिबनं गमतीदार शब्दांत लिहिलं, 
‘कुसूर तुम्हारा ही है। क्यूं ऐसे शहर में रहते हो, जहाँ दूसरा मीर मेहदी भी हो। मुझको देखो। मैं कब से दिल्ली में रह रहा हूँ, न कोई अपना हमनाम होने दिया, न कोई अपना हम उर्फ़ बनने दिया...’ 

ग़ालिबचं पेन्शन हा त्याच्या मित्र व शिष्यांसाठीही चिंतेचा विषय होता. तसा तर स्वतःच्या पेन्शनविषयी ग़ालिब, मीर मेहदीला नेहमी लिहीत असे, तरी तो बरेचदा विचारणा करत राही. मग एकदा ग़ालिबनं त्याला लिहिलं, ‘तुमको पिन्सन की क्या जल्दी है? हर बार पिन्सन को क्यूँ पूछते हो? पिन्सन जारी हो, और मैं तुमको इत्तिला न दूँ? अभी तक कोई हुक़्म नहीं। देखूँ क्या हुक़्म हो और कब हो?’ 

आपल्या पेन्शनचा सारा इतिहासही मीर मेहदीला एका पत्रातून ग़ालिबनं लिहिला आहे. एकसारखं पेन्शनबाबत सरकारशी पत्रव्यवहार करणं, कधी सरकारनं मागवलेल्या माहितीची पूर्तता करणं अशा गोष्टींचे तपशीलही यात आहेत. एवढं करूनही ग़ालिबला अखेरपर्यंत हक्काचं पेन्शन इंग्राजांकडून मिळालंच नाही. त्यामुळं आपल्या काव्याचं पुस्तक छापून घेणं त्याला जमत नव्हतं. या संदर्भात मीर मेहदीनं विचारलं, तेव्हा आर्थिक अडचणींमुळं खायची पंचाईत तिथं माझं पुस्तक कसं छापून घेणार, असंही ग़ालिब त्याला उत्तरादाखल लिहितो. १८५८-५९ च्या दरम्यानच्या पत्रांमध्ये १८५७ च्या क्रांतीचे परिणाम आणि अनेकांना झालेली अटक वगैरेंबद्दलची बरीच माहिती ग़ालिबच्या पत्रांमधून मिळते. त्या वातावरणाचं वर्णन करताना ग़ालिबनं मीर मेहदीला एका पत्रात शेर लिहिला, 
रोज़ इस शहर में एक हुक़्म नया होता है 
कुछ समझ मे नहीं आता है कि क्या होता है। 

पत्रातून मनातलं बोलून टाकण्याचा ग़ालिबचा स्वभाव होता. आपल्या मित्रांना व शिष्यांना पत्रं लिहिणं हाच काय तो त्याच्यासाठी दिलासा होता. एका महान कवीच्या मनातले तरंग या पत्रांमधून अनुभवायला मिळतात. त्याच्या आसपासचा परिसर भेटतो आणि तो काळ डोळ्यांसमोर उभा राहतो...

संबंधित बातम्या