नाउम्मीदी उसकी देखा चाहिए 

नंदिनी आत्मसिद्ध 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

अन्दाज़-ए-बयाँ

ग़ालिबच्या काव्याइतकाच आनंद त्याची पत्रं देतात. हे लेखन बरचसं मनमोकळं आहे. जो कवी दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेला, त्याच्या मनात डोकावण्याची संधी ही पत्रं देतात. त्या काळच्या जीवनरहाटीची, घडामोडींची झलकही यात मिळते आणि तत्कालीन साहित्यजगतात काय घडत होतं, पुस्तकं छापण्याची प्रक्रिया कशी होती वगैरे गोष्टींवरही प्रकाश पडतो. 

ग़ालिबनं स्वतःच्या कवितांच्या संदर्भात लिहिलेलं भाष्य वा स्पष्टीकरण वाचताना तर खूपच आनंद वाटतो. त्यानं ज्यांना पत्रं लिहिली, अशा व्यक्ती खूप होत्या. काहींची पत्रं मिळू शकली नाहीत, तर काहींची पत्रं नंतरच्या टप्प्यावर मिळाली आणि त्यांचाही समावेश त्याच्या पत्रसंग्रहात झाला. अशांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे मुन्शी नबीबख़्श ‘हकीर’. हकीर हा आग्र्याचा निवासी होता आणि बालपणापासून ग़ालिबशी त्याची ओळख होती. तो कोर्टात शिरस्तेदार म्हणून कामास होता आणि यानिमित्तानं अलीगढमध्ये राहिला होता. नंतर मात्र तो आग्रा इथंच स्थायिक झाला. १८६० मध्ये त्याचं निधन झालं. त्याची पत्रं आधीच्या आवृत्त्यांमधून प्रकाशित झाली नव्हती. ती ‘नादिरात-ए-ग़ालिब’ या कराचीहून १९४९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संग्रहात प्रथम छापून आली. हकीरशीही ग़ालिबचं जवळचं मैत्र होतं. त्याला ग़ालिबनं लिहिलेली ७० पत्रं या संग्रहात आहेत. या साऱ्या पत्रांमधून स्वतःची सुखदुःखं आणि इतर गोष्टी त्यानं आस्थेनं लिहिल्या आहेत. दिल्लीतली परिस्थिती, साथीच्या रोगांनी त्रस्त झालेलं दिल्ली शहर अशा बाबींचीही माहिती त्यात मिळते. अलीगढच्या कौल किंवा कोल या जुन्या नावाचा उल्लेखही ग़ालिब लिखाणात करताना दिसतो. कधी स्वतःची दातदुखी, तब्येतीच्या तक्रारी याविषयीही ग़ालिब लिहितो. दिल्लीच्या शाही दरबारात दर महिन्याला १५ आणि २९ तारखेला मुशायरा होत असतो, त्यात एक मिस्रा फ़ारसीचा व एक उर्दूचा दिला जातो आणि त्यांचा वापर करीन रचना सादर करायची असते, असं १८५३ मधील एका पत्रात ग़ालिब कळवतो. तसंच फ़ारसीतली या मिसऱ्याची आपली कविताही लिहितो. एकूणच हकीरला ग़ालिब आपल्या अनेक संपूर्ण कविता लिहून कळवताना दिसतो. 

हकीरच्या कुटुंबातही ग़ालिब नेहमी चौकशी करताना दिसतो. अलीकडच्या दिवसांत दिसतं, की मुलगा सातेक वर्षांचा झाला नाही, तोच त्याला रमज़ान महिन्यात रोज़ा पाळायला लावतात, असा तक्रारीचा सूरही एका पत्रात ग़ालिब लावतो. तू मात्र मुलगी दहाएक वर्षांची झाल्यावरच तिला रोज़ा पाळायला सांग, असं तो हकीरला बजावून लिहितो. एका पत्रात ग़ालिब लिहितो, की माझा पुतण्या आणि पुतणी कसे आहेत ते कळव. हकीरनं आपल्या मुलांबद्दल ग़ालिबला आधीच्या पत्रात कळवलं असणार. त्यावर ग़ालिब लिहितो. ‘पहले ख़त से मालूम हुआ था कि वो दवात-क़लम लेकर अलग बैठती है और लड़ती है तो कहती है कि मैं मिर्ज़ासाहब के यहाँ चली जाऊँगी। अब आप उसे मिर्ज़ासाहब कहना मौक़ूफ़ करवाइए। उससे मुझको चचा कहवाया कीजिए।’ ग़ालिबचं एक वेगळंच प्रेमळ, घरेलू रूप यात बघायला मिळतं... 

याच पत्रात तो आपला लाडका शिष्य तफ़्ता याच्याबद्दलही लिहितो. तफ़्ताला राजाकडं नोकरी मिळत असूनही तो ती करायला राजी नाही हे कळल्यावर ग़ालिब हकीरला लिहितो, ‘तफ़्ता का हाल मालूम हुआ। हमने भी बादशाह की नौकरी की थी। वो हमारे शागिर्द हैं। क्योंकर राजा की नौकरी न करते? सुनो भाई बात वो है जो तुम कहते हो। तफ़्ता को नौकरी से अपने जानो तन की परवरिश मंज़ूर नहीं, दीवान के छपने की फ़िक़्र है। क्या करूँ, दस्तगाह (सामर्थ्य) नहीं और बेमक़दूर हूँ। वर्ना क्या सौ-दो सौ से तफ़्ता की इआनत (साह्य) न करता।’ 

मुग़लांचा इतिहास ग़ालिब लिहीत होता, त्याचा प्रवास कुठवर आला, त्याबद्दल हकीरला तो कळवताना म्हणतो की मी हे लिहून कंटाळून गेलो आहे. हुमायूनबद्दल लिहून झालं, पण अकबराबाबतच्या लिखाणाला तर अजून सुरुवातही केलेली नाही...
स्वतःच्या जीवनातील अडचणींनी ग्रासलेला ग़ालिब अनेक पत्रांमधून हकीरला आपलं दुःख सांगताना या पत्रांतून भेटतो. ६ जानेवारी १९५० या तारखेच्या पत्रात पत्रोत्तर द्यायला उशीर झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो व लिहितो, ‘तुम्हारे एक ख़त का जवाब मुझ पर कर्ज़ है, क्या करूँ? सख़्त ग़मज़दा और मलूल रहता हूँ। मुझको अब इस शहर की इक़ामत (वास्तव्य) नागवार है। और मवाने और अवायक़ (अडचणी) ऐसे फ़रहम हुए हैं कि निकल नहीं सकता। ख़ुलासा मेरे रंज व अलम का (दुःख-वेदना) ये है कि मैं अब सिर्फ़ मरने की तवक़्क़ो पर जीता हूँ। हैहात - 
मुन्हसिर मरने पै हो जिसकी उम्मीद 
नाउम्मीदी उसकी देखा चाहिए’ 
आसपासच्या गोष्टींबद्दल लिहिताना, कधी मित्राच्या व  निधनाबद्दलही लिहावं लागतं. २१ मे १९५२च्या पत्रात ग़ालिब हकीरला शायर मोमिनखाँ मोमिनच्या निधनाबद्दल कळवतो. ग़ालिबपेक्षा तीनेक वर्षांनी लहान असलेला मोमिन तसा लवकर गेला. ‘तुम मेरे पास होते हो गोया, जब कोई दूसरा नहीं होता’ या शेरसाठी मोमिनची आजही ख्याती आहे. ग़ालिब स्वतः मोमिनचा आणि या त्याच्या शेरचा निस्सीम चाहता होता. मोमिनविषयी ग़ालिब हकीरच्या पत्रात अतिशय आस्थापूर्वक आणि हळुवारपणं लिहितो, ‘सुना होगा तुमने कि मोमिनखाँ मर गए। आज उनको मरे हुए दसवाँ दिन है। देखो भाई हमारे बच्चे मर जाते हैं। हमारे हम अुम्र मर जाते हैं। काफ़िला चला जाता है और हम पा दर रिकाब बैठे हैं। मोमिनखाँ मेरा हम अश्र (समकालीन) था और यार भी था। बयालीस-तैतालिस बरस हुए, याने चौदह-पन्द्रह बरस की मेरी और उस मरहूम की उम्र थी कि मुझमें उसमें रब्त पैदा हुआ। इस अर्से में कभी किसी तरह का रंज ओ मलाल दरमियान  
नहीं आया। हज़रत चालीस बरस का दुश्मन भी नहीं पैदा होता। दोस्त तो कहाँ हाथ आता है।’ 

बहादूरशाह ज़फ़रच्या दरबारातला राजकवी मोहम्मद इब्राहीम ‘ज़ौक़ हा खूप लोकप्रिय होता आणि बादशाहदेखील त्याला मानत असे. शायरीच्या क्षेत्रात ज़ौक़चा तो शागिर्दच होता. ‘लायी हयात आए क़ज़ा ले चली चले। न अपनी ख़ुशी आए ना अपनी ख़ुशी चले’ यासारख्या ज़ौक़च्या रचना अप्रतिम आहेत. तो आणि ग़ालिब यांचं फारसं सख्य नव्हतं. ज़ौक़ ग़ालिबच्या लोकप्रियतेमुळं अस्वस्थ असे. ग़ालिबही आपल्या रचनांमधून ज़ौक़ला टोमणे मारत असे. अर्थात ग़ालिब नेहमीच इतरांच्या टोप्या उडवण्याची संधी घेत असे. त्याचा तो स्वभावच होता. ज़ौक़चं निधन १६ नोव्हेंबर १८५४ रोजी झालं. त्यानंतर २३ नोव्हेंबरला हकीरला लिहिलेल्या पत्रात ग़ालिबनं म्हटलं आहे, ‘यहाँ का हाल ताज़ा ये है कि मियाँ ज़ौक़ मर गये। हुज़ूरेवाला ने ज़ौक़े शेर व सुख़न तर्क किया। सच तो ये है कि ये शख़्स अपनी वज़ा का एक, और इस अस्र (युग) में ग़नीमत था।’ 

ग़ालिब हकीरला आपल्या रचना पाठवत असे आणि या काव्याविषयीच्या हकीरच्या शंकांचं निरसनही करत असे. आपल्या ‘नुक़्ताचीं है ग़म-ए-दिल उसको सुनाए न बने’ या ग़ज़लमधल्या एका शेरबद्दलचं स्पष्टीकरण हकीरला पत्रातून ग़ालिब लिहितो. शेर असा - 
मौत की राह न देखूँ, कि बिन आए न रहे 
तुमको चाहूँ, कि न आओ तो बुलाए न बने 

ग़ालिब या शेरविषयी लिहिताना जी शैली वापरतो, तीही छान आहे. त्याच्या लिखाणात आलेली बोलचालीची शैली, त्यातली सहजतेची झाक वाचताना जाणवत राहते. विशेषतः ‘देखूँगा ही’ ऐवजी तो ‘देखूँ ही गा’ लिहितो, ते गमतीशीर वाटतं. ग़ालिब म्हणतो, ‘मौत की राह न देखूँ, क्यों न देखूँ? मैं तो देखूँ ही गा, कि, बिन आए न रहे। क्योंकि मौत की शान में से ये बातें है कि एक दिन आए ही गी। इन्तिज़ार ज़ाया न जाएगा। तुमको चाहूँ? क्या ख़ूब? क्यों चाहूँ कि न आओ तो बुलाए न बने। यानी अगर तुम आपसे आए तो आए और अगर न आए तो फिर क्या मजाल कि कोई तुमको बुला सके। गोया ये आजिज़ माशुक से कहता है कि अब मैं तुमको छोड़ कर अपनी मौत का आशिक हुआ हूँ। इसमें ये ख़ूबी है कि बिन बुलाए, बग़ैर आए नहीं रहती। तुमको क्यों चाहूँ कि अगर न आओ तो तुमको बुला न सकूँ। बात ये है कि पढ़ने में चाहूँ, कि, न आओ- ये जुमला मिला हुआ समझ में आता है तो आदमी हैरान होता है। तुमको चाहूँ, अलग है कि न ओ तो बुलाए न बने - ये जुमला अलग है, तुमने ग़ौर नहीं की वर्ना ख़ुद बख़ुद कैफ़ियत इस तारीज़ व इस्तिफ़हाम (आक्षेप व जिज्ञासा) की हासिल हो जाती।’ 

आपल्या एकूण जगण्यातल्या त्रासांपायी कधी विटलेला ग़ालिब मनातली हताशा आणि निराशा यांना वाट करून देतो. हकीरलाही तो आपल्या मनातल्या या भावना बोलून दाखवतो. वयाची साठी गाठायच्या आधीच ग़ालिबला आपल्या आयुष्यात यापुढं फार काही आशादायक घडणार नाही, हे कळून चुकलं होतं. अगदी १८५७ ची धामधूम व नंतरची बदललेली परिस्थिती येण्यापूर्वीच त्याला आयुष्यातली दगदग सहन होत नव्हती... हकीरला २४ सप्टेंबर १८५५ रोजी ग़ालिब लिहितो, ‘कोई दम ऐसा नहीं कि मुझको दमे वापसी का ख़याल न हो। साठ बरस का हो चुका, अब कहाँ तक जीऊँगा। ग़ज़ल, क़सीदा, क़ता, रुबाई फ़ारसी-उर्दू में बारह हज़ार बैत कह चुका, अब कह चुका। अब कहाँतक कहूँगा। ज़िन्दगी बुरी-भली जिस तरह बनी काटी, अब फ़िक़्र ये है कि देखें मौत कैसी होती है और बाद मौत के क्या दरपेश आता है--’ 
अुम्र भर देखा किये मरने की राह 
मर गये पर देखिए दिखलाए क्या

संबंधित बातम्या