होगा कोई ऐसा?... 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

शायरीतून जीवनभाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असणारा ग़ालिब विनोदी आणि उपरोधिक बोलण्यासाठीही ओळखला जातो. पण त्याच्या विनोदात दुसऱ्याला कमी लेखणं, त्याचा जाणूनबुजून अपमान होईल, अशी टिंगल करणं हा प्रकार नव्हता. मात्र बोलताना दुसऱ्याची टोपी उडवण्याचा त्याला छंद होता आणि बादशाहही यापासून सुटत नसे. पण ग़ालिबची ही गुस्ताख़ी त्याच्या दिलदार स्वभावामुळं माफ केली जाई. जगभरात शेक्सपिअर आणि बर्नार्ड शॉ हे महान साहित्यिकही विनोदासाठी ओळखले जातात. पण त्यांच्या विनोद व उपरोधातील बोचरेपणा ग़ालिबमध्ये नव्हता. तो स्वतः खिलाडू वृत्तीचा होता आणि स्वतःच्या दोषांवर आणि अवस्थेवर तो नेहमीच विनोद करत असे. त्याच्या पुढील ओळी याची साक्षच आहेत. त्यात तो स्वतःच्या बदनामीचा उल्लेख करून म्हणतो, की ग़ालिबला कोण ओळखत नाही? उत्तम कवी असूनही तो बदनाम आहे... 

होगा कोई ऐसा कि ‘ग़ालिब’ को न जाने 
शायर तो वो अच्छा है पै बदनाम बहुत है 

स्वतःच्या शायरीचा अभिमान असला, तरी त्या मस्तीत आपली सामान्य आर्थिक स्थिती त्यानं कधी लपवली नाही. समाजातल्या दोषांवर नेहमी बोट ठेवलं आणि ते करताना धर्मातील चुकीच्या गोष्टींवर टीका केली. धर्ममार्तंडांना नावं ठेवली. त्याच्या काव्यातूनही अनेकदा सूचक असा सामाजिक संदेश दिसून येतो. उपरोध, विनोद, कोटी यातून तो आपल्याला काय सांगायचं आहे, ते सांगत असे. मानवी स्वभावाची त्याला चांगली जाण होती. त्याचं काव्य नीट अभ्यासलं, तर त्यात बरेच शेर धार्मिकतेच्या अवडंबरावर, दिखाऊपणावर आणि कालबाह्यतेवर केलेली सूचक व उपरोधिक टीका आढळते. धर्माचं मर्म - प्रार्थना तसंच उपवासादी प्रथा पाळण्यात नसून, या साऱ्या वरवरच्या गोष्टी आहेत, असा संदेश तो शायरीतूनही वेळोवेळी देत असे. एका चतुष्पदीत तो म्हणतो-

इफ़्तार-ए-सूम की कुछ अगर दस्तगाह हो 
उस शख़्स को ज़रूर है रोज़ा रखा करे 
जिस पास रोज़ा खोलकर खाने को कुछ न हो 
रोज़ा अगर न खाए तो नाचार क्या करे 

अर्थात, ‘ज्यांच्यापाशी संध्याकाळी इफ़्तारच्या वेळी उपवास सोडताना खाण्याची रेलचेल आहे, अशांनी खुशाल रोज़ा पाळावा. पण ज्याच्याकडं रोज़ा (उपवास) सोडताना खायलाच काही नाही अशा एखाद्याला, त्यानं जर रोज़ाच खाऊन टाकला-तर त्याला माफ करावं.’ 

सारं काही ईश्वराच्या इच्छेनुसार होतं, असं म्हणतात. या संदर्भात बिनतोड युक्तिवाद करणारा ग़ालिबचा एक शेर गमतीशीर आहे. त्यात तो म्हणतो, ‘देवदूतांनी नशिबात लिहिलं त्याप्रमाणं घडत गेलं, तरी त्याची शिक्षा निष्कारण आम्हालाच होते. ते लिहिताना आमच्या बाजूनं कुणी होतं का?’ 

पकड़े जाते हैं फ़रिश्तों के लिखे पर नाहक़ 
आदमी कोई हमारा दम-ए-तहरीर भी था 

आयुष्याच्या उत्तरार्धात ग़ालिबचं पत्रलेखन विशेष मनमोकळं झालं. तोवर त्याला जगण्यातल्या अनुभवांमुळं एक परिपक्वताही आली होती. त्याचा विनोद आणि कोटीबाजपणाही खास टोकदार झाला. तसंच गरिबी आणि भेदभावाचे बसलेले चटके, पेन्शनची लटकती समस्या, १८५७ नंतर पाहिलेला हिंसाचार, त्यात गमावलेले आप्तस्वकीय यामुळं त्याचा विषादही वाढला होता. अशावेळी त्याला या स्वतःवर हसण्याच्या स्वभावानंच वाचवलं. तसंही आयुष्याकडं एका तटस्थ वृत्तीनं पाहायला तो शिकत गेला होता. म्हणूनच एखादा अपवाद वगळता, जीवनापासून दूर जाण्याचा पलायनवाद त्याच्या शायरीत वा स्वभावात उतरलेला दिसत नाही. त्याला तोवर जवळचे मित्रही मिळाले होते, ज्यांच्यापाशी तो मनातलं बोलू शकत होता. सुरुवातीच्या काळात जेव्हा तो फ़ारसीतून पत्रव्यवहार करत असे, त्यात ही गंमत नव्हती. त्यात चर्चा आणि साहित्यिक स्वरूपाचा मजकूर अधिक असे. आयुष्याबद्दलची त्याची नाराजी विनोदाच्या अवतारात बदलून गेली होती. आपली व्यथावेदना व्यक्त करतानाही त्याच्या लिखाणात जीवनाच्या आपरिहार्यतेची जाणीव उफाळून येई. मीर सरफ़राज़ याला लिहिलेल्या पत्रात ग़ालिब आपल्या एकटेपणाबद्दल, दूर गेलेल्या मित्रांबद्दल लिहितो आणि पुढं विषयाला वेगळंच वळण देत तो म्हणतो, ‘हे ईश्वरा! हजारो मृतांसाठी आक्रोश करणारा असा मी. जेव्हा मीच मरेन, तेव्हा माझ्यासाठी रडणारं इथं कोण असेल? अरे ग़ालिब, ऐक. कशाला हा शोक आणि रुदन, चल जरा प्रेमाविषयी, मैत्रीबद्दल बोलू.’

मुन्शी हकीरला लिहिलेल्या एका पत्रात ग़ालिब आपल्या एका मावशीच्या मृत्यूबद्दल लिहिताना जरा विनोदी पद्धतीचं वळण देतो. हकीरचंही कुणी जवळचं गेलं होतं आणि त्याचं सांत्वन करून ग़ालिब लिहितो, ‘मीही माझ्या एका मावशीला पारखा झालो बुधवारच्या दिवशी. ती मला बालपणापासून आईसारखीच होती आणि तीही मला मुलाप्रमाणंच मानत असे.. आणि एक सांगतो तुला, परवाच माझी नऊ माणसं मरण पावली. तीन मावश्या, तीन काका, एक वडील, एक आजी आणि एक आजोबा. म्हणजे असं की, या मावशीच्या अस्तित्वामुळंच हे नऊजण हयात होते, हे मला समजलं होतं आणि तिच्या मृत्यूनंतर हे नऊजणसुद्धा मरण पावल्याचं माझ्या अचानक लक्षात आलं.’ 

मिर्ज़ा क़ुर्बान अली बेगखाँ ‘सालिक’ला लिहिलेल्या पत्रात स्वतःविषयी ग़ालिब काय लिहितो बघा - ‘इथं ख़ुदाकडूनच काही अपेक्षा नाहीत, तर माणसाकडून कशाला असतील? काहीच काम होत नाही आणि मी फक्त स्वतःचाच प्रेक्षक होऊन गेलो आहे. दुःख आणि अपमानांची मजा लुटतो. मी स्वतःला परकाच कुणी मानतो आणि मला काही दुःख वा त्रास झाला, तर म्हणतो, चला बरं झालं. ग़ालिबला आणखी एक खेटर बसलं. खूप गर्व करत होता, शायर आणि फ़ारसी विद्वान असल्याचा! आपला कुणी प्रतिस्पर्धी नाही, असं समजत.. होता. घे, आता. कर्जदात्यांना तोंड दे. खरं तर हे आहे की, ग़ालिब कसला मेला, एक धर्मभ्रष्ट, नास्तिक मेला...’

या त्याच्या लिखाणात ग़ालिबचा कोलमडलेला अहंकार जाणवतो. स्वतःच्या स्वभावावर, दुखऱ्या जागांवर त्यानं ही बोचरी, तिखट आणि व्यंग्यात्मक शेरेबाजी केली आहे. त्यामागं एक तऱ्हेचा मानसिक ताण, एक सुप्त वेदनाही आहे. 

ग़ालिबला आंबे खूप आवडत, याचा उल्लेख यापूर्वीही झाला आहे. आपल्या एका मित्राला पत्रातून तो लिहितो, ‘तू सुरतहून मला पाठवावंस असं काही मी सांगू शकत नाही. तिथं असं काय आहे, जे इथं मिळणार नाही? शंकाच नाही, की मला आंबे फार आवडतात. पण ते सूरत आणि मुंबईहून इथं सुरक्षितपणे कसे काय पोचतील? इथं मालदा तसंच पेवंदी व विलायती हे आंब्याचे प्रकार माहीत आहेत. ते खरंच खूप छान असतात आणि सुरतेत ते नक्कीच आणखीच चांगले असतील. पण, तू तिथून ते दिल्लीला पाठवायला बराच खटाटोप करशील असं दिसतं. एक रुपयाचे आंबे पाठवायचा खर्च चार रुपये येईल आणि तरीही शंभरातले बहुधा दहाच इथं सुस्थितीत येतील. आंबे पाठवण्याची कल्पना सोडूनच दे. इथं सर्व प्रकारचे चवदार आंबे मिळू शकतात. रामपूरचे नवाब मला बरेचदा त्यांच्या बागेतले उत्कृष्ट आंबे पाठवत असतात. मी हे लिहीत असतानाच, बरेली इथल्या एका मित्रानं पाठवलेल्या आंब्याच्या दोन करंड्या आल्या बघ. त्या डोळ्यांदेखत उघडल्या, तर २०० पैकी फक्त ८३ तेवढे चांगले निघाले.’ एकदा मित्रमंडळींमध्ये असताना आंब्याचा विषय निघाला, तेव्हा आंब्यात कोणती वैशिष्ट्यं असावीत याची चर्चा चालली होती. ग़ालिबलाही त्याचं मत विचारण्यात आलं. तर ग़ालिब म्हणाला, ‘सगळ्याच आंब्यांमध्ये दोन गुण जरूर असावेत - ते गोड असावेत आणि भरपूरही...’ 

ग़ालिबला मानवी नात्यांविषयी आस्था होती. कुणाला दुखावणारं असं काही तो सहसा बोलत नसे. एखादा मित्र किंवा शिष्य जर काही मनाला दुखावणारं बोलला, तर तो आपला राग किंवा नाराजी विनोदाच्या अंगानं व्यक्त करे. एकदा असं झालं, की नवाब अन्वर उद्दौला याला कुणीतरी चुकीनं सांगितलं की ग़ालिब मरण पावला. नवाबाचा ग़ालिबशी बराच काळ संपर्क आलेला नव्हता. नंतर जेव्हा त्याला समजलं, की ग़ालिबच्या मृत्यूची बातमी खोटी होती, तेव्हा त्यानं ग़ालिबला पत्र लिहिलं आणि या अफवेचा उल्लेख त्यात केला. ग़ालिबनं त्यावर अशी टिप्पणी लिहून पाठवली, ‘या तुमच्या चौकशीबद्दल मला बलिदानच करावं वाटतं. तुम्ही जोवर माझ्या मृत्यूबद्दल ऐकलं नव्हतं, तुम्ही माझी विचारपूस केली नव्हती.’ 

ग़ालिबचा शिष्य व चरित्रकार अल्ताफ़ हुसैन हालीनं एक आठवण दिली आहे. ज़ौक़ हा दरबारी कवी ग़ालिबचा प्रतिस्पर्धी होता. एक दिवस एका मैफलीत ज़ौक़ सौदा या उर्दू शायराची प्रशंसा करत होता आणि ग़ालिब मीर या कवीच्या बाजूनं बोलत होता. त्यावेळी ग़ालिबनं शेरा मारला, ‘मला वाटतं होतं तुम्ही मीरी आहात. पण आता समजतंय की तुम्ही तर सौदाई आहात...’ ‘सौदाई’ शब्दाचा अर्थ पागल, वेडा असाही होतो. यात कवीच्या नावावरून ग़ालिबनं श्लेष साधला आणि ज़ौक़ला निरुत्तर केलं... एकदा ग़ालिबच्या घरावरून दिवाण फ़ज़ल अल्लाह ख़ान त्याची भेट न घेताच गेले. ग़ालिबला हे समजलं, तेव्हा त्यानं त्यांना एक चिठ्ठी पाठवली, ज्यात त्यानं लिहिलं होतं, ‘मला आज खरोखरच लाज वाटली. किती हा मोठा गुन्हा घडला माझ्या हातून, तुम्ही माझ्या घरावरून गेलात आणि मी तुम्हाला अभिवादन करायला तिथं नसावं.’ ही चिठ्ठी मिळताच दिवाण समजायचं ते समजले आणि लगेच ग़ालिबला भेटायला निघाले... 

हालीनं ग़ालिबचं वर्णन ‘हैवान-ए-ज़रीफ़’, म्हणजे ‘कोटीबाज प्राणी’ या शब्दात केलं आहे. विनोद हा ग़ालिबच्या स्वभावाचाच भाग होता. त्याला उपरोधाची आणि व्यंग्याचीही झालर होती. स्वतःवर हसणं, हा प्रकार ग़ालिबइतका कोणी हाताळला नसेल. ज्या परिस्थितीत एखादा माणूस कटकट करतो, आक्रोश करतो, त्यावेळी ग़ालिब सारं हसण्यावारी नेण्यात पटाईत होता. कवितेत ‘यूँ होता तो क्या होता’ असा शंकेखोर पवित्रा सतत घेणारा ग़ालिब, संकटाचा वा दुःखाचा प्रसंग आला, की तो हसून साजरा करत असे, याबाबत शंकाच नाही...  

संबंधित बातम्या