ग़ालिबची वैचारिक विरासत 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

अन्दाज़-ए-बयाँ

या रब! ज़माना मुझको मिटाता है किसलिए? 
लौह-ए-जहाँ पे हर्फ़-ए-मुक़र्रर नहीं हूँ मैं 
असं म्हणणारा ग़ालिब... 

जेव्हा मुग़ल साम्राज्याचा अंत होत होता, त्या काळातच दिल्लीत उर्दू शायरी बहरास आली होती. ग़ालिबच्या अगोदरच्या काळातील उर्दू शायरी फ़ारसी भाषेतील रिवायती शायरी, म्हणजेच पारंपरिक शृंगारिक शायरीचं अनुकरण करत होती. ग़ालिबनं उर्दू शायरीचा मुखडाच बदलला. ग़ालिबचा जन्म १७९७ चा, तर जॉन कीट्सचा १७९५ चा. इंग्रजीतील रोमँटिक संप्रदायातील तो एक प्रतिभावंत कवी. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजीत रोमँटिक पर्व सुरू झाल्याचं मानलं जातं. वर्डस्वर्थ, बायरन, शेले, विल्यम ब्लेक यांच्याप्रमाणंच जॉन कीट्सनंही एक स्वतंत्र रोमँटिक विश्व निर्माण केलं. ग़ालिबचा विचार करताना म्हणूनच त्याच्या मनात वारंवार डोकवावंसं वाटतं. त्याच्या अंतरात काय दडलं होतं, याचा शोध घ्यावासा वाटतो. समाजाप्रती आणि एकूणच मानवजातीविषयी त्याचा काय दृष्टिकोन होता, तो आजही का कालबाह्य झाला नाही, हे समजून घ्यावंसं वाटतं. 

ईश्वरावर विश्वास असूनही नमाज़ न पढणारा, कर्मकांड न पाळणारा ग़ालिब. ग़ालिबचं स्वतःचं असं स्वतंत्र तत्त्वज्ञान नाही. पण त्याला विविध धर्मीयांच्या वैचारिक बैठकीची जाण होती. यामुळंच त्यानं जीवनाबाबत गंभीर दृष्टिकोन मांडला आहे. प्राचीन सूफ़ी काव्याच्या अभ्यासामुळं धार्मिक रूढीपरंपरांपेक्षा अलग विचार करण्याची वृत्ती त्याच्यात निर्माण झाली असावी. ‘वहादत-ए-वजूद’ मध्ये त्यानं चराचर सृष्टी व्यापून असलेल्या ईश्वराची कल्पना मांडली आहे. तो अद्वैतवादी होता. एका पाठोपाठ एक प्रलय होतच राहणार. पुन्हा पुन्हा सृष्टीची निर्मिती होतच राहील आणि नवनवे पैगंबर येतच राहतील. विश्व आणि परमेश्वर एकच आहेत. तेव्हा नवं-जुनं, नश्वरता-चिरंजीविता हे सारे भ्रम आहेत, असं तर त्यानं वारंवार म्हटलं आहे. 

कवी आणि कलाकार हे आपलं जीवन एका सुरेख लयीत बांधून ठेवतात. ते आपलं जीवन आनंदमय आणि उन्नत करत असतात. त्यांच्या कलेमुळं आपली मनं उजळून निघतात. ग़ालिबचं वैशिष्ट्य म्हणजे, इतर अनेक लेखक व शायरांना काळ जसा पुढं सरकतो, तसं आपण विसरून जातो; परंतु ग़ालिबची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच आहे. जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा त्याला एवढी लोकप्रियता मिळाली नव्हती, हे त्याचं आणि खरं तर इतरांचंही दुर्दैव. अर्थात आग्रा, दिल्ली, व उत्तर भारतातील सर्व शहरांमधील उर्दू वर्तुळात तो ज्ञात होता. अनेक गोरे अधिकारीही त्याचे चाहते होते. तत्कालीन शायरीची शैली व रचना यापेक्षा ग़ालिबच्या शायरीचा आकृतिबंध आणि अर्थ पूर्णतः वेगळा होता. त्याच्या रचनांचा अर्थ आणि सौंदर्य अगदी नवीन स्वरूपाचं होतं. ते समजावून घेऊन त्याचा आनंद घेण्यासाठी थोडा वेळ देण्याची आवश्यकता असते आणि मनाला एका नव्या पातळीवर घेऊन जावं लागतं. 

ग़ालिबच्या काळात उत्तर भारतात अस्वस्थता, यातना आणि दुःख होतं. जवळपास अराजकच होतं, म्हणायला हरकत नाही. अशा परिस्थितीत बहुतेकांच्या कविता या त्या त्या हंगामानुसार उथळ आनंद व्यक्त करणाऱ्या तरी असत किंवा नैराश्य व पराभूततेतून निर्माण झालेल्या तरी असत. ग़ालिबचं जीवन तर दुर्दैवीच होतं. गरिबी व दैन्यावस्था होतीच. पण आपल्या कवितांचं व कार्याचं मोल समाजाला माहीत नसल्याची जाणीव त्याला कुरतडणारी होती. परंतु तो या प्रतिकूलतेचा बळी झाला नाही. उलट त्यानं या परिस्थितीवर मात केली. स्वतःच्या आत्म्याची अवनती त्यानं करून घेतली नाही. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या विविधतेतील एकतेवर भर दिला. ग़ालिबनं ‘वहादत-उल-वजूद’ (विविधतेतील एकता) हेच क्रांतिकारक तत्त्वज्ञान अंगीकारलं. नेकी और बदी, म्हणजेच चांगलं व वाईट, आनंद व दुःख, चल व अचल, यामधून ग़ालिबनं आयुष्य आणि त्यामधून ध्वनित होणारं एकत्व हेच बघितलं. या सर्व गोंधळात माणूस व त्याचं अस्तित्व हे ग़ालिबला फार महत्त्वाचं वाटलं. 

उत्साह, इच्छा, आकांक्षा, पॅशन आणि आशा हे सर्व असलेल्या माणसावर ग़ालिबचं प्रेम होतं. जेव्हा जेव्हा ग़ालिब दुःख आणि वेदना, अपयश आणि दुर्दैव यांच्या गर्तेत ओढला जाई, तेव्हा त्यांना शरण न जाता तो म्हणायचा - 
घर में क्या था कि तेरा ग़म उसे ग़ारत करता 
वो जो रखते थे हम इक हसरत-ए-तामीर सो है 
ही काहीतरी उभारण्याची आस, सततची अस्वस्थता आणि जगण्याची प्रेरणा हेच ग़ालिबच्या मते माणसाचं खरं भांडवल. ज्या हृदयात अस्वस्थता, उतावीळपणा आणि जीवनात परिवर्तन करण्याची इच्छा नाही, असं क्षुद्र हृदय काय कामाचं, असं त्याला वाटे. ग़ालिबला तिरस्कार होता, तो उथळपणाचा, दिखाऊपणाचा, साधनशुचितेचा. त्याला स्वतंत्र प्रतिभा, नावीन्य याचं आकर्षण होतं. आयुष्यातील खडतर प्रसंगांना सामोरं जाणं, हेच मानवजातीचं मुख्य वैशिष्ट्य असल्याचं ग़ालिबचं मत होतं. त्याला निर्जीवता, भावनाशून्यता आणि एकसाचीपणा नामंजूर होता. आज भारतातच नव्हे, तर जात अनेक ठिकाणी एक देश, एक संस्कृती, एक धर्म यांचा पुरस्कार करणारे लोक आहेत. ग़ालिब आज असता, तर त्याची काय भावना झाली असती? 

ग़ालिबनं अनेक बड्या हस्तींचं जीवन जवळून बघितलं होतं. त्यांच्या सवयी बघितल्या होत्या. माणुसकी, संवेदनशीलता, बुद्धी, ज्ञान यांचा त्यांच्यातील अभाव आणि फक्त  
स्वार्थपरायणता पाहिली होती. त्याबद्दल त्याच्या मनात तिरस्काराचीच भावना होती. एका ठिकाणी एका पत्रात ग़ालिबनं आनंदाची स्पष्ट शब्दांत व्याख्या सांगितली आहे - ‘माणसाला कोणत्याही छंदाची आवड असेल, आणि त्यासाठी त्यानं आयुष्य खर्च केलं, तर तो खरा आनंद असं मला वाटतं’ प्रत्येकाला आवडीचं काम करायला मिळणं, हेच खरं व्यक्तिगत स्वातंत्र्य होय. वर्गयुक्त समाजात खूप कमी लोकांना ही संधी मिळते.’ त्यावेळी कोणी समाजवादी समाजरचनेची मांडणी ग़ालिबपुढं केली असती (जिथं प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार काम करण्याची संधी मिळाली असती), तर त्यानं अगदी आनंदानं या कल्पनेला पाठिंबा दिला असता. साधुत्व आणि स्वातंत्र्य, त्याग आणि कृपा हे सारं सर्व माणसाला दिलेलं आहे, तर त्याचा यथायोग्य वापर करण्याची संधीही त्याला मिळावी, अशी ग़ालिबची अपेक्षा होती. 

ग़ालिबला कार्ल मार्क्सची माहिती होती की नाही, याची कल्पना नाही. पण मार्क्सचा काळ हा १८१८ ते १८८३ हा होता. ग़ालिबमध्येही एक मार्क्स दडला होता असं वाटतं. आपल्या एका पत्रात ग़ालिब जे लिहितो, त्यातून त्याचा एकूण उदार व विशाल दृष्टिकोन प्रतीत होतो. तो म्हणतो, ‘मी काही अवघ्या जगामध्ये म्हणत नाही, पण निदान मी ज्या शहरात राहतो आहे, तिथं कुणीही अन्नवस्त्राशिवाय तडफडत असेल, असं असू नये. ईश्वराने दंडित केलेला, मानवजातीनं नाकारलेला, दुबळा, आजारी, भिकारी, प्रतिकूलतेनं नाडलेला, असा हा मी कसाही असो आणि माझं बोलणं वा माझी कौशल्यं कोणतीही असोत, कुणालाही भीक मागताना पाहू न शकणारा असा, पण त्याचवेळी स्वतः दारोदार भीक मागत फिरणारा असा तो मी आहे.’ विशेष म्हणजे, ग़ालिबच्या मृत्यूनंतर रशियात समाजवादी क्रांती व्हायला ५० वर्षंदेखील लागली नाहीत. 
हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले 
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले 
असे जिवट जीवनेच्छेचे शेर लिहिणारा ग़ालिबचा प्रमुख काळ १९ व्या शतकातला. वृत्तीनं तो सुधारक होता. तो सगळ्या धर्मांचा आदर करायचा. आयुष्यात लहानपणापासून दुःखं बघितल्यानं त्याला जीवनाचा खरा अर्थ उमगला होता. तोच त्यानं आपल्या काव्यात उलगडून दाखवला. आजकाल एखाद्यानं लिहायला सुरुवात केली, तरी त्याला प्रसिद्धीची हौस असते. ग़ालिबला मात्र प्रसिद्धीचा अजिबात सोस नव्हता. अमीर-उमरावांच्या किंवा राजांच्या दरबारात जाणंही त्याला मनापासून आवडत नसे. ग़ालिबच्या ग़ज़लांचं पहिलं इंग्रजी भाषांतर सरफ़राज़ नियाज़ी यांनी केलं होतं. कमालीचा गुणी असूनही त्यानं नोकरी-व्यवसाय केला नाही. त्याची उपजीविका मित्रांच्या मदतीवर वा बादशाहनं खूश होऊन दिलेल्या बक्षिसावर चालायची. त्याला दरबारी कवीचं स्थान मिळालं, ते खूपच उशिरा. 

मुसलमान असूनही मक्केची यात्रा करावी, असं त्याला कधी वाटलं नाही. इस्लामला निषिद्ध असलेलं मद्य तर त्याला प्रिय होतं. एकेश्वरवाद, म्हणजे ईश्वर एकच आहे आणि पैगंबराबद्दलचा आदर या दोनच गोष्टी त्यानं इस्लामच्या शिकवणीतून घेतल्या. मुक्तीसाठी या दोन गोष्टी खूप आहेत, असं त्याचा चरित्रकार अल्ताफ़ हुसैन हाली यानं म्हटलं आहे. प्रतिकूल काळात मुस्तफ़ा ख़ान शेफ़्ता या मित्रानं ग़ालिबची साथ केली. याच काळात त्याच्या नातलगांनी मात्र त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अनेक मित्रांनीही पाठ फिरवली. एका कवितेत त्यानं आपल्या मित्राचे आभारही मानले आहेत. तुरुंगवासाच्या संकटकाळात त्याला कळलं, की समाजातील लब्धप्रतिष्ठित माणसं कसोटीच्या वेळी तत्त्वाचाच बळी सहजपणे देतात... 

ग़ालिब १८५७ च्या उठावाच्या वेळी दिल्लीतच होता. ‘दस्तंबू’ या रोजनिशीवजा फ़ारसी गद्यग्रंथात त्यानं ही सारी हकिकत लिहून ठेवली आहे. या लिखाणाचा सविस्तर वेध आपण नंतर घेणारच आहोत. ११ मे १८५७ ते ३ जुलै १८५८ पर्यंतच्या घटना यात आल्या असून, त्यात ग़ालिबनं केवळ आपद्‍धर्म म्हणून इंग्रजांची स्तुती आणि उठाव करणाऱ्यांची निंदा केली आहे. पण आपल्या मित्रांना लिहिलेल्या पत्रांमधली त्याची मतं याहून सर्वस्वी वेगळी व विरोधी आहेत. ग़ालिबनं इंग्रजांकडून पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीच हा ग्रंथ लिहिला होता, त्यामुळं त्यात त्यांची निंदा असणं अपेक्षित नाही. त्यानं नाइलाजानंच या पद्धतीनं लिहिलं होतं. कारण त्याला वाटत होतं की आपण जर फ़ारसीतून लिहिलं, तर आपलं नाव होईल आणि इंग्रज आपल्या बाजूनं पेन्शनचा निर्णय घेतील. त्याची मजबूरीच यातून दिसते. एरवी तो आपल्याला न पटणारं कधीच न लिहिता... 

आपला मूळ वंश असलेल्या तुर्की परंपरेला अनुसरून, ग़ालिबच्या चिंतनात आणि आचरणात पावित्र्याबाबतचा आदर व अभिमान दिसतो. तसंच गूढवाद, ऐहिक सुखदुःखांबाबतची अंतःस्थ जाणीव आणि उदारमतवाद यांचाही आढळ त्याच्या विचारांत आढळतो. आशा आणि निराशा यांचं एक विचित्र मिश्रणही त्याच्या एकूण वृत्तीत दिसतं. कारण त्याच्या अनुभवांनी त्याला या दोन्ही गोष्टींचा प्रत्यय दिला होता. 

वैचारिकतेच्या कसोट्यांवर तर ग़ालिब अतिशय आधुनिक होता. स्वतंत्र वृत्तीचा होता. परंपरेनं आणि रूढ नियमांनी लादलेले निकष तो नाकारत होता. परंपरांचं ओझं तर त्यानं मनापासून केव्हाच फेकून दिलं होतं. नीट बघितलं, तर लक्षात येतं की ग़ालिबच्या शायरीत आणि त्याने लिहिलेल्या पत्रांमधून त्याचे विचार, वैचारिक धारणा दिसून येतात, तशाच पद्धतीचा आविष्कार पश्चिमी साहित्यिकांच्या लिखाणातही दिसून येतो. तिथं फक्त जरा पुढं जाऊन, अस्तित्ववाद, वास्तववाद अशा सिद्धांताच्या रूपात ही मांडणी होऊ लागली होती. अस्तित्ववादाला जे अभिप्रेत आहे, तोच विचार ग़ालिब मांडत होता. त्याच्या रचनांमधून हे सारं अतिशय तीव्र आण उत्कट अशा पद्धतीनं व्यक्त होत होतं. त्याच्या कवितेतलं जीवनविषयक तत्त्वज्ञान तर सखोल आहे. मानवी स्वभावाची त्याला असलेली अचूक जाण त्यातून व्यक्त होते...

संबंधित बातम्या